आज मी सुप्रसिद्ध लोकनेते, समाजसुधारक तसेच कोल्हापूरचे राजे श्री राजर्षी शाहू महाराज यांचे जीवनचरित्र आपणासमोर मांडत आहे. त्यांनी आजकालच्या नेत्यांच्या खोट्या आश्वासनांनी आणि भाषणांनी नव्हे तर त्यांच्या कार्यातून भारत घडवला. या लेखाद्वारे आपणाला राजर्षी शाहू महाराज यांनी समाजासाठी केलेल्या योगदानांचा आढावा मिळेल.
शाहूजी राजे यांची संक्षिप्त माहिती
घटक | माहिती |
---|---|
ओळख | राजर्षी शाहू महाराज हे १९व्या शतकातील कोल्हापूरचे अतिशय लोकप्रिय राजे आणि समाजसुधारक होते. त्यांची ओळख त्यांच्या कार्याद्वारे स्पष्ट होते. |
जन्म | २६ जून १८७४ |
शिक्षण | सर स्टुअर्ट फ्रेझर यांच्याकडून प्रशासकीय बाबी आणि राजकुमार कॉलेज, राजकोट येथे औपचारिक शिक्षण. (१८८५-१८८९) |
टोपणनाव | आबासाहेब |
राज्याभिषेक | राज्याभिषेकापुर्वीचे नाव: यशवंतराव जयसिंगराव घाटगे, राज्याभिषेकाचे साल: इ. स. १८९४ |
शासनकाल | इ. स. १८९४- इ. स. १९२२ |
पालक | आई: राधाबाई, वडील: जयसिंगराव घाटगे |
पत्नी | सौ.लक्ष्मीबाई |
मृत्यू | ६ मे १९२२ साली मुंबई या ठिकाणी |
कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि साताराचे छत्रपती शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज यांनी ब्रिटिश राजवटीची सत्ता असताना अनेक समाजसुधारक कार्ये केले. आपल्यापैकी बरेच जण सातारा येथील छत्रपती शाहू पहिले आणि मराठा साम्राज्यातील कोल्हापूरच्या गादीवरील राजे आणि अग्रणी समाजसुधारक अशी प्रसिद्धी असलेल्या छत्रपती शाहू चौथे यांच्यामध्ये गोंधळलेले दिसतात.
बरेच लोक, विशेषतः मराठी लोक, त्या दोघांना एकच मानतात. त्यामुळे मी प्रथमतः या दोन राजांबद्दल सांगणार आहे. सातारा येथील छत्रपती शाहू महाराज यांना शाहू-१ म्हणूनही ओळखले जाते. ते मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती होते. ते छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू होते. तसेच शाहू पहिले हे “सातारा” गादीचे छत्रपती होते.
कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज यांना “शाहू चौथे” आणि “छत्रपती शाहूजी महाराज” म्हणूनही ओळखले जाते. ज्यांचा शिवाजी महाराज यांच्या घराण्याशी थेट रक्तसंबंध नव्हता. शिवाजी चौथे कोल्हापूरच्या गादीचे छत्रपती असताना त्यांच्या पत्नी आनंदीबाईंनी शाहूजींना दत्तक घेतले होते.
तसेच शाहू चौथे हे ताराबाईंनी स्थापलेल्या कोल्हापूरच्या गादीचे राजे होता. मराठा राज्य वेगळे झाल्यावर शिवाजी दुसरे हे कोल्हापूर गादीचे पहिले राजे होते. या लेखात मी शाहू चौथे यांच्याबद्दल बोलत आहे. जे राजर्षी शाहू महाराज म्हणून लोकप्रिय होते.
इतिहासात अनेक राजे झाले पण गरीब रयतेला जातीभेद न पाळता, माणुसकीने जवळ करणारा एकमेव राजा म्हणजे, शाहू महाराज!
वारसा हा वडिलांकडून येणारा नसून स्वकर्तुत्वाने मिळवायचा असतो!
समाजाचे कल्याण, म्हणजेच आपले कल्याण!
– Rajarshi Shahu Maharaj
, असे मानणारे शाहू महाराज रयतेमध्ये “राजर्षी” म्हणजेच राजसी संत या शीर्षकाने ओळखले जातात.
राजर्षी शाहू महाराज यांचे बालपण
शाहूंच्या बालपणात त्यांचे नाव “यशवंतराव” होते. त्यांचा जन्म कागल गावामधील घाटगे कुटुंबात झाला होता.
त्यांचे वडील त्या गावाचे प्रमुख होते आणि आई मुधोळच्या राजघराण्यातील राजकन्या होत्या.
वयाच्या ३ ऱ्या वर्षी २० मार्च १८७७ रोजी त्यांच्या आईचे निधन झाले.
त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या वडिलांनी घेतली. कोल्हापूरमधील राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये आणि धारवाड येथे शाहूजींनी त्यांचे औपचारिक शिक्षण पूर्ण केले. सर स्टुअर्ट फ्रेझरकडून त्यांनी प्रशासकीय बाबी जाणून घेतल्या.
तथापि, ते शाही घराण्यातील नव्हते, त्यांच्याकडे होते ते प्रबळ नेतृत्वक्षमता आणि कतृत्वक्षमता.
कोल्हापूरच्या गादीवरील शिवाजी चौथे यांच्या निधनानंतर, आनंदीबाईंनी यशवंतराव अवघे १० वर्षांचे असताना त्यांना दत्तक घेतले होते.
शाहू महाराजांचा विवाह
बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांची कन्या “लक्ष्मीबाई खानविलकर” यांच्याबरोबर इसवी सन १८९१ मध्ये शाहूजींचा विवाह झाला. त्यांच्या मुलांचे नाव शिवाजी आणि राजाराम, तसेच मुलींचे नाव राधाबाई आणि आऊबाई असे होते.
राजर्षी शाहू महाराजांची कारकीर्द

२ एप्रिल १८९४ मध्ये शाहू महाराज करवीरभूमी मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर येथील गादीवर आले. शाहूराजे यांनी त्यांच्या २८ वर्ष्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक सामाजिक कार्ये केली. त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते जनमानसात लोकप्रिय बनले.
त्याकाळी, रूढीवादी उच्चवर्गीय समाजाचा निम्न जातीच्या लोकांवर होणार अन्याय शाहू महाराजांना सहन होत नसे. त्यामुळे, जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी अनेक कायदे केले.
तसेच केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी, स्वतः प्रत्येक कामकाजाची पाहणी त्यांनी केली.

शाहू महाराजांचे शिक्षणक्षेत्रातील कार्य
एका बाजूला, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील राज्यकर्ते आदिवासी भागातील शाळा म्हणजे अनावश्यक खर्च मानून बंद करायला निघाले. तर दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले.
शाहूजींनी या कायद्याची अंमलबजावणीही केली. शिवाय ज्यांचे पाल्य (मुले) शाळेत येणार नाही अशा पाल्यांच्या पालकांना त्यावेळी १ रुपया दिवसाप्रमाणे दंडही केला. असा कायदा त्यांनी केला होता.
आताच्या काळात शिक्षणक्षेत्राकडे जेव्हा व्यापार करण्याच्या दृष्टीने पाहिले जाते तेव्हा, महाराष्ट्रातील समाजातील सर्व मुलांना शिकता यावे म्हणून बोर्डिंग शाळा, हायस्कूल यासाठी मदत करणारे शाहू महाराज आठवतात.
यावेळी एक प्रसंग आठवतो, जेव्हा भाऊराव पाटील यांना शाहू महाराजांनी स्वतःच्या पॅलेसमध्ये राहायला आणि शिकायला परवानगी दिली होती.
तेव्हा भाऊराव पाटील भारावून गेले, शाहू महाराजांच्या शिक्षणक्षेत्रातील दृष्टिकोनाने भाऊराव पाटलांना प्रेरित केले. त्यानंतर, भाऊराव पाटीलांनी रयतेतील ग्रामीण भागातील दीन-दुबळ्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी “रयत शिक्षण संस्था” उभी केली आणि कर्मवीर अशी उपाधी मिळवली. शाहू महाराजांनी त्यांच्या या संस्थेला वेळोवेळी मदतही केली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधील क्षमता ओळखून शाहू महाराज त्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींमध्ये मदतही करत असत.
कोल्हापूर म्हणजे “वसतिगृहांचे माहेरघर” असे म्हटले तर चुकिचे ठरणार नाही. या वसतिगृहांला पहिल्यांदा प्रत्येक जातीसाठी सुरु करणारे ते शाहू महाराज!
समाजातील दारिद्रय, अंधश्रद्धा, अज्ञान दूर करायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी, सर्व स्तरातील मुलांना शिक्षण मिळावे याकडे लक्ष्य केंद्रित केले. शाहूजींच्या कारकिर्दीत प्राथमिक शिक्षणासाठी कोल्हापूर संस्थानातून सर्वात जास्त खर्च केला गेला.
जातीभेद निर्मूलनासाठी शाहूजींचे प्रयत्न
शाहू महाराजांनी जातिभेत नष्ट व्हावेत यादृष्टीने सार्वजनिक अनेक मराठा-धनगर विवाह घडवून आणले. विधवा पुनर्विवाह आणि आंतरजातीय विवाहासाठी शाहू महाराजांचा पाठिंबा होता. त्यासाठीही आवश्यक कायदे त्यांनी केले.
राजदरबारातील एक प्रसंग
त्यांनी दरबारामध्ये चहा करण्यासाठी एका मागारवर्गीय व्यक्तीला ठेवले होते. शाहू महाराज त्याने केलेला चहा स्वतः तर पितच, पण इतर दरबारींनाही त्याच व्यक्तीच्या हाताचा चहा प्यावा लागे.
शेतकऱ्यांची पिके चांगल्या प्रकारे यावीत यासाठी त्यांनी १८ फेब्रुवारी १९०७ मध्ये भारतातील पहिले राधानगरी धरण बांधले.
सत्यशोधक समाज आणि शाहू महाराज
शाहू महाराज यांचा ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधक समाजाला पाठिंबा होता. ज्योतिराव फुलेंच्या निधनानंतर प्लेगसारख्या नैसर्गिक विपदेमुळे तसेच प्रबळ नेतृत्वाच्या अभावामुळे सत्यशोधक समाजाचे कार्य थांबले.
शाहू महाराजांनी वेदोक्त प्रकरणानंतर सत्यशोधक समाजाला नवीन उमेद दिली, असे म्हणायला हरकत नाही.
शाहूजींच्या कारकिर्दीमधील प्लेगची महामारी
१८९७-१८९८ साली आलेल्या प्लेगसारख्या महामारीला शाहूजींनी मोठ्या धैर्याने तोंड दिले. प्रशासनामध्ये कर्तृत्ववान व्यक्तींना निवडून शाहू महाराजांनी प्रशासनाचा कायापालट केला.
प्रशासनात योग्य गुणी व्यक्तिंना निवडून प्रशासनाचा कायापालट
भास्करराव जाधव यांच्या कर्तृत्वाकडे पाहून त्यांना “असिस्टन्ट सरसुभे” या सर्वोच्य पदावर शाहूजींनी नेमले. तसेच, अण्णासाहेब लठ्ठे यांना त्यांच्या राज्याचा पंतप्रधान म्हणून नेमले.
भास्करराव जाधव, अण्णासाहेब लठ्ठे यांनी पुढे ब्राह्मणविरोधी चळवळीमध्ये अस्पृश्यांसाठी वसतिगृहे, शाळा खोलण्यात त्यांचे योगदान दिले.
शाहू महाराजांसंबंधी झालेले वेदोक्त प्रकरण
सन १९०० मध्ये झालेल्या वेदोक्त प्रकरणाच्या अनुभवातून महाराजांनी जाणले की, अस्पृश्य समाजाला उच्यवर्णीयांच्या जाचक अन्यायातून मुक्त केल्याशिवाय अस्पृश्य समाजाला न्याय मिळणार नाही.
या प्रकरणानंतर शाहू महाराजांना सर्व ब्राह्मणी समाजाकडून टीकांचा वर्षाव झाला. विशेष म्हणजे, यामध्ये टिळकांचाही समावेश होता.
शासनामध्ये राखीव जागा तरतूद करणारे शाहू महाराज

जातिभेदामुळे एक महाराज असताना देखील त्यांना वैदिक मंत्र म्हणण्यास विरोध होत असेल, तर विचार करा सर्वसामान्यांची परिस्थिती काय असेल? त्यामुळे, त्यांनी २६ जुलै १९०२ साली त्यांच्या राज्यात सरकारी नोकरीमध्ये मागास वर्गासाठी ५०% राखीव जागा ठेवण्याचे फर्मान काढले. त्यांच्या या निर्णयामध्ये काही अंशी वेदोक्त प्रकरणही कारणीभूत आहे.
शाहू महाराजांचा लंडन दौरा
सातव्या एडवर्डच्या राज्याभिषेकासाठी शाहू महाराजांनी सन १९०२ मध्ये लंडन दौरा केला होता. शाहू महाराजांनी तेथील शिक्षणव्यवस्था, औद्योगिक प्रगती, आधुनिक सिंचनप्रणाली, आधुनिक दळणवळणाची साधने, इत्यादी गोष्टींचा आढावा घेतला.
अन्यायी रूढी-परंपरांवर शाहू महाराजांचा प्रतिबंध
सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास शाहूजींनी कायद्याने बंदी केली. भटक्या जातीतील लोकांना स्थिरस्थावर करून आश्रय दिला.
प्रत्येक खेड्यामध्ये परंपरेने चालणारी बारा-बलुतेदार पद्धत सन १९१८ साली बंद करून, त्यांना प्रत्येक क्षेत्रातील उद्योगधंदे खुले केले.
सन १९२० साली देवदासी प्रथेस बंदी करणारा कायदा करून, स्त्रियांवरील होणारा अन्याय बंद केला. त्याचप्रमाणे बालविवाह प्रतिबंद कायदा जरी केला.
शाहूजींची औद्योगिक क्षेत्रातील कामगिरी
औद्योगिक क्षेत्रात प्रगतीसाठी त्यांनी मोठमोठ्या बाजारपेठ वसवल्या. आताची भारतातील प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ शाहू महाराजांनी सन १८९५ साली वसवली होती.
शाहू महाराजांची कलेमधील रुची
शाहू महाराज कलेला नेहमी प्रेरणा दिली. त्यांनी जात-धर्म न पाहता अनेक कलावंताना राजाश्रय दिला होता. नाट्यक्षेत्रातील कलावंतांसाठी त्यांनी नाट्यगृहाची चांगली सोय केली. कुस्ती तर शाहूजींचा आवडता छंद, शाहूजींनी देशातील अनेक तरबेज मल्लांना आश्रय दिला होता. त्यांनी कोल्हापूरमध्ये कुस्तीसाठी त्या काळी मोठे मैदान बांधले होते. त्याचा परिणाम म्हणून, महाराष्ट्रात मल्ल म्हटले की कोल्हापूरचे नाव घेतले जाते.
राजर्षी शाहू महाराज
सन १९१९ साली कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय सभेने शाहूजींच्या सामाजिक कार्याला मान देऊन त्यांना “राजर्षी” ही पदवी बहाल केली. शिवाजी महाराज यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने समजून, समाजातील रूढी-परंपरेच्या नावाखाली होणारा अन्याय शाहू महाराजांनी बंद केला.
शाहू महाराजांचा मृत्यू
शाहू महाराजांसाठी आयुष्याची शेवटची वर्षे दुःखदायक होती. कारण, त्यांचा मुलगा “शिवाजी” याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यातच त्यांना मुधुमेह असल्याने त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर, ६ मे १९२२ साली मुंबई येथे वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
जाणून घ्या कोण आहेत खरे भारतीय नायक:
राजर्षी शाहू महाराजांचा हा मराठीतील लेख तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. कृपया आमच्या कामाचे समर्थन करण्यासाठी हा लेख शेअर करण्यास विसरू नका!
वैशिष्ट्यीकृत छायाचित्राचे श्रेय: Devare & Co. : Bombay