श्री छत्रपती शिवाजी महाराज

Today, I am going to tell you about an ordinary person who become extra-ordinary by his work. He was the ultimate inspiration not only for Indians but also for the whole world. He was non-other than Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj Information in Marathi article will definitely help you to get information about Shivaji Maharaj. This article was primarily for people who know Marathi.

मी तुमच्यापुढे आज, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र त्यांच्या जीवनात घडलेल्या महत्वाच्या घटनांच्या मदतीने तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
परिचय: मराठा साम्राज्य आणि त्याचे पहिले छत्रपती
जन्म तारीख: १९ फेब्रुवारी, १६३०
जन्मस्थानः शिवनेरी किल्ला, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
• पालक: पिता: शहाजीराजे भोसले, आईः जिजाबाई
• कालावधी: इसवी सन १६७४- १६८०
• पत्नी: सईबाई निंबाळकर, सोयराबाई मोहिते, काशीबाई जाधव, सगुणाबाई, सकवारबाई गायकवाड, गुणवंताबाई पुतळाबाई पालकर, लक्ष्मीबाई
• शिवाजी महाराजांचे पुत्र: छत्रपती संभाजी महाराज, राजाराम भोसले
• कन्या: सखुबाई निंबाळकर, रानुबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, राजकुमारीबाई शिर्के.
• शिवरायांचे साथीदार आणि सरदार: तानाजी मालुसरे, बाजी पासलाकर, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे

प्रौढ़ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज..महाराज....शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय !! Click to Tweet
विषय सुची दाखवा

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा:

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता | शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते || Click to Tweet

– स्वराज्याची राजमुद्रा

अर्थ: प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि विश्ववंदनीय असणारी अशी ही शहाजींचे पुत्र शिवाजी यांची ही राजमुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी विराजमान होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Information in Marathi
Image Credits: Wikimedia, Source: British Library

शिवछत्रपतींच्या महाराजांच्या जन्माआधीचा भारत:

शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपूर्वी, भारतातील राजांनी व सम्राटांनी लोकांचे अतोनात छळ आणि शोषण केले होते. राजे आणि अधिकारी देशातील लोकांबद्दल विचार करीत नव्हते. दक्षिणेत सम्राट कृष्णदेवरायसारखे शक्तिशाली हिंदू राजे होते. जे राज्यातील लोकांची पुरेपूर काळजी घेत. ते त्यांच्या वैभवशाली राज्यासाठी आणि प्रभावी प्रशासनासाठी प्रसिद्ध होते.

महाराष्ट्र मुख्यतः अहमदनगरचा सुल्तान निजामशाह आणि विजापूरचा सुल्तान आदिलशहा अशा दोन भागात विभागले गेले. म्हणून निजामशाह आणि आदिलशाह यांच्यात नेहमीच संघर्ष व्हायचा. सततच्या लढण्यामुळे, या राज्यातील लोक खूप दुःखी आणि हताश होते. दोन राज्यातील संघर्षामुळे प्रजेचे खूप हाल व्हायचे.

शिवरायांनी प्रजेचे हे हाल पहिले, आणि ज्या काळात स्वतंत्र्य राज्याचा विचारही संभव नव्हता, अशा काळात त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पहिले. केवळ स्वप्नच पाहिले नाही तर त्यांच्या बुद्धी, युद्ध कौशल्ये (गनिमी कावा) आणि अतुलनीय राजकारणाद्वारे ते प्रत्यक्षात उतरवले.

भारतीय स्वतंत्रलढ्यातील महत्वाचे नेते, क्रांतिकारक आणि महान राजे यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खालील लेख वाचा:

भारतीय स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक आणि महान राजे

शिवाजी महाराजांच्या काळातील महान संत:

शिवरायांच्या जन्माआधी श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास स्वामी यांच्यासारखे संत झाले. या संतांनी लोकांना दयाळूपणा, अहिंसा, भक्तिभाव, देवाची सेवा, धैर्य, बंधुता यांचे धडे शिकवले.

शिवाजी महाराजांचा जन्म:

शिवाजी महाराजांनी १९ फेब्रुवारी, १६३० रोजी पुणे जिल्ह्याजवळ शिवनेरी किल्ल्यात जन्म घेतला. शिवरायांचे वडील शाहजी राजे विजापुरचा सुलतान आदिलशाहच्या दरबारात सैन्यप्रमुख होते. शिवरायांच्या जन्माच्या वेळी शाहजी राजे (शिवरायांचे वडील) शिवनेरी किल्ल्यात नव्हते, ते मुगल हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी मोहिमेवर गेले होते.

महाराष्ट्रामध्ये शिवजयंती दरवर्षी दोनदा साजरी केली जाते. तुम्ही म्हणाल, जन्मदिवस दोनदा कसा साजरा केला जाऊ शकतो? याचे उत्तर आहे दोन वेगळ्या कालगणना एक म्हणजे ग्रीगोरियन कालगणनेप्रमाणे आणि दुसरी मराठी कालगणना. ग्रीगोरियन कालगणनेप्रमाणे शिवाजी महाराजांचा जन्मदिवस १९ फेब्रुवारी दिवशी येतो. तसेच, मराठी कालगणनेप्रमाणे तिथीनुसार छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस हा फाल्गुन वद्य तृतीयेच्या ( फाल्गुन महिन्याचा तिसरा दिवस जो फेब्रुवारी ते मार्च दरम्यान दरवर्षी येतो ) दिवशी येतो.

अशाप्रकारे, शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी दोनदा उत्साहात साजरी केली. या दिवशी महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवरायांची जयंतीनिमित्त मिरवणुका निघतात. राजधानी रायगड येथे मोठी मिरवणूक निघते. शिवाजी महाराजांचा सिंव्हासनावरील पुतळा आकर्षक फुलांनी सजवला जातो. शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या जातात. या दिवशी रायगडावर प्रचंड गर्दी आपणास पाहायला मिळेल.

छत्रपती शिवरायांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन:

शिवाजी महाराजांचे वयाच्या सातव्या वर्षी गुरु दादोजी कोंडदेव यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. भाले, दांडपट्टा, तलवार चालवणे, इत्यादींचा शस्त्रे चालवण्याचे शिक्षण दादोजींनी त्यांना दिले. तसेच संस्कृत, राजकारणातील डावपेच, कूटनीती यांसारखे महत्वाचे विषय पंडित, दादोजी आणि जिजाबाईंनी त्यांना शिकवले.

लहान असताना त्यांच्या माता जिजाबाई त्यांना रामायण, महाभारतातील, तसेच इतर शूरवीरांच्या कथा सांगत. सम्राट कृष्णदेवराय यांच्या जीवनचरित्राने शिवाजी महाराजांनादेखील प्रेरणा दिली होती. शिवाजी महाराजांपूर्वी हिंदु राष्ट्रासाठी आणि रयतेसाठी संघर्ष करणारा दक्षिण भारतातील तो एकमेव शक्तिशाली राजा होता. लहानपणापासून शिवाजी महाराजांमध्ये चांगले नेते होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्ये होती.

शिवाजी महाराजांची उंची आणि वजन:

शिवरायांचे वजन: शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सुवर्णतूळा केली, तेव्हा हेन्री ऑक्सिन डेन यांच्या नोंदीनुसार १६० पौंड्स म्हणजे ७3 किलोग्रॅम होते. परंतु त्यांच्या अंगावरील परिधान केलेले कपडे, अलंकार, शस्त्र (तलवार, कट्यार), श्री विष्णूची मूर्ती, इत्यादी या सर्वांचे वजन वजा केल्यावर त्यांचे वजन सुमारे १४५ पौंड्स म्हणजे ६६ किलोग्रॅम असावे.
शिवरायांची उंची: शिवरायांची उंची सुमारे १६८ सेमी म्हणजे ५ फूट ६ इंच असावी असे काही इतिहास संशोधकांना वाटते.

रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांची स्वराज्यस्थापनेसाठीची शपथ:

अतिशय लहान वयामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लागणारी विश्वासू साथीदार, गुप्त मार्गांची माहिती यांची जमवाजमव चालू केली. शिवराय मावळ्यांना त्या वेळी म्हणाले, “हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा”. चला आपण सर्वांनी मिळून ही इच्छा पूर्ण करूयात.

शिवराय अवघे १६ वर्षाचे असताना त्यांनी आपल्या साथीदार मावळ्यांबरोबर पुण्यातील रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली.

शिवाजी महाराजांचे प्रसिद्ध उदगार:

हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा Click to Tweet
परस्रीयांबद्दल आदर दाखवा, अन्यथा कठोर शिक्षा केली जाईल. Click to Tweet
मरण आले तरी चालेल, पण शरण जाणार नाही Click to Tweet

-शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यासाठीची घौडदौड:

शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी विश्वासू सहकाऱ्यांना जमा केले आणि सैन्याची, शस्त्रांची जमवाजमव करण्यास सुरू केले. तोराणा येथून त्यांनी आपली मोहीम सुरू केली, तोरणा किल्ला हा आदिलशाहच्या दुर्लक्षित किल्यांपैकी एक होता, आणि संरक्षणासाठी पुरेसे रक्षक नव्हते. महाराजांनी तो गड हेरला आणि संधी मिळताच थोड्याशा सैन्यानिशी गड ताब्यात घेतला. तोरणा सर करून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. महाराजांनी या गडाला “प्रचंडगड” असे नाव दिले होते.

मराठा साम्राज्याची पहिली राजधानी:

तोरणाजवळच एक दुसरा किल्ला होता, त्याचे काम अर्धवट राहिले होते. शिवाजी महाराजांनी तो गड ताब्यात घेतला आणि त्याचे काम पूर्ण केले आणि त्याचे नाव “राजगड” असे ठेवले. म्हणूनच, राजगड स्वराज्याची (मराठा साम्राज्याची) पहिली राजधानी बनली. नंतर ती रायगड येथे हलविण्यात आली. त्याचप्रमाणे, राजगडनंतर त्यांनी कोंढाणा, लोहगड, पन्हाळा, सज्जनगड, रोहिडा, इत्यादी अनेक किल्ले ताब्यात घेतले.

शिवाजी महाराज यांची नातेवाईकांविषयीची धोरणे:

छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच नातेवाईकांपेक्षा जबाबदारी अधिक महत्त्वाची मानली. खूप कमी लोकांना माहित आहे की, शिवाजी महाराजांना एक सावत्र भाऊ होता “संभाजी” त्याने नेहमी स्वराज्याच्या मार्गात अडचणी आणण्याचा प्रयत्न केला.
शिवरायांचा मेहुणा बालाजी यानेसुद्धा स्वराज्याविरुद्ध मोहीम सुरु केली, त्यामुळे महाराजांना त्यांच्या विरोधात लढाई करावी लागली. त्याचबरोबर त्यांचा भाऊ संभाजीही त्यांच्या मार्गामध्ये आला, तेव्हा शिवरायांनी त्याला पकडले आणि दुसऱ्या प्रदेशात त्यांचे कार्य करण्यासाठी पाठवले.

स्वराज्याच्या मार्गावर कोणीजरी आले तरी शिवराय माफ करीत नसत. मग ती व्यक्ती कुटुंबातील असो समाजातील वा क्षत्रूपक्षातील असो. त्यांनी नेहमी कुटुंब आणि लोकांमध्ये समान दृष्टिकोन ठेवला.

शिवरायांचा जावळीवर विजय:

त्यानंतर, शिवाजी महाराजांनी “जावळी” ताब्यात घेण्याचा बेत आखला, जे खूप आव्हानात्मक होते. जावळीमधे “रायरी” किल्ला होता, तो किल्ला चारही बाजूने घनदाट जंगलाने वेढला होता. जावळीच्या घनदाट जंगलात भर दिवसादेखील सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नसायचा. त्यामुळे रायरी काबीज करणे कठीण काम होते.

रायरीचा किल्ला हा सह्याद्री पर्वतामध्ये ८५० मीटर (२७०० फूट) उंचीवर होता. रायरी आणि जावळी सर केल्यानंतर महाराजांनी रायरीचे “रायगड” असे नामकरण केले. स्वराज्याची राजधानी अधिक सुरक्षित असावी, म्हणून महाराजांनी राजधानी राजगडपासून हलवली आणि “रायगड” ही स्वराज्याची नवीन राजधानी बनली.

आदिलशाहाचे स्वराज्यावर आक्रमण:

रायरी आणि जावळी ताब्यात घेतल्यानंतर, शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाही दरबार पाहणारी बडी साहेबीण हिने दरबारात विचारले, तेव्हा अफझलखान हा वाईचा सरदार पुढे आला. त्याने शिवरायांना जिवंत किंवा मृत पकडून आणण्याचा भर दरबारात विडा उचलला.

अफझलखानने बिजापूरमधून दहा हजाराची फौज घेऊन कूच केले. तेव्हा शिवराय राजगडावरून प्रतापगडावर गेले. कारण एकाच होते, घनदाट अरण्यात एवढे मोठे सैन्य, दारुगोळा, तोफा नेणे कठीण होते. त्यावेळी, अफझलखानने शिवरायांशी पत्र लिहून विनवणी केली, की तुम्ही किल्ले परत करा, आदिलशाह तुम्हाला खूप मोठी जहागिरी, सरदारकी देतील. शिवरायांनी अफझलखानाचे कारस्थान ओळखले.

शिवरायांनी अफझलखानाला पत्र लिहिले की, मी किल्ले परत करायला तयार आहे, मी तुमचा अपराधी असल्याने, मला माफ करा. तुम्हीच प्रतापगडावर भेटायला यावे, कारण मला तिकडे येण्याची भीती वाटते. हे उत्तर ऐकून अफझलखान खूप खुश झाला. त्याला, वाटले शिवाजी डरपोक आहे, हा काय लढणार माझ्याशी! अफझलखान भेटीसाठी तयार झाला.

शिवाजी महाराजांकडून अदिलशाहचा वध:

ठरलेल्या वेळी शिवराय आणि अफझलखान, दोघांचेही १० अंगरक्षक बरोबर घेऊन, भेटण्यास तयार झाले. शिवराय शामियान्यात गेल्यानंतर अफझलखान शिवरायांना आलिंगन द्यायला पुढे आला.

शिवरायांनी आलिंगन दिले, तेव्हा उजव्या काखेत शिवरायांचे मस्तक दाबून अफझलखानने कट्यारीचा जोरदार वर केला. परंतु, शिवरायांना असा घातपात होण्याची शंका होती. शिवाजी महाराजांनी आधीच चिलखत घातले होते, त्यामुळे शिवराय बचावले. अफझलखानाचा वार होताच दुसऱ्या क्षणी शिवाजीमहाराज वाघनख्याने आणि बिचव्याने वार करतात. अफझलखानाचे आतडे बाहेर निघते आणि जमिनीवर कोसळतो.

हा आवाज ऐकून सय्यद बंद आत येतो. शिवाजी महारांवर वार करणार तोच जीव महाला येतो आणि तो वार आपल्या अंगावर सहन करतो. त्यानंतर, पट्ट्याच्या एका घावात सय्यद बंडाला ठार करतो. शिवरायांनी इशारा देताच प्रतापगडाभोवती लपलेले मराठा मावळे आदिलशाही फौजांवर तुटून पडले. आदिलशाही सैन्याचा दारुण पराभव झाला, या बातमीने विजापूरमध्ये हाहाकार माजवला. शिवरायांच्या या पराक्रमाने आदिलशाह भयंकर चिडला.

पन्हाळ्याचा वेढा:

१६६० मध्ये आदिलशाहने मराठ्यांचा पराभव करण्यासाठी त्याच्या खास सरदाराला पाठवले. त्याचे नाव होते “सिद्धी जौहर” जो एक निर्दयी सेनापती होता. त्याने पन्हाळा किल्याला 40,000 आदिलशाही सैन्यानिशी घेरले. शिवराय पन्हाळा किल्ल्यामध्ये अडकले. शिवाजी महाराज लवकरात लवकर शरण यावेत, म्हणून सिद्धिने पन्हाळाजवळील निष्पाप जनतेवर अत्याचार सुरु केले.

महाराज पन्हाळ्याचा वेढा तोडून बाहेर:

पन्हाळा किल्ल्यावर अन्नधान्याचा साठा संपत आला होता. त्यामुळे, महाराजांना वेढ्यातून बाहेर पडून दुसऱ्या किल्ल्यात जाणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी पन्हाळातून बाहेर पडण्याची योजना केली.

मान्सून संपण्याच्या आत वेढ्यातून बाहेर पडणे जरुरी होते. शिवाजी महाराजांनी निवडक 600 मावळ्यांसह गड सोडला. वेढ्यातून निसटणे एवढे सोपे नव्हते म्हणून शत्रूचे ध्यान विचलित करण्यासाठी शिवा काशीद महाराजांची जागा घ्यायला तयार झाला.
शिवा काशीद रोजच्या कामात महाराजांची सेवा करत असे आणि तो हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा दिसत होता. महाराजांनी गड सोडला त्या रात्री धो- धो पाऊस पडत होता. शिवरायांनी पन्हाळा सोडला आणि रायगडाच्या दिशेने निघाले.

स्वराज्यासाठी शिवा काशीद याचे बलिदानः

शिवा काशीदने शिवाजी महाराजांचे कपडे घातले, मस्तकावर जिरेटोप, गळ्यात कवड्याची माळ आणि महाराजांच्या पालखीमध्ये बसून शंभर मावळ्यासोबत किल्ल्याच्या एका दरवाजातून बाहेर पडले. तर दुसऱ्या मार्गाने सिद्धि जौहरच्या वेढा तोडून शिवराय किल्ल्याच्या दुसऱ्या मार्गाने निसटले.

शिवा काशीदची पालखी शत्रूच्या वेढ्यातून बाहेर पडल्यानंतर पकडली जाते. सिद्धी जोहरने महाराजांना कधी पहिले नसल्याने शिवाजी महाराज पकडले गेले असा त्याचा गैरसमज होतो. काही सरदार आणि फझल खान ज्यांनी शिवाजी महाराजांना पहिले त्यामुळे होते ते काही वेळानंतर त्यांना कळते; ते शिवाजी महाराज नाहीत. शिवा काशीदची खरी ओळख होताच सिद्धी जोहर त्याचा शिरच्छेद करण्याचा आदेश देतो.

महाराज वेढ्यातून निसटले म्हणून सिद्धी रागाने लाल होतो आणि सिद्धि मासूद याला मोठ्या सैन्यानिशी शिवाजी महाराजांचा पाठलाग करण्यासाठी पाठवतो. शेवटी, मसूद महाराजांना घोडखिंडीजवळ गाठतो. शिवराय पेचात पडतात, शिवरायांना वाटते आता विशाळगड गाठणे कठीण.

घोडखिंडची लढाईः

बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांची स्वामीनिष्ठा:

बाजीप्रभू देशपांडे हा सैन्यप्रमुख त्यावेळी महाराजांबरोबर होता. महाराजांचे जीवन धोक्यात आहे हे त्याने जाणले. म्हणून बाजीप्रभू शिवरायांना म्हणतात की, “तुम्ही अर्ध्या मावळ्यांबरोबर पुढे विशाळगडाकडे निघा, मी इथेच थांबून गनिमांना रोखतो.” बाजीप्रभूंना सोडून जायला राजे तयार होत नाहीत. त्यावेळी बाजीप्रभू त्यांना म्हणतात की, स्वराज्याला शिवाजी महाराजांची अधिक गरज आहे, “एक बाजी गेला तर काय झालं, उद्या शेकडो बाजी तुम्हाला मिळतील, पण राजे परत मिळणार नाहीत.”
बाजी त्यावेळी महाराजांना म्हणतो की, “लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे!”

महाराज बाजीप्रभूंना म्हणतात की, आम्ही विशाळगडावर पोचताच तीन तोफा डागायला सांगू. ते ऐकताच तुम्ही खिंड सोडून विशाळगडाकडे निघा. शिवाजी महाराजांना बाजीप्रभुंची निष्ठा पाहून गहिवरून येते, पण त्यांच्यासमोर स्वराज्यासारखे मोठे लक्ष्य होते. वेळ मोलाची होती आणि शत्रू पाठीवर, शिवराय स्वतःला आवरून बाजी प्रभूंची शेवटची भेट घेतात. बाजीप्रभू शिवरायांना शेवटचा मुजरा करतात, शिवराय विशाळगडाकडे निघतात.

बाजीप्रभू घोडखिंडीमध्ये आदिलशाही सैन्याशी लढण्याची तयारी सुरु करतात. सर्व मावळ्यांना बाजी आपापली जागा ठरवून देतात. सर्व मावळे दगडगोटे जमा करतात, नंतर मसूद आणि त्याच्या सैन्याची वाट पहातात.

तेवढ्यात मसूदच्या सैन्याची पहिली तुकडी घोडखिंडीच्या मुखाशी येते, बाजीप्रभू मसूदच्या सैन्याला खिंडीच्या मध्यापर्यंत येऊन देतो. मसूदची तुकडी खिंडीच्या मध्यावर येताच, बाजी मावळ्यांना इशारा करतो. मावळे खिंडीच्या उंचावरून त्यांनी

साठवलेल्या दगडगोटयांनी गनिमांवर हल्ला करतात. उंचावरील भागाचा फायदा घेत मराठे मसूदच्या अनेक सैन्य तुकड्यांचा नायनाट करतात. परंतु, मसूदचे सैन्य संख्येने जास्त असल्याने ते शेवटी बाजीप्रभूंना घेरतात आणि त्यांच्या सर्व बाजूंनी आक्रमण करतात. चारही बाजूने आक्रमण केल्याने बाजीप्रभू गंभीर जखमी होतात, तरीही ते त्या अवस्थेत लढत राहतात.

शेवटी, आसमंतात तोफांचा आवाज कडाडतो. बाजीप्रभूच्या गालावर हसू उमटते,

राजे गडावर पोचले, माझे काम फत्ते झाले, मी आता सुखाने मरतो.CLICK TO TWEET

कधी-कधी आपली मातृभूमी रक्त मागते, त्यावेळी बाजीप्रभुंसारखे देशभक्त रक्ताचा अभिषेक करून आपल्या या मातृभूमीचे स्वातंत्र्य टिकवून ठेवतात. अशा या वीर योध्याला शत-शत नमन!

tanaji malusare photos
Baji Prabhu Deshpande Statue in Panhala Fort By Ankur P posted in Flickr and licensed under CC BY-SA 2.0

शाहिस्तेखानला अद्दल घडवली:

औरंगझेबाचा मामा शाहिस्तेखान याला औरंगझेबाने डेक्कनची सुबभेदारी दिली होते. तेव्हा औरंगझेबाच्या आदेशावरून शाहिस्तेखान स्वराज्यावर दीड लाख सेनेसह स्वराज्यावर चालून आला. शिवराय शरण यावेत म्हणून त्याने स्वराज्यातील गावे लुटणे, मंदिरांचे नुकसान करणे, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणे असे रयतेला त्रास देण्याचे सत्र सुरु केले. तेव्हा, महाराजांनी शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करायचा असा धाडसी निर्णय घेतला.

शाहिस्तेखान त्यावेळी लाल महालात ठाण मांडून बसला होता. तसे पाहायला महाराजांचा निर्णय हा आत्मघाती होता, कारण दीड लाखाच्या सेनेमध्ये जाऊन शत्रूला पकडून ठार करणे हे आत्महत्या केल्यासारखेच होते.
पण महाराज खूप दृढनिश्चयी होते, ते त्यांच्या साथीदारांसह लग्नाच्या वरातीमधून पुण्यामध्ये प्रवेश करतात.

इसवी सण १६६३ मध्ये महाराज मोठया शिताफीने लाल महालाच्या भिंतीला भगदाड पाडून किल्ल्यामध्ये प्रवेश करतात.
शिवराय महालात घुसल्याची बातमी शाहिस्तेखानाला लागते, तेव्हा त्याची पुरतीच तारांबळ उडते. काय करावे, कुठे लपून बसावे त्याला काहीच सुचत नसते. महाराज स्त्रियांचा आदर करतात त्यामुळे ते स्त्रियांच्या कक्ष तपासणार नाहीत ही गोष्ट शाहिस्तेखानाला माहित होती. त्यामुळे, तो जनानखान्यामध्ये स्त्रियांचा वेष परिधान करून लपून बसतो.

महाराजांचा साथीदार शाहिस्तेखानाला ओळखतो, तेव्हा महाराज त्याचा पाठलाग करतात. शाहिस्तेखान बालकनीमधून उडी मारून पळताना, शिवराय तलवारीचा वार करतात त्यामध्ये त्याची तीन बोटे छाटली जातात.

शिवरायांच्या या पराक्रमाने शाहिस्तेखानाच्या अशा फजितीमुळे संपूर्ण मुघल राजवटीची इज्जत जाते. औरंगझेबाच्या कानावर ही बातमी समजताच तो रागाने लाल होतो, “हे अल्ला, इस शिवाजी का में क्या करू?” त्यानंतर, शाहिस्तेखानला औरंगझेब बंगालला धाडतो.

तानाजी मालुसरे आणि मराठा साम्राज्याबद्दल त्यांची निष्ठा:

पुरंदरच्या संधिनंतर काही महिन्यांनी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, “कोंढाणा शत्रूच्या ताब्यात असणे स्वराज्यासाठी चांगले नाही, तो मुघलांकडून परत स्वराज्यात आण”. पुणे, महाराष्ट्र मधील सर्वात मजबूत किल्ला म्हणजे कोंढाणा.

हा किल्ला जमिनीपासून ७६० मीटर्स आणि समुद्रसपाटीपासून १३१२ मीटर्स उंचीवर होता. तानाजी, शिवाजी महाराजांच्या जुन्या सहकार्यांपैकी एक होता. तो महाराज आणि त्यांचे कुटूंब यांना त्याचा मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी रायगडावर गेला होता. शिवाजी महाराजांनी त्याला सांगितले की, ते लग्नाला येऊ शकणार नाही, कारण त्यांना कोंढाण्याच्या मोहिमेवर जायचे होते.

कोंढाण्याच्या कामगिरीसाठी तानाजीची निवड:

तानाजी म्हणाले, “अशा मोहिमेसाठी जर आपल्याला जाण्याची वेळ आली, आमचा काय उपयोग? आता रायबाचे (तानाजीचा मुलगा) लग्न कोंढाणा सर केल्यावरच लागेल. त्या वेळी तानाजी महाराजांना म्हणतात, “आधी लग्न कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे!” शिवराय तानाजीला कोंढाण्याच्या कामगिरीला जाण्याची परवानगी देतात. मग तानाजी जिजामातांचा आशीर्वाद घेऊन, भाऊ सूर्यजी मालुसरे याला बरोबर घेऊन कामगिरीला जातात.

सिंहगड किल्ल्यावरील भयंकर युद्ध:

तानाजीची सहकार्यांसह कोंढाणा सर करण्याची योजना:

त्यांनी कोंढाणा सर करण्याची योजना सुरू केली. सर्वप्रथम, तो 300 सहकार्यांसह कोंढाणाच्या पायथ्याशी गेला. किल्ल्याची संपूर्ण माहिती काढून, कमी पहारेकरी असणाऱ्या आणि कोणीही विचारही करू शकणार नाही, अशा कड्यावरून किल्ल्यात प्रवेश करण्याचा बेत तानाजीने आखला.

कोंढाणाचे चढाई करणे सोपे नव्हते कारण कोंढाणा किल्ल्याची कडे खूप सरळ होती. पण, मराठे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सैर करण्यात पटाईत होते. अशा पाच- सहा मावळे सफाईने सरसर चढत वर गेले आणि त्यांनी दोर एका झाडाला बांधला. उर्वरित सैन्याने सहजपणे वर आणण्यासाठी दोर खाली फेकला.

अशाप्रकारे, तानाजीबरोबरचे सर्व मावळे गडावर पोचले आणि घनघोर युद्ध चालू झाले.

किल्लेदार उदयभानसह लढाईः

कोंढाण्यावर युद्धाचे नगाडे वाजू लागले, तानाजी किल्ल्याच्या कमांडर उदयभानशी लढत होते. उदयभान हा अत्यंत धाडसी आणि कडक किल्लेदार होता. किल्ल्यावरील नियम आणि सुरक्षा याबाबत तो खूप कठोर होता. तो राजपूत होता आणि मिर्झा जयसिंह याने त्याला कोंढाण्याची जबाबदारी दिली होती.

तानाजीची ढाल:

तानाजी आणि उदयभान दोघेही त्वेषाने लढतात. कोणीच माघार घेत नव्हता, दोघांनीही शर्थीची झुंज केली. अचानक, तानाजीची ढाल तलवारीच्या घावाने तुटते. मग, तानाजी मस्तकाला बांधलेला शेला हाताला गुंडाळतात आणि त्या शेल्यावर तलवारीचे घाव घेत लढत राहतात. दोघेही शेवट रक्तबंबाळ अवस्थेत धारातीर्थी पडतात. दोघेही धारातीर्थी पडल्यानंतर, सूर्याजी कल्याण दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करतो.

भाऊ तानाजी पडलेला पाहून सूर्याजीला दुःख होते, पण त्याला माहित होते वेळ दुःख करत बसण्याची नाही. त्या वेळी आपला सरदार (तानाजी) धारातीर्थी पडल्याचे पाहून, मराठा सैन्य धैर्य गमावते. मावळे सैरावैरा पळू लागले. त्याचवेळी सूर्याजी गडावरून खाली जाण्याचा दोर कोपून टाकतो. त्या वेळी ते मावळ्यांना म्हणतात, “मी बाहेर जाण्याचा दोर कापून टाकला आहे, आता एक तर शत्रूशी लढून मरा, नाहीतर गडावरून उडया टाकून जीव द्या!” आणि मुगल सैन्यांशी लढा देण्यासाठी प्रोत्साहित केले.

मराठा मावळे प्राणपणाने लढतात आणि कोंढाण्याच्या किल्ल्यावर भगवा फडकावतात, मराठे युद्ध जिंकतात.
रायगडावर शिवाजी राजे आणि जिजामातांना बातमी कळते की, कोंढाणा सर झाला, पण त्यामध्ये तानाजी धारातीर्थी पडला. शिवाजी राजे आणि जिजामातांना खूप दु: ख होते. शिवरायांना आपला जुना साथीदार गमावल्याची खंत होते. त्यावेळी महाराज उदगारतात

गड आला, पण सिंह गेला!CLICK TO TWEET

तानाजी मालुसरे यांनी केलेल्या पराक्रम आणि बलिदानाच्या स्मृती म्हणून शिवाजी महाराजांनी कोंढाण्याचे नाव “सिंहागड” असे ठेवले. आजही सिंहगडावरील तानाजीचा भव्य पुतळा पर्यटकांचे आकर्षण आहे.

पुरंदरचा घेरा- मुरारबाजीची शर्थीची झुंज:

पुरंदर हा पुण्याच्या दक्षिणेस शिवाजी महाराजांचा एक महत्वाचा किल्ला होता. महाराजांनी सूरत लुटल्यानंतर, औरंगजेब अतिशय क्रोधित झाला आणि मुघल सेनापती प्रमुख मिर्जा जयसिंग आणि दिलेरखान यांच्याबरोबर मोठी सेना पाठविली. पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे होते. ते शिवाजी महाराजांच्या पराक्रमी आणि धाडसी योद्धांपैकी एक होते.

पुरंदरची लढाई:

मुरारबाजी हिंदवी स्वराज्याशी एकनिष्ठ होते. मुरारबाजी सैनिकांचा तुटवडा असताना देखील माघार न घेता, किल्ल्यावरील फक्त 700 सैनिकांसह युद्धासाठी सज्ज झाले. हल्ला सुरू केला, किल्ल्याच्या उंचीचा फायदा घेतला आणि मुगल सैन्यावर बाणांचा हल्ला केला. त्याने दोन्ही हातांनी तलवार घेऊन लढाई सुरू केली. मुरारबाजी आणि मावळ्यांनी शेकडो मुघल सैन्यांचा वध केला.

दिलेरखानने मुरारबाजीचा प्रचंड धैर्य आणि पराक्रम पाहिला. दिलेरखानाने सांगितले, तू आमच्या बाजूने ये, तू मुघलांची साथ दे, मुघल बादशाह तुला चांगल्या औध्याची नोकरी आणि जहागिरी देतील.
मुरारबाजींनी दिलीरखानला सांगितले की, “औरंगजेबच्या छावणीत राहण्यापेक्षा मी जीव देईल, मुघलांची जहागिरी पाहिजे कुणाला, आम्हाला कशाची कमी आहे?”

मुरारबाजी आता दिलेरखानाच्या दिशेने आक्रमण करत सुटतो. दिलेरखान हत्तीवर बसलेला असतो, तो मुरारबाजीच्या दिशेने बाण सोडतो. त्या बाणाने मुरारबाजी धारातीर्थी पडतो. तरी सर्व मावळे शेवटच्या क्षणापर्यंत लढतात, भयानक रक्तपात होतो. पुरंदरची माती मुरारबाजी आणि मावळ्यांच्या रक्ताने पावन होते. गड मुघलांच्या ताब्यात जातो.

शिवाजी महाराजांना या बातमीने खूप दुःख होते. एक-एक साथीदार गमावण्यापेक्षा काही काळ माघार घेणे ठीक. म्हणून, महाराज तह करण्यासाठी मिर्झा जयसिंगशी भेटायला जातात.

पुरंदरचा तह:

शिवराय खूप चालाखीने मिर्झा जयसिंगशी बातचीत करतात. पण, मिर्झा जयसिंग शिवरायांना तह करून, दिल्लीला मुघल बादशाहला भेट घ्यायला सांगतो.
या तहानुसार महाराजांना त्यांचे ३६ पैकी २३ किल्ले आणि ४ लाख होन उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना द्यावा लागतो. हा तह इसवी सन १६६५ मध्ये झाला होता.

शिवाजी महाराजांचा रायगडावरील राज्याभिषेक:

स्वराज्याची घौडदौड जोरात चालू असते, जिजामाता शिवरायांना म्हणतात हीच ती वेळ आहे राज्याभिषेक करून सर्व जगाला सांगण्याची. जिजामातेच्या आदेशामुळे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी खूप महिने आधीपासून चालू होती.

अखेर तो दिवस उजाडला, तारीख ६ जून, इसवी सन १६७४ गडावर पहाटेच्या वेळी मंत्रोच्चारण आणि विविध संस्करांनी महाराजांवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवरायांनी किमान दीड लाख होन ११००० ब्राह्मणांना दान केले. त्याचबरोबर आभूषणे, वस्त्रे, वस्तू, अन्नपदार्थ आणि वेगवेगळ्या सात धातूंच्या महाराजांच्या वजनाबरोबर तुला झाल्या. तसेच, देवदर्शन करून शिवरायांनी शस्त्रांची पूजा केली त्यानंतर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली.

शिवरायांनी मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दरबारी कक्षामध्ये प्रवेश केला. ३२ शकुन चिन्हांनी सजलेले ३२ मण सोन्याच्या भव्य सिंहासनावर शिवाजी महाराज आरूढ होतात. खास काशीहून बोलावलेले विद्वान ब्राम्हण पंडित गागाभट्ट महाराजांच्या डोक्यावर छत्र धरून शिवरायांना छत्रपती घोषित करून त्यांना आशीर्वाद देतात.

सर्वत्र आनंदाचे वातावरण होते, जिजामातांना खूप आनंद झाला. पण शिवरायांना एक खंत मनामध्ये होती की ज्या साथीदारांमुळे त्यांना हे मिळाले होते ते आज त्यांच्याबरोबर नव्हते. शिवाजी महाराज त्या दिवशी खऱ्या अर्थाने रयतेचे छत्रपती झाले.

शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका:

पुरंदरच्या तहात ठरल्याप्रमाणे शिवराय १२ मे, १६६६ रोजी ५००० घोडेस्वार घेऊन आग्र्याला गेले. दख्खनचा राजा येणार आहे ही बातमी कळल्यावर संपूर्ण आग्रा महाराजांना बघण्यासाठी आले होते. सर्व लोक उत्सुकतेने पाहत होते की,
असा कोणता राजा आहे? ज्याने औरंगजाची झोप उडवून, त्याला सळो की पळो करून सोडले आहे!

शिवरायांच्या अपमानाची दरबारातील तयारी:

शिवाजीराजे येणार म्हणून औरंगझेब, मुद्दाम त्याचे तख्त उंच करून घेतो. दरबारात जाण्याच्या मार्गात माणसाच्या गळ्यापर्यंत लागेल असा वरून पडदा टाकलेला असतो जेणेकरून महाराज आतमध्ये येताना वाकून यावे लागेल.

औरंगझेबाच्या दरबारात शिवाजीराजे:

शिवाजी महाराजांच्या सर्व साथीदारांना बाहेर थांबवले गेले. शिवराय आणि शंभूराजे याना पादत्राणे बाहेर काढायला सांगितले जाते, दरबारी रिवाज म्हणून शिवराय ते मान्य करतात. दरबारात प्रवेश करण्यापूर्वी पडदा मध्ये टाकलेला असतो, औरंगझेबाला वाटते आता शिवाजीला झुकावे लागेल, पण महाराज पडदा हाताने वर करून दरबारात प्रवेश करतात.

ठरल्याप्रमाणे दरबार चालू होतो, महाराजांना दरबारात मदतीसाठी रामसिंग हा मिर्झा जयसिंघाचा मुलगा बरोबर असतो. रामसिंग त्याच्या बादशाहपुढे शिवरायांना कॉर्निश करायला सांगतात, पण महाराज तयार होत नाहीत. त्याऐवजी, शिवरायांनी दिल्लीचे तख्त जिथे पृथ्वीराज चौहानांसारख्या राजांनी भारतभूमीसाठी रक्त सांडले अशा त्या तख्ताला महाराजांनी नमन केले.

त्यानंतर, शिवराय आणि युवराज संभाजी औरंगझेबापुढे जातात आणि दोघांच्या हस्ते नजराणे भेट दिले जातात. परंतु, औरंगझेबाचा हेतू वेगळा होता, त्याने शिवरायांना मनसबदारांच्या रांगेत सर्वांत मागच्या रांगेत उभे केले. शिवाय, शिवाजी महाराजांपुढे उभे राहण्याचीदेखील लायकी नसणाऱ्या जसवंतसिंगाला रांगेत पुढे उभे केले.

शिवरायांनी औरंगझेबाचा हेतू लगेच ओळखला, आता शिवरायांना रोखणे कठीण होते. शिवराय मोठ्याने म्हणाले, “मराठ्यांना पाठ दाखवून पाळणारा हा जसवंतसिंग, आमचे याच्यापेक्षा दुय्यम स्थान आहे?” रामसिंग महाराजांना शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण शिवराय म्हणतात,

एकवेळ आम्ही मरण पत्करू, पण अपमान नाही! -शिवराय

शिवराय आता रागाने लाल झाले होते. औरंगझेबाच्या दरबारात वर मान करून बघण्याचीही कुणाची हिम्मत नव्हती. शिवरायांच्या शब्दांनी औरंगझेबच्या दरबारात शांतता पसरली होती. महाराज रागातच दरबारातून निघून जातात. त्यानंतर, औरंगझेब महाराजांना फौलाद खान याच्या देखरेखेखाली नजरबंद करतो.

यानंतर महाराज या नजरकैदेतून कधी आणि कसे बाहेर पडले हे कुणालाच पक्के माहित नाही. काही मुघल दस्थाऐवजांप्रमाणे महाराज मिठाईच्या पेटाऱ्यातून १७ ऑगस्ट, १६६६ रोजी बाहेर पडले. पण, इतिहासामध्ये तेच लिहिले जाते ज्याबद्दल ठोस पुरावा आहे. त्यामुळे जरी ही कहाणी मुघलांच्या कागदपत्रांतून मिळाली असली, तरी इतिहासात त्यालाच सत्य मानले जाते. ही कहाणी तुम्ही इतिहासात एकदातरी वाचली असेल,

ती कहाणी पुढीलप्रमाणे:

शिवाजी महाराजांना माहित होते, औरंगझेब हा खूप क्रूर आणि निर्दयी आहे, दिल्लीचे तक्त मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्या भावांनादेखील सोडले नव्हते. त्याने शिवाजी महाराजांना काही करायच्या आत, महाराजांनी या पेचप्रसंगातून बाहेर पडण्याची एक युक्ती केली. त्यावेळी शिवरायांबरोबर सेवेसाठी रघुनाथ कोरडे, त्र्यंबक डबीर, हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर होते. शिवाजी महाराजांनी औरंगझेबाला एक पत्र लिहिले त्यामध्ये त्यांनी त्यांच्या “बरोबर आलेल्या सैन्याला परत जाऊ द्यावे” अशी मागणी केली. औरंगझेबाने ती मान्य करून सैनिकांना परत पाठवले. त्यानंतर, शिवरायांनी आपण खूप आजारी आहोत, असे सोंग केले. आपण खरेच आजारी आहोत याचा विश्वास व्हावा, म्हणून शिवराय दिवसभर झोपून राहायचे, दिवसाआड वैद्याला बोलवायचे.

यानंतर, महाराजांनी दुसरे एक पत्र लिहिले त्यामध्ये महाराजांनी औरंगझेबला, “आजारपण ठीक व्हावे त्यासाठी, दान-धर्म म्हणून गरिबांना, साधू- संतांना मिठाई वाटप करण्याची मुभा द्यावी” असे लिहिले. औरंगझेबाने ती मागणीही मान्य केली महाराजांच्या छावणीतून रोज मिठाईचे मोठे पेटारे बाहेर जायचे. महाराजांच्या छावणीबाहेर कडक पहारा होता, रोज पहारेकरी पेटारे उघडून पाहणी करत. पण काही दिवसांनी पहारेकरी या कामाला कंटाळले आणि पेटाऱ्यांची पाहणी न करता पेटारे बाहेर जाऊ लागले.

महाराजांना अशाच एका संधीची गरज होती, दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ ऑगस्ट, १६६६ रोजी एका पेटाऱ्यात शिवराय आणि दुसऱ्या पेटाऱ्यात युवराज शंभूराजे बसून औरंगझेबाच्या नजरकैदेतून बाहेर पडले. इकडे हिरोजी फर्जंद शिवाजी महाराज म्हणून त्यांच्या जागी झोपला आणि मदारी मेहतर त्याचे पाय चेपत त्याची सेवा करत बसला. जेणेकरून महाराज आराम करत आहे असे वाटावे. दुसऱ्या दिवशी, महाराज सुखरूप आग्र्यावरून बाहेर पडल्यानंतर, हिरोजी आणि मदारी दोघे “महाराजांचे औषध आणण्यासाठी चाललो”, असे सांगून बाहेर पडतात.

मुघल छावणीमधील गोंधळ:

छावणीमध्ये कोणीच नसल्याचे काही वेळाने पहारेकर्यांना कळते. फौलाद खानची तारांबळ उडते, काय करावे त्याला सुचत नाही. औरंगझेबला जेव्हा ही बातमी सांगतो तेव्हा औरंगझेबाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. औरंगझेब रागाने लाल होतो आणि शिवराय आणि त्यांच्या साथीदारांची शोधमोहीम चालू करतो. त्यामध्ये दुर्दैवाने रघुनाथ कोरडे आणि त्र्यंबक डबीर फौलाद खानाला सापडतात. शिवरायांचे हे स्वामिनिष्ठ साथीदार तोंडातून शब्दही न काढता मरणाला सामोरे जातात. मुघल सरदार त्यांना खूप हालहाल करून मारतात.

तिकडे शिवराय हे युवराज संभाजी याला मथुरेत विश्वासराव यांच्याकडे ठेऊन पुढे जातात. वाटेत ठिकठिकाणी शत्रूशी सामना होतो, तेव्हा त्याची तयारी म्हणून महाराजांनी आधीच वेषांतर केलेले होते. इतिहासकारांच्या मते मथुरा- अलाहाबाद- बनारस- गया- गोंडवन- गोवळकोंडा हा महाराजांचा आग्रा ते राजगडावर येण्याचा एक मार्ग असू शकतो. मुघलांची शोधमोहीम पूर्ण उत्तर भारतामध्ये चालू असते. शिवाजी महाराज पोचतात तेव्हा ती बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरते. शिवराय मुद्दाम संभाजी महाराज वाटेत मरण पावल्याची बातमी सर्वत्र पसरवतात. त्यामुळे, युवराज संभाजीला शोधण्याची मुघलांची मोहीम ठप्प होते. उत्तरेत वातावरण शांत झाल्यावर विश्वासराव स्वतः संभाजीला घेऊन राजगडावर येतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्ट प्रधान मंडळ:

शिवाजी महाराजांचे अष्ट प्रधान मंडळ मराठा साम्राज्याच्या दरबारात आठ निवडलेल्या मंत्र्यांची प्रशासकीय संस्था होती. प्रत्येक मोहिमेत मंत्र्यांच्या या परिषदेची महत्त्वाची भूमिका होती.

अष्टप्रधान मंडळ किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्र्यांचे परिषद खालील प्रमाणे आहेत:

पेशवे किंवा प्रधान (पंतप्रधान):

मराठा साम्राज्यात हे सर्वात महत्त्वाचे पद होते. त्याच्याकडे सर्व सैन्य अधिकार होते, ते प्रशासकीय कामकाजाचे, सामाजिक कल्याणाशी संबंधित होते. त्यांच्याकडे आताच्या पंतप्रधानाकडे असणारे सर्व अधिकार होते.

अमात्य / मजूमदार (अर्थमंत्री):

यांच्याकडे सर्व आर्थिक बाबी हाताळणे, तसेच मराठा साम्राज्याचे राजेशाही खजिन्याचे खातेही होते.
मंत्री (गृहमंत्री): त्यांच्याकडे गुप्तचर विभाग खात्याच्या जबाबदारी होत्या.

सुमंत (परराष्ट्र मंत्री):

इतर राज्यांशी राजकीयदृष्ट्या चांगले संबंध राखणे ही त्यांची मुख्य कर्तव्य होती.

पंत सचिव (सचिव):

दररोज दरबारी कार्यवाही करणे आणि राजाच्या सर्व संप्रेषणांचे व्यवस्थापन करणे आणि राजासाठी घोषणा तयार करणे ही त्यांची कर्तव्य होती.

पंडित राव (महायाजक):

ते धार्मिक बाबींचे प्रमुख होते. सर्व धार्मिक कामे पार पाडण्याचे त्यांचे कर्तव्य होते. धार्मिक उत्सव किंवा समारंभ यांसारख्या धर्माशी संबंधित तारीख निश्चित करणे हे देखील काम करत असत.

न्यायाधीश (मुख्य न्यायाधीश):

सार्वजनिक, गुन्हेगारी आणि लष्करी कारवायांना न्याय देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

सेनापति (कमांडर इन चीफ):

ते सर्व सशस्त्र सैन्याचे प्रमुख होते आणि राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मराठा सैन्यात नवीन सैनिक निवडून, नवीन शस्त्रे खरेदी करणे यासारख्या सर्व कार्यांसाठी ते जबाबदार होते.

शिवाजी महाराज यांच्या मृत्यूचे कारण:

काहींच्या मते महाराजांना त्यांच्या काही मंत्र्यांनी फितुरी करून अन्नामध्ये विष देण्यात आले. अन्नजीपंत सुरानविस, मोरोपंत पिंगले, बाळाजी चिटणीस, राहुजी सोमनाथ आणि हिरोजी फरजंद यांचे नाव या काटकारस्थानामध्ये रचले जाते. पण त्या षड्यंत्राचा कोणताही पुरावा अद्याप मिळाला नाही.

इतिहास लिहिण्यासाठी पुराव्याचा आधार घेतला जातो, पुराव्याशिवाय इतिहास इतिहासकार स्वीकारत नाहीत. इतिहास संशोधकांच्या मते शेवटच्या दिवसांत शिवरायांना ताप आणि अतिसार झाला होता. अखेर 3 एप्रिल 1680 रोजी मराठ्यांच्या इतिहासातील तो काळा दिवस उजाडला आणि मराठी अस्मितेला जागृत ठेवणारा तो सूर्य कायमचा मावळला.

shivaji maharaj samadhi photo
Shivaji Maharaj Samadhi – Raigad Fort By Sa napster

इतरधर्मीयांविषयी शिवरायांचे धोरण:

शिवाजी महाराज हे हिंदुधर्मीय होते, म्हणून काही लोकांना ते मुस्लिम धर्मियांविरुद्ध होते असे वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मातील लोकांना समान वागणूक दिली होती.

आयुष्यात त्याने बरीचशी युद्धे केली पण कोणत्याही लढाईत कोणत्याही देवस्थानला मारा होऊ दिला नाही. त्यांनी कधीच स्वतः हिंदू होते, म्हणून इतर धर्मीय लोकांना धर्मपरिवर्तन करायला लावले नाही.

त्यांच्या राजदरबारात कित्येक मुसलमान सरदार, सैनिक होते. सिद्धी इब्राहिम खान हा शिवरायांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. जर शिवाजी महाराज हे मुस्लिमविरोधी असते तर त्यांनी एवढ्या उच्च पदावर एका मुसलमान व्यक्तीला का ठेवले असते?

छत्रपती शिवरायांचा कोणत्याही जाती किंवा धर्माविरुद्ध लढा नव्हता, तर परकीय शासकांमुळे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध होता. या जुलमी राजसत्ता स्वतःच्या स्वार्थापोटी प्रजेचे हालहाल करायचे.

शिवरायांची दूरदृष्टी:

आदिलशाह, निजामशाह, मुघल यांच्यासारख्या बलाढ्य शत्रूंविरुद्ध लढायचे तर मूठभर सैनिकांबरोबर उघड्या मैदानात निभाव लागणे कठीण. तसेच, चारही बाजूने शत्रू अशा विपरीत परिस्थितीत लढण्यासाठी दुर्गम किल्ले आणि गडकोटांचे महत्व शिवरायांनी अगदी लहान वयात जाणले.

ज्याचे किल्ले, त्याचे राज्य !

या सूत्राप्रमाणे त्यांनी स्वराज्याची वाटचाल चालू केली. शिवरायांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत ३५० किल्ले मराठी अधिपत्याखाली आणले.

परदेशी आक्रमणांपासून समुद्र किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी आरमाराची गरज होती. त्यासाठी त्यांनी प्रबळ आरमार उभे केले होते. त्यांमुळे, त्यांना भारतीय नौसेनेचे जनक म्हणतात.

शिवरायांनी स्वराज्याचा भक्कम पाया रचला पुढे हेच स्वराज्य छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दक्षिणेत वेल्लोर, कालिकतपासून ते उत्तरेत अटक, कटकपर्यंत धडक मारली.
त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला स्वराज्याचा राज्यकारभार करताना महाराजांची दूरदृष्टी दिसते. शिवरायांनी राज्यातील रयतेला सुखाने जगता यावे म्हणून त्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अशा महान राजाला माझा मानाचा मुजरा!

ऐसा युगे युगे स्वर्णीय सर्वदा । माता पिता सखा शिवभूप तो ॥ Click to Tweet

जय जिजाऊ!

जय शिवराय!!

I hope you like this Chhatrapati Shivaji Maharaj Information in Marathi. If you like this article then spread it over social media and help us to make information available freely for native readers.

Feature Image Credits: Image Credits: Chinmaya Panda under CC BY-SA

Share via

Sharing is a way to encourage us !

Sharing quality content encourage us to keep creating more relevant content for you. So, appreciate us by sharing this piece of content!
I will share it later!

Join our list

Subscribe to our list and get newsletters directly to your inbox

Please check your inbox to confirm your subscription

Something went wrong.

Do not send me a FREE STUFF!

Join our list

Subscribe to our list and get newsletters directly to your inbox

Please check your inbox to confirm your subscription

Something went wrong.

Do not send me a FREE STUFF!
 
Send this to a friend