राजर्षी शाहू महाराज माहिती मराठीमध्ये – इतिहास, शिक्षण, कार्ये

by मार्च 20, 2024

परिचय

भगवत गीतेमध्ये कृष्णाने म्हटले आहे की, कालबाह्य परंपरांचे आंधळेपणाने पालन करण्यापेक्षा, कर्तव्य समजून नैतिक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. त्यांच्यानुसार, धर्माला काळानुरूप अद्ययावत करणे आवश्यक असते.

आजच्या तुलनेत १९ व्या शतकात भारतातील समाजव्यवस्था जातीवादासारख्या परंपरांचा अंमल करून विभागली गेली होती. त्यामुळे समाजातील नेत्यांनी समाजातील लोकांमध्ये समानता आणण्यासाठी प्रयत्न करणे जरुरी होते. राजर्षी शाहू महाराज हे पहिले राज्यकर्ते होते ज्यांनी अस्पृश्यांसह मागासलेल्या आणि निम्नवर्गीय लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

राजा असूनही त्यांना वेदोक्त वादासारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. या वादात ब्राह्मण पुरोहितांनी शाहू महाराजांचे वैदिक संस्कार करण्यास नकार दिला होता. कोल्हापूरचे मुख्य पुजारी, शंकराचार्य अभिनव शंकरा भारती आणि अगदी लोकमान्य टिळकांसारख्या थोर नेत्यांनीही ब्राह्मण पुरोहितांची बाजू घेतली.

जातीव्यवस्थेच्या आधारे समाज किती प्रमाणात विभागला होता हे या घटनेवरून आपल्या मनात चित्रित करता येईल. उच्च वर्गाकडून खालच्या वर्गावर होणारा अन्याय शाहू महाराजांनी पाहिला. स्वत: राजा असूनदेखील त्यांना समाजातील जातिभेदाला सामोरे जावे लागले.

अशा समाजात सर्वसामान्यांची काय अवस्था असेल, याची आपण कल्पनाच करू शकतो. अशा काळात अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे महान कार्य त्यांनी केले.

या चरित्रात मी शाहू महाराजांचे सविस्तर जीवनचरित्र दिले आहे. त्यांनी आजकालच्या नेत्यांद्वारे दिलेल्या खोट्या आश्वासनांनी आणि नुसत्या भाषणांनी नव्हे, तर त्यांच्या कार्यातून भारताची जडण-घडन केली. या लेखाद्वारे आपणाला राजर्षी शाहू महाराज यांनी समाजासाठी केलेल्या योगदानांचा आढावा मिळेल.

त्यांची तपशीलवार माहिती दिली असल्याने चरित्र काहीसे मोठे आहे. त्यामुळे आपण भविष्यातील संदर्भासाठी हे पृष्ठ बुकमार्क करा. ज्यामुळे भविष्यात उर्वरित माहिती वाचण्यासाठी हवे तेव्हा या पृष्ठावर पुन्हा भेट देता येईल.

कोल्हापूरच्या न्यू शाहू पॅलेस संग्रहालयातील राजर्षी शाहू महाराजांचे चित्र
कोल्हापूरच्या न्यू शाहू पॅलेस संग्रहालयातील राजर्षी शाहू महाराजांचे चित्र


संक्षिप्त माहिती

घटक
माहिती
ओळख
राजर्षी शाहू महाराज हे १९व्या शतकातील कोल्हापूरचे अतिशय लोकप्रिय राजे आणि समाजसुधारक होते. त्यांची ओळख त्यांच्या कार्याद्वारे स्पष्ट होते.
जन्म
२६ जून, इ. स. १८७४
शिक्षण
सर स्टुअर्ट फ्रेझर यांच्याकडून प्रशासकीय बाबी आणि राजकुमार कॉलेज, राजकोट येथे औपचारिक शिक्षण. (१८८५ – १८८९)
टोपणनाव
आबासाहेब
राज्याभिषेक
राज्याभिषेकापुर्वीचे नाव: यशवंतराव जयसिंगराव घाटगे, राज्याभिषेकाचे साल: इ. स. १८९४
शासनकाल
इ. स. १८९४ – इ. स. १९२२
पालक
आई: राधाबाई, वडील: जयसिंगराव घाटगे
पत्नी
सौ. लक्ष्मीबाई
मृत्यू
६ मे, इ. स. १९२२ साली मुंबई या ठिकाणी

इतिहास

शाहू महाराज शाही पोशाखात बसलेले असताना पॅलेसच्या आवारात काढलेले छायाचित्र
शाहू महाराज शाही पोशाखात बसलेले असताना पॅलेसच्या आवारात काढलेले छायाचित्र

असे मानले जाते, शिवाजी चतुर्थ याने इ. स. १८६३ ते इ. स. १८८३ या काळात राज्य केले. त्यांनी कोल्हापूरच्या मराठा गादीवर महाराजा म्हणून राज्य केले. पण तो त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या आयुष्यात मरण पावला म्हणून, सिंहासनावर थेट वंशज नव्हते. म्हणून, शिवाजी चौथ्याच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. मग राज्याभिषेकाच्या वेळी तिने त्यांचे शाहूजी असे नामकरण केले.

तर, शाहू चौथा कोल्हापूरच्या गादीचा राजा झाला. मराठा राज्य वेगळे झाल्यानंतर, ताराबाईंनी इ. स. १७१० मध्ये कोल्हापूरची गादी स्थापन केली. त्यांनी आपला मुलगा शिवाजी दुसरा याला कोल्हापूर प्रांताचा पहिला महाराजा बनवले.

कोल्हापूर शहरातील स्थानिकांच्या मते लोक त्यांना छत्रपती म्हणतात. तर काही लोक छत्रपती ही पदवी फक्त शिवाजी महाराज यांच्या सातारा गादीसाठी राखीव असावी असे मानतात.

या लेखात मी राजर्षी शाहू महाराज म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहू चतुर्थ यांच्याबद्दल बोलत आहे.

चार वेगवेगळे शाहू महाराज सातारा आणि कोल्हापूरच्या गादीवर झाले. त्यामुळे इंटरनेटच्या माहितीत खूप गोंधळ पाहायला मिळतो. मी इथे ज्या राजाचा उल्लेख करत आहे, हे म्हणजे शाहू चतुर्थ जो राजर्षी शाहू महाराज म्हणूनही लोकप्रिय आहे.

इतिहासात अनेक राजे झाले, पण शाहू राजे म्हणजे जातीभेद न पाळता लोकांना जवळ आणणारा एकमेव राजा. ते नेहमी मानवतेलाच प्राथमिक घटक मानायचे.

शाहू महाराजांचा असा विश्वास होता की,

खरा वारसा वडिलोपार्जित मिळत नसतो, तो स्व-कर्तृत्वाने मिळवावा लागतो.

त्याचा असा विश्वास होता,

समाजाचे कल्याण म्हणजे स्वतःचे कल्याण.

आपण शाहू महाराजांना “राजर्षी” या उपाधीने ओळखतो ज्याचा अर्थ “शाही संत” असा होतो.

कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि साताराचे छत्रपती शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज यांनी ब्रिटिश राजवटीची सत्ता असताना आणि त्यांच्याकडे मर्यादित अधिकार असताना अनेक समाजसुधारक कार्ये केले. आपल्यापैकी बरेच जण सातारा येथील छत्रपती शाहू पहिले आणि मराठा साम्राज्यातील कोल्हापूरच्या गादीवरील राजे आणि अग्रणी समाजसुधारक अशी प्रसिद्धी असलेल्या छत्रपती शाहू चौथे यांच्यामध्ये गोंधळलेले दिसतात.

बरेच विशेषतः मराठी लोक, त्या दोघांनाही एकच व्यक्ती मानतात. त्यामुळे मी प्रथमतः या दोन्ही राजांबद्दल सांगून त्यांच्यातील फरक स्पष्ट करू इच्छितो. सातारा येथील छत्रपती शाहू महाराज यांना शाहू पहिले म्हणूनही ओळखले जाते. ते मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती होते. ते संभाजी राजे यांचे पुत्र आणि शिवाजी महाराज यांचे नातू होते. तसेच शाहू पहिले हे “सातारा” गादीचे छत्रपती होते.

कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज यांना “शाहू चौथे” आणि “छत्रपती शाहूजी महाराज” म्हणूनही ओळखले जाते. ज्यांचा शिवाजी महाराज यांच्या घराण्याशी थेट रक्तसंबंध नव्हता. शिवाजी चौथे कोल्हापूरच्या गादीचे छत्रपती असताना त्यांच्या पत्नी आनंदीबाईंनी शाहूजींना दत्तक घेतले होते.

खुर्चीवर बसलेले शाहू महाराजांचे छायाचित्र
खुर्चीवर बसलेले शाहू महाराजांचे छायाचित्र

ताराबाईंद्वारे कोल्हापूरची गादी स्थापित केल्यानंतर, त्यांच्या मुलाला म्हणजेच शिवाजी द्वितीय याला पहिले महाराजा बनवण्यात आले. याच गादीवर पुढे शाहू चतुर्थ यांनी शासन केले ज्यांच्या संदर्भात हे जीवनचरित्र आहे. जे राजर्षी शाहू महाराज म्हणूनही लोकप्रिय होते.

जन्म आणि बालपण

शाहूजी महाराजांच्या बालपणात त्यांचे नाव ‘यशवंतराव’ होते. त्यांचा जन्म कागल गावातील घाटगे कुटुंबात झाला.

त्याचे वडील गावाचे प्रमुख होते आणि आई मुधोळ घराण्याची राजकुमारी होती. केवळ ३ वर्षांचे असताना यशवंतराव, त्यांच्या आईचे २० मार्च, १८७७ रोजी निधन झाले.

त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या वडिलांनी घेतली. कोल्हापूरमधील राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये आणि धारवाड येथे शाहूजींनी त्यांचे औपचारिक शिक्षण पूर्ण केले. सर स्टुअर्ट फ्रेझरकडून त्यांनी प्रशासकीय बाबी जाणून घेतल्या.

तथापि, ते शाही घराण्यातील नव्हते, त्यांच्याकडे होते ते प्रबळ नेतृत्वक्षमता आणि कतृत्वक्षमता. कोल्हापूरच्या गादीवरील शिवाजी चौथे यांच्या निधनानंतर, आनंदीबाईंनी यशवंतराव अवघे १० वर्षांचे असताना त्यांना दत्तक घेतले होते.


विवाह

बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांची कन्या “लक्ष्मीबाई खानविलकर” यांच्याबरोबर इ. स. १८९१ मध्ये शाहूजींचा विवाह झाला. त्यांच्या मुलांचे नाव शिवाजी आणि राजाराम, तसेच मुलींचे नाव राधाबाई आणि आऊबाई असे होते.

HistoryFiles च्या मते, शाहूजींनी इ. स. १७४५ मध्ये फतेहसिंह प्रथम भोंसले आणि राजाराम II यांनाही दत्तक घेतले. परंतु, स्त्रोतामध्ये नमूद केलेले दत्तक पुत्र वर्ष शाहू महाराजांच्या जन्मापूर्वीचे आहे. त्यामुळे जरी त्यांनी दोन मुले दत्तक घेतले असले तरी, ते इ. स. १८४५ मध्ये नाही तर ते इ. स. १८९२ नंतर दत्तक घेतले असावेत.

कारकीर्द

इ. स. १८९४ मध्ये कोल्हापूरचे १९ वर्षीय शाहू महाराज ब्रिटिश रहिवासी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेटले तेव्हाचे छायाचित्र
इ. स. १८९४ मध्ये कोल्हापूरचे १९ वर्षीय शाहू महाराज ब्रिटिश रहिवासी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेटले तेव्हाचे छायाचित्र

२ एप्रिल १८९४ मध्ये शाहू महाराज करवीरभूमी मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर येथील गादीवर आले. शाहूराजे यांनी त्यांच्या २८ वर्ष्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक सामाजिक कार्ये केली. त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते जनमानसात लोकप्रिय बनले.

त्याकाळी, रूढीवादी उच्चवर्गीय समाजाचा निम्न जातीच्या लोकांवर होणार अन्याय शाहू महाराजांना सहन होत नसे. त्यामुळे, जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी अनेक कायदे केले.

तसेच केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी, स्वतः प्रत्येक कामकाजाची पाहणी त्यांनी केली.

राजर्षी शाहू महाराजांची कार्ये

शिक्षणक्षेत्र

एका बाजूला, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील राज्यकर्ते आदिवासी भागातील शाळा म्हणजे अनावश्यक खर्च मानून बंद करायला निघाले. तर दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले.

शाहूजींनी या कायद्याची अंमलबजावणीही केली. शिवाय ज्यांचे पाल्य (मुले) शाळेत येणार नाही अशा पाल्यांच्या पालकांना त्यावेळी १ रुपया दिवसाप्रमाणे दंडही केला. असा कायदा त्यांनी केला होता.

आताच्या काळात शिक्षणक्षेत्राकडे जेव्हा व्यापार करण्याच्या दृष्टीने पाहिले जाते तेव्हा, महाराष्ट्रातील समाजातील सर्व मुलांना शिकता यावे म्हणून बोर्डिंग शाळा, हायस्कूल यासाठी मदत करणारे शाहू महाराज आठवतात.
यावेळी एक प्रसंग आठवतो, जेव्हा भाऊराव पाटील यांना शाहू महाराजांनी स्वतःच्या पॅलेसमध्ये राहायला आणि शिकायला परवानगी दिली होती.

तेव्हा भाऊराव पाटील भारावून गेले, शाहू महाराजांच्या शिक्षणक्षेत्रातील दृष्टिकोनाने भाऊराव पाटलांना प्रेरित केले. त्यानंतर, भाऊराव पाटीलांनी रयतेतील ग्रामीण भागातील दीन-दुबळ्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी “रयत शिक्षण संस्था” उभी केली आणि कर्मवीर अशी उपाधी मिळवली. शाहू महाराजांनी त्यांच्या या संस्थेला वेळोवेळी मदतही केली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधील क्षमता ओळखून शाहू महाराज त्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींमध्ये मदतही करत असत.

कोल्हापूर म्हणजे “वसतिगृहांचे माहेरघर” असे म्हटले तर चुकिचे ठरणार नाही. या वसतिगृहांला पहिल्यांदा प्रत्येक जातीसाठी सुरु करणारे ते शाहू महाराज!

समाजातील दारिद्रय, अंधश्रद्धा, अज्ञान दूर करायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी, सर्व स्तरातील मुलांना शिक्षण मिळावे याकडे लक्ष्य केंद्रित केले. शाहूजींच्या कारकिर्दीत प्राथमिक शिक्षणासाठी कोल्हापूर संस्थानातून सर्वात जास्त खर्च केला गेला.

औद्योगिक क्षेत्र

औद्योगिक क्षेत्रात प्रगतीसाठी त्यांनी मोठमोठ्या बाजारपेठ वसवल्या. आताची भारतातील प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ शाहू महाराजांनी सन १८९५ साली वसवली होती.

कला क्षेत्र

भारतीय कुस्तीपटू एका कुस्तीच्या सामन्यादरम्यान
भारतीय कुस्तीपटू एका कुस्तीच्या सामन्यादरम्यान

शाहू महाराज कलेला नेहमी प्रेरणा दिली. त्यांनी जात-धर्म न पाहता अनेक कलावंताना राजाश्रय दिला होता. नाट्यक्षेत्रातील कलावंतांसाठी त्यांनी नाट्यगृहाची चांगली सोय केली.

कुस्ती तर शाहूजींचा आवडता छंद, शाहूजींनी देशातील अनेक तरबेज मल्लांना आश्रय दिला होता. त्यांनी कोल्हापूरमध्ये कुस्तीसाठी त्या काळी मोठे मैदान बांधले होते. त्याचा परिणाम म्हणून, महाराष्ट्रात मल्ल म्हटले की कोल्हापूरचे नाव घेतले जाते.

कोल्हापूरचे महाराज अधिकाऱ्यांसह कुस्तीचा सामना पाहताना गर्दीतील दृश्य
कोल्हापूरचे महाराज अधिकाऱ्यांसह कुस्तीचा सामना पाहताना गर्दीतील दृश्य

सामाजिक न्याय कार्य

शाहू महाराजांसंबंधी झालेले वेदोक्त प्रकरण

सन १९०० मध्ये झालेल्या वेदोक्त प्रकरणाच्या अनुभवातून महाराजांनी जाणले की, अस्पृश्य समाजाला उच्यवर्णीयांच्या जाचक अन्यायातून मुक्त केल्याशिवाय अस्पृश्य समाजाला न्याय मिळणार नाही. या प्रकरणानंतर शाहू महाराजांना सर्व ब्राह्मणी समाजाकडून टीकांचा वर्षाव झाला. विशेष म्हणजे, यामध्ये टिळकांचाही समावेश होता.

सत्यशोधक समाज आणि शाहू महाराज

शाहू महाराज यांचा ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधक समाजाला पाठिंबा होता. ज्योतिराव फुलेंच्या निधनानंतर प्लेगसारख्या नैसर्गिक विपदेमुळे तसेच प्रबळ नेतृत्वाच्या अभावामुळे सत्यशोधक समाजाचे कार्य थांबले. शाहू महाराजांनी वेदोक्त प्रकरणानंतर सत्यशोधक समाजाला नवीन उमेद दिली, असे म्हणायला हरकत नाही.

जातीभेद निर्मूलनासाठी शाहूजींचे प्रयत्न

शाहू महाराजांनी जातिभेत नष्ट व्हावेत यादृष्टीने सार्वजनिक अनेक मराठा-धनगर विवाह घडवून आणले. विधवा पुनर्विवाह आणि आंतरजातीय विवाहासाठी शाहू महाराजांचा पाठिंबा होता. त्यासाठीही आवश्यक कायदे त्यांनी केले.

राजदरबारातील एक प्रसंग

त्यांनी दरबारामध्ये चहा करण्यासाठी एका मागारवर्गीय व्यक्तीला ठेवले होते. शाहू महाराज त्याने केलेला चहा स्वतः तर पितच, पण इतर दरबारींनाही त्याच व्यक्तीच्या हाताचा चहा प्यावा लागे. शेतकऱ्यांची पिके चांगल्या प्रकारे यावीत यासाठी त्यांनी १८ फेब्रुवारी १९०७ मध्ये भारतातील पहिले राधानगरी धरण बांधले.

अन्यायी रूढी-परंपरांवर शाहू महाराजांद्वारे प्रतिबंध

सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास शाहूजींनी कायद्याने बंदी केली. भटक्या जातीतील लोकांना स्थिरस्थावर करून आश्रय दिला. प्रत्येक खेड्यामध्ये परंपरेने चालणारी बारा-बलुतेदार पद्धत सन १९१८ साली बंद करून, त्यांना प्रत्येक क्षेत्रातील उद्योगधंदे खुले केले.

सन १९२० साली देवदासी प्रथेस बंदी करणारा कायदा करून, स्त्रियांवरील होणारा अन्याय बंद केला. त्याचप्रमाणे बालविवाह प्रतिबंद कायदा जरी केला.

शाहूजींच्या कारकिर्दीमधील प्लेगची महामारी

१८९७-१८९८ साली आलेल्या प्लेगसारख्या महामारीला शाहूजींनी मोठ्या धैर्याने तोंड दिले. प्रशासनामध्ये कर्तृत्ववान व्यक्तींना निवडून शाहू महाराजांनी प्रशासनाचा कायापालट केला.

प्रशासनाचा कायापालट

भास्करराव जाधव यांच्या कर्तृत्वाकडे पाहून त्यांना “असिस्टन्ट सरसुभे” या सर्वोच्य पदावर शाहूजींनी नेमले. तसेच, अण्णासाहेब लठ्ठे यांना त्यांच्या राज्याचा पंतप्रधान म्हणून नेमले. भास्करराव जाधव, अण्णासाहेब लठ्ठे यांनी पुढे ब्राह्मणविरोधी चळवळीमध्ये अस्पृश्यांसाठी वसतिगृहे, शाळा खोलण्यात त्यांचे योगदान दिले.

शासनामध्ये राखीव जागांची तरतूद करणारे शाहू महाराज

जातिभेदामुळे एक महाराज असताना देखील त्यांना वैदिक मंत्र म्हणण्यास विरोध होत असेल, तर विचार करा सर्वसामान्यांची परिस्थिती काय असेल? त्यामुळे, त्यांनी २६ जुलै १९०२ साली त्यांच्या राज्यात सरकारी नोकरीमध्ये मागास वर्गासाठी ५०% राखीव जागा ठेवण्याचे फर्मान काढले. त्यांच्या या निर्णयामध्ये काही अंशी वेदोक्त प्रकरणही कारणीभूत आहे.

शाहू महाराजांचा लंडन दौरा

सातव्या एडवर्डच्या राज्याभिषेकासाठी शाहू महाराजांनी सन १९०२ मध्ये लंडन दौरा केला होता. शाहू महाराजांनी तेथील शिक्षणव्यवस्था, औद्योगिक प्रगती, आधुनिक सिंचनप्रणाली, आधुनिक दळणवळणाची साधने, इत्यादी गोष्टींचा आढावा घेतला.

राजर्षी शाहू महाराज

सन १९१९ साली कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय सभेने शाहूजींच्या सामाजिक कार्याला मान देऊन त्यांना “राजर्षी” ही पदवी बहाल केली. शिवाजी महाराज यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने समजून, समाजातील रूढी-परंपरेच्या नावाखाली होणारा अन्याय शाहू महाराजांनी बंद केला.

कोल्हापुरमधील न्यू शाहू पॅलेस
कोल्हापुरमधील न्यू शाहू पॅलेस

मृत्यू

शाहू महाराजांसाठी आयुष्याची शेवटची वर्षे दुःखदायक होती. कारण, त्यांचा मुलगा “शिवाजी” याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यातच त्यांना मुधुमेह असल्याने त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर, ६ मे १९२२ साली मुंबई येथे वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

जाणून घ्या कोण आहेत खरे भारतीय नायक?

राजर्षी शाहू महाराजांचा हा मराठीतील लेख तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. कृपया आमच्या कामाचे समर्थन करण्यासाठी हा लेख शेअर करण्यास विसरू नका!

छायाचित्रांचे श्रेय

१. शाहू महाराज त्यांच्या शाही पोशाखात उभे असताना काढलेले चित्र, वैशिष्ट्यीकृत प्रतिमेचे श्रेय: Devare & Co. : Bombay,स्रोत: ​ब्रिटिश लायब्ररी (पब्लिक डोमेन)

२. शाहू महाराज त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत असताना काढलेले छायाचित्र, छायाचित्राचे श्रेय:विकिमीडिया कॉमन्स, स्रोत: ब्रिटिश लायब्ररी (पब्लिक डोमेन)

३. शाहू महाराज शाही पोशाखात बसलेले असताना काढलेले छायाचित्र, छायाचित्राचे श्रेय:विकिमीडिया कॉमन्स, स्रोत: ब्रिटिश लायब्ररी (पब्लिक डोमेन)​

४. कोल्हापूरचे १९ वर्षीय शाहू महाराज, इ. स. १८९४ मध्ये ब्रिटिश रहिवासी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेट देताना, छायाचित्राचे श्रेय: विकिमीडिया कॉमन्स  (पब्लिक डोमेन)

५. भारतीय कुस्तीपटू एका कुस्तीच्या सामन्यादरम्यानचे दृश्य

६. कोल्हापूरचे महाराज अधिकाऱ्यांसह कुस्तीचा सामना पाहताना गर्दीतील दृश्य, छायाचित्राचे श्रेय: विकिमीडिया कॉमन्स (पब्लिक डोमेन)​

७. कोल्हापुर में नया शाहू महल, प्रतिमा श्रेय: विजय शंकर मुनोलीस्रोत: विकिमीडिया कॉमन्स​

लेखकाबद्दल

Subscribe Now For Future Updates!

Join and recieve all future updates for FREE!

Congrats!! Now you are part of HN family!

Pin It on Pinterest