परिचय
या जीवनचरित्राद्वारे मी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग मांडत आहे. यामध्ये त्यांची कार्ये, लढाया, स्वराज्याविषयक धोरणे आणि त्यांचा धर्मविषयक विचार या प्रेरक लेखाद्वारे आपल्यासमोर मांडत आहोत.
अद्वितीय राजकरण, आक्रामक रणनीति अणि रणकौशलाच्या जोरावर छत्रपति संभाजी महाराजांनी अल्पशा कारकिर्दीतच शंभरहून अधिक युद्धे जिंकली. त्यांनी दुश्मनी अशी केली कि, शत्रूची पळता भुई थोडी झाली, तर त्यांची मित्रता पहिली तर कृष्णा-सुदामाची कथा आठवते.
संभाजी महाराजांचा स्वभाव हा त्यांच्या वडिलांच्या विपरीत होता. शिवरायांनी नेहमी त्यांच्या सर्व दरबारी आणि शत्रुपक्षातही कूट-नीतिचा वापर केला. परंतु संभाजी महाराज हे सरल स्वभावी असल्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांचे अनेक शत्रू तयार झाले. दुर्दैवाने अगदी जवळच्या नातेवाईकांमुळे ते शत्रूसापळ्यात अडकले.
संभाजी महाराजांचा इतिहास नक्कीच लहान मुलांपासून आजच्या नवपिढीला प्रेरणा देणारा आहे. या जीवनचरित्राद्वारे आपल्याला एक आदर्श पुत्र, पिता आणि मित्र, यांबरोबर एक न्यायप्रिय आणि चारित्र्यवान राजाचे दर्शन घडेल.
संभाजी महाराजांविषयी संक्षिप्त माहिती
घटक
|
माहिती
|
---|---|
ओळख
|
मराठा साम्राज्याचे दुसरे महान छत्रपती
|
शासनकाळ
|
२० जुलै, १६८० ते ११ मार्च, १६८९
|
जन्म
|
१४ मे, १६५७ पुण्यातील पुरंदर किल्ल्यावर
|
राज्याभिषेक
|
२० जुलै, १६८० रोजी पन्हाळा किल्ल्यावर
|
पालक
|
माता: सईबाई, पिताः छत्रपती श्री शिवाजी महाराज,
|
पत्नी
|
येसूबाई
|
मुले
|
मोठी मुलगी: भवानीबाई, लहान मुलगाः शाहूजी भोसले
|
उत्तराधिकारी
|
छत्रपती राजाराम
|
मृत्यू
|
११ मार्च, १६८९
|
संभाजी महाराजांचे बालपण
अवघ्या अडीच वर्षांच्या वयात संभाजीराजांच्या आई सईबाई मरण पावल्या. त्यांच्या आईच्या मृत्यूचे कारण पुराव्याअभावी सांगता येत नाही.
त्या वेळी जिजाबाई (त्यांच्या आजी) तेथे होत्या आणि त्यांनी संभाजीराजांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी घेतली.
अर्थातच, दुसरे शिवराय घडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. संभाजीराजांना संस्कृत भाषा शिकवण्यासाठी जिजाऊंनी महान पंडितांना नियुक्त केले.
जिजाऊंची शिकवण
अर्थातच, शिवरायांचे पुत्र असल्याने संभाजी महाराजांमध्ये प्रबळ नेतृत्व क्षमता, चौकस बुद्धी, प्रजेबद्दल दयाभाव, फितुरी आणि अन्यायाविषयी चीड, महिलांचा आदर यांसारखे गुण होते. जिजाऊ यांनी न्यायनिवाडा कसा करावा,राज्यामधील समस्या आणि निवारण, किल्ले गडकोट यांची पुरेपूर माहिती यांमध्ये त्यांना मदत केली.
संभाजी महाराजांनी आपल्या गुरूंच्या सानिध्यात युद्ध कौशल्ये, युद्धनीती, राजनीती, संस्कृत, विज्ञान, अर्थशास्त्र, इत्यादी शिकले होते. ते संस्कृतमध्ये पारंगत होते त्यामुळे त्यांना “महापंडित” म्हणून ओळखले जात आणि त्याबरोबरच लोकांना न्याय देण्यासाठी ते प्रसिद्ध होते.
अगदी लहान ९ वर्षांच्या वयात मुगल कोर्टात त्यांना राजनीतीचा भाग म्हणून मनसबदारी स्वीकारावी लागली.
संभाजीमहाराजांचे व्यक्तित्व
संभाजी महाराज शरीराने मजबूत बांध्याचे, उंच . त्यांचा शारीरिक तपशील खालील प्रमाणे आहेत:
संभाजी महाराज शारीरिक माहिती: उंची आणि वजन
मी छत्रपती संभाजीराजांची उंची अंदाजे ६’२” इतकी होती आणि वजन अंदाजी ११० किलोग्रॅम होते.
संभाजी महाराजांनी लिहिलेले ग्रंथ
संभाजी महाराज १४ वर्षाच्या वयामध्ये १४ विविध भाषेमध्ये पारंगत झाले होते. त्यामध्ये मराठी, इंग्लिश, उर्दू, पोर्तुगीज, संस्कृत, मुघल भाषा, सर्व दक्षिण भारतीय भाषा, सर्व डेक्कन भाषा, इत्यादी भाषा होत्या. त्यांनी याच वयात बुधभूषण, नखशिखांत किंवा नायिका भेद, सात शासक असे तीन ग्रंथ लिहिले होते.
त्याकाळी प्रचलित असेलेल्या खेळांपैकी देशी कुस्ती, तलवारबाजी, घुडसवारी या मोकळ्या मैदानातील खेळांव्यतिरिक्त बुद्धिबळ, चौरस यांसारखे बैठे खेळ संभाजी राजे खेळत.
पुरंदरचा तह: संभाजी महाराजांचा संबंध
पुरंदरचा तह शिवाजी महाराज यांनी केला, परंतु संभाजी महाराजांचा इतिहास देखील त्याच्याशी संबंधित होता. शिवरायांना पुत्र संभाजी यांना बरोबर घेऊन मुघल दरबारात जावे लागेल असे वचन मिर्झा जयसिंगाने शिवाजी महाराजांकडून या तहाच्या वेळी घेतले होते.
शिवाजी महाराज संसदेत मिर्झा जयसिंह यांना वचन दिल्याप्रमाणे दिल्लीत आले होते. त्यामुळे, अगदी बालवयात संभाजीराजे राजकारणाचे शिकार झाले. पण त्यामुळे त्यांना राजकीय डावपेच आणि त्यांचा तोड शिकण्यास साहजिकच मदत झाली असणार.
संभाजी महाराजांचा विवाह
शिवाजी महाराजांनी स्वराज्याला राजकीय फायदा व्हावा यादृष्टीने स्वइच्छेविरुद्ध आठ विवाह केले होते. संभाजीराजांचादेखील विवाह राजकीय गटबंधन व्हावे याउद्देशाने केला होता. त्यावेळी लग्न हे अत्यंत लहान वयात व्हायचे. शंभूराजांचेदेखील लग्नदेखील लहान वयात झाले.
पिलगिरराव शिर्के यांना स्वराज्यात सामील केल्यास मराठ्यांना कोकण भागात जम बसण्यात मदत होईल. यादृष्टीने, शिवरायांनी पिलगिरराव शिर्के यांची कन्या जिऊबाई हिच्याशी संभाजीराजांचा विवाह लावला होता. विवाहानंतर नंतर मराठा परंपरेनुसार जिऊबाईंचे नाव “येसूबाई” असे बदलण्यात आले.
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा इतिहास
शिवरायांच्या मृत्यूवेळी संभाजीराजे पन्हाळा किल्ल्याच्या किल्लेदाराकडे नजरबंद होते. काही लोकांचा असा समज आहे की, शिवाजी महाराजांच्या दरबारातील काही प्रभावशाली मंत्र्यांच्या मदतीने संभाजीराजांना छत्रपती बनण्यापासून रोखण्याचा कट सोयराबाईंनी रचला.
काही लोक तर शिवरायांना विष देण्यातही सोयराबाईंचे नाव घेतात. परंतु, सोयराबाईंविरुद्ध अद्याप असा कोणताही पुरावा मिळालेला नाही. उलट, सोयराबाईंना संभाजी महाराजांनी रायगडावर सन्मानित केले होते.
शिवरायांच्या मृत्यूवेळी रायगडावर उपस्तित मंत्री
शिवाजी महाराजांचे सुरनीस अण्णाजी दत्तो, नीलकंठ मोरे शिरप्रधान, प्रल्हाद पंत, गंगाधर जनार्दन, रामचंद्र नीलकंठ, आबाजी महादेव, जोशीराव, बाळप्रभू हे अष्टप्रधान मंडळातील मंत्री तसेच हैबतराव निंबाळकर, संताजी घोरपडे, समशेर बहाद्दर, बहिर्जी घोरपडे, विश्वासराव, मुधोजीराव, शिधोजिराव निंबाळकर, गणोजीराजे, शिर्केमालेकर, हीरोजी फर्जंद, बाबाजी घाटगे, संभाजी कावजी, बाबाजी कदम, पाणसंबळ, सूर्याजी मालुसरे, कृष्णाजी नाईक, महादजी नाईक, बहिर्जी नाईक, निळोजी पंत (प्रधान पुत्र), प्रल्हाद पंत, गंगाधरपंत (जनार्दनपंतांचे पुत्र ), रामचंद्र नीलकंठ, रावजी सोमनाथ, आबाजी महादेव, जोतीराव, बाळप्रभू चिटणीस (बालाजी आवजी ) हे होते.
संभाजीराजे यांनी न्यायनिवाडा करताना आरोपपत्रामध्ये ३५ मंत्र्यांचीच नावे होती. वरील मंत्र्यांपैकीच २२ मंत्रांना शिक्षा झाली.
या २२ मंत्रांमध्ये बाळप्रभू चिटणीस (उर्फ बालाजी आवजी) हेदेखील होते. पण नंतर म्हणजे त्यांना शिक्षा झाल्यावर ते पूर्णतः निर्दोष असल्याचे समजते. त्यामुळे संभाजी महाराज त्यांच्या स्मरणार्थ त्यांची समाधी रायगडावर उभारतात.
षडयंत्राबद्दलची माहिती मिळाल्यावर संभाजीराजांना पन्हाळ्यातून निसटणे गरजेचे होते, त्यामुळे त्यांना किल्लेदाराशी युद्ध करावे लागले, यामध्ये किल्लेदार मारला जातो.
संभाजी महाराजांची स्वराज्यविरोधी फितुरांना केलेली कठोर शिक्षा
पन्हाळ्यानंतर संभाजीराजांना रायगड किल्ला पुन्हा ताब्यात घेणे गरजेचे होते. हंबीराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे सेनापती आणि सोयराबाईंचे मोठे भाऊ होते. हंबीरराव मोहिते यांनी संभाजी महाराजांना रायगड पुन्हा अधिपत्याखाली आणण्यास मदत केली.
त्यानंतर संभाराजे यांनी अण्णाजी दत्तो, पेशवा मोरोपंत पिंगळे आणि शिरके यांसारख्या राजद्रोही मंत्र्यांना तुरुंगात टाकले, काहींना हत्तीच्या पायाखाली दिले, तर काहींचा कडेलोट केला. शंभूराजांची “न्यायप्रिय शासक” अशी ख्याती होती. संभाजीराजांनी अन्याय आणि फितुरी कधीच सहन केली नाही.
संभाजी महाराजांचा राज्याभिषेक
जेव्हा संभाजीराजे छत्रपती झाले तेव्हा मराठा आणि मुगल यांच्यात अनेक संघर्ष लढाया झाल्या. संभाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या जीवनातील संघर्षाची माहिती देतो.
शिवरायांच्या मृत्यूनंतर तीन महिन्याने संभाजीराजांचा पन्हाळगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडला. युवराज संभाजीराजे आता छत्रपती झाले होते. छत्रपती शंभूराजांनी प्रजेचे हाल पहिले आणि त्यांनी राज्यातील गरिबी, अन्नधान्याची कमी भरून काढण्यासाठी १६८० मध्ये औरंगझेबची खानदेश सुभ्याची राजधानी बुऱ्हाणपुरवर हल्ला केला. या हल्ल्यात खूप मोठा मुघल खजिना मराठ्यांना मिळाला.
संभाजी महाराजांचे बुऱ्हाणपुरवर आक्रमण
मी संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये बुऱ्हाणपूरचा हल्ला खूप प्रसिद्ध होता, कारण हा संभाजी महाराजांचा छत्रपती झाल्यानंतरच पहिली लढाई होती. या लढाईमध्ये मुगल सैन्याला पराभूत करून २०,००० मराठा सैन्याने औरंगझेबाच्या खानदेशातील राजधानीला लुटले.
अकबर-द्वितीय हा औरंगजेबचा चौथा मुलगा याने मुगल साम्राज्याविरूद्ध विद्रोह केला आणि पुढच्या विद्रोहाचे नियोजन करण्यासाठी औरंगाबादला गेला.
अकबरला पकडण्यासाठी औरंगजेबही औरंगाबादला गेला. तेथे औरंगझेबने अकबरला हरवल्याने, अकबराला तेथून पलायन करावे लागते. अकबर-द्वितीय पराभूत झाल्यानंतर तो रायगडावर संभाजी महाराजांचा आश्रय घेतो.
छत्रपती शंभूराजांनी प्रजेचे हाल पहिले आणि त्यांनी राज्यातील गरिबी, अन्नधान्याची कमी भरून काढण्यासाठी १६८० मध्ये औरंगझेबची खानदेश सुभ्याची राजधानी बुऱ्हाणपुरवर हल्ला केला. या हल्ल्यात खूप मोठा मुघल खजिना मराठ्यांना मिळाला.
संभाजी महाराजांची म्हैसूर विजययात्रा
संभाजीराजांनी १६८१ मध्ये, दक्षिणी म्हैसूर मोहिमेची सुरूवात वोडियार राजवंशांविरुद्ध केली. “वोडियार चिक्कदेवराय” त्यावेळी वोडियार राजवंशांचे राजा होते.
चिक्कदेवराय अतिशय चिडखोर राजा होता. संभाजी महाराजांपुढे आत्मसमर्पण न करता त्याने उलट मराठा सैन्यावर हल्ला केला. याचा परिणाम म्हणून, संभाजी महाराज त्यांच्या विशाल सैन्याला घेऊन त्वेषाने लढले आणि लढाई जिंकली.
भविष्यातील स्वराज्यासाठीच्या मोहिमेत योगदान देण्याचे आश्वासन चिक्कदेवराय याने दिले. १६८२ ते १६८६ च्या दरम्यान चिक्कदेवराय यांनी स्वराज्यासाठी मदत करून योगदान दिले, पण काही काळानंतर त्याने मराठ्यांना मदत करण्यास नकार दिला. परिणामी, संभाजी महाराजांनी शेवटी, १६८६ मध्ये म्हैसूरवर कब्जा केला.
संभाजी महाराजांची जंजिऱ्यावरील मोहीम
संभाजी महाराजांपूर्वी, शिवाजी महाराजांनी आधीच सिद्धीचा प्रभाव जंजिरा बेटापुरता मर्यादित केला होता. शंभूराजे यांनी पुन्हा १६८२ मध्ये सिद्धिविरूद्ध मोहिम सुरू केली आणि सलग 30 दिवसांसाठी हल्ला केला.
मराठ्यांनी किल्ल्याचे प्रचंड नुकसान केले, परंतु किल्ल्याच्या संरक्षणास संपूर्णपणे खंडित करण्यात यश आले नाही. मग संभाजी महाराजांनी सैन्याला किनाऱ्यापासून ते जंजिरा किल्ल्याच्या बेटापर्यंत नेण्यासाठी भराव टाकून मार्ग तयार करण्याचा प्रयत्न्य केला.
त्यावेळी, औरंगझेब मराठ्यांचा हा प्रयत्न विफल करण्यासाठी सिद्दीशी हातमिळवणी करतो आणि उत्तरेकडून स्वराज्यावर तसेच रायगडावर आक्रमण करतो. जंजिरा काबीज करण्याआधीच संभाजी महाराजांना जंजिऱ्याची उर्वरित मोहीम सैन्याकडे सोपवून मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी जावे लागले.
दुर्दैवाने, उर्वरित मराठा सैन्याला त्या मोहिमेत यश आले नाही. संभाजी महाराजांच्या इतिहासातील हे एकमेव युद्ध आहे जे पूर्णपणे जिंकता आले नाही, पण संभाजीराजे हरले देखील नाही, कारण सिद्धिला या मोहिमेमध्ये जबरदस्त नुकसान झाले.
संभाजी महाराजांचा पोर्तुगीज किल्ले आणि कॉलनीवर हल्ला
सिद्धीवर असफल आक्रमणानंतर, संभाजीराजांनी पोर्तुगीजांचे अंजदीव किल्ला ताब्यात घेण्यासाठी त्यांचे सेनापती पाठवले होते.
मराठ्यांनी त्या किल्ल्याला नवीन युद्धनौका व सैन्यतळ तयार करण्यासाठी नाविक तळ मध्ये बदलण्याचा विचार केला होता. पण काही कारणास्तव सेनापतींना मोहीम अर्धवट सोडून अंजदीव किल्ल्यापासून परत रायगडावर जावे लागले.
संभाजी महाराजांची पोर्तुगीज मोहीम
संभाजी महाराजांना पोर्तुगिजांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतः ती मोहीम हाती घ्यावी लागली. शंभूराजांनी सर्व कॉलनी आणि पोर्तुगीज किल्ल्यांवर कब्जा केला.
बिशप
ख्रिस्ती मंत्र्यांमधील वरिष्ठ सभासद ज्याच्याकडे धार्मिक आणि प्रशासकीय अधिकार असतात. यांना धार्मिक गुरु आणि मंत्र्यांवर देखरेख करण्यासाठी नियुक्त केले जायचे.
पोर्तुगीजांची परिस्थिती इतकी भयंकर झाली की त्यांनी अंजदीव ते कॅथेड्रलला (बिशपच्या अधिकारातील ख्रिश्चन चर्चची प्रमुख इमारत) पळ काढला, जेथे पोर्तुगीस बिशप आणि अधिकाऱ्यांनी चर्चच्या तळमजल्यामध्ये शरण घेतली आणि मुक्ततेसाठी प्रार्थना केली.
पोर्तुगीज मुघलांना व्यापारात मदत करायचे आणि मुघलांना त्यांच्या प्रदेशातून जाण्याची परवानगी द्यायचे. मुगल आणि पोर्तुगीजांच्या संघटना तोडणे हा संभाजी महाराजांचा या मोहिमेमागील मुख्य उद्देश होता.
संभाजी महाराज कैदेत
संभाजी महाराजांनी भारतभूमीतून मुघलांना पूर्णपणे उखडून टाकण्याची योजना आखली. त्याचे नियोजन आणि पुढील वाटचालींसाठी संगमेश्वर येथे गुप्त बैठक बोलावली गेली.
गणोजी शिर्के हा संभाजी महाराजांचा मेहुणा होता, संभाजी महाराजांनी त्याला वतनदारी आणि जहागिरी देण्यास साफ नकार केला होता. त्यामुळे, हव्यासापोटी गणोजी शिर्के याने मुघलांशी हातमिळवणी केली.
गनोजीने मुघल सरदार मुकर्रबखान याला संभाजी महाराज संगमेश्वरात असल्याची खबर सांगितली. संभाजीराजे मोहिमेवर जाताना ज्या गुप्त मार्गांचा वापर करायचे तो फक्त मराठ्यांना माहित होता. तो संगमेश्वरातील गुप्त मार्ग गनोजीने मुकर्रबखानला सांगितला.
संभाजी महाराजांनी संगमेश्वरात काही सरदारांना आणि विश्वासू मंत्र्यांना बोलावले होते. गुप्त बैठक झाल्यानंतर गावकऱ्यांच्या आग्रहामुळे त्यांच्या शब्दाला मान देऊन काही काळ ते थांबण्यास तयार झाले.
त्यांनी आपल्याबरोबरची सेना रायगडाकडे रवाना केली आणि बरोबर फक्त २०० सैनिक, मित्र व सल्लागार कवी कलश आणि २५ विश्वासू सल्लागार ठेवले.
संभाजी महाराज गावातून बाहेर पडत असतांना, ५००० मुघल सैन्याने त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना घेरले. शत्रूचे सैन्यबळ संख्येने खूप जास्त असल्याने आपला निभाव लागणार नाही, हे माहित असतानासुद्धा सर्व साथीदार आणि सरदार प्राणपणाने लढले.
स्किर्मिश या गावी भयानक रक्तपात झाला संभाजीराजांच्या सेनेने आपला सर्व पराक्रम लावला. पण दुर्दैवाने संभाजी महाराजांना ते घेराबंदीतून बाहेर काढण्यास अयशस्वी ठरले.
या युद्धामध्ये संभाजी महाराजांनी अद्वितीय पराक्रम दाखवला.
छत्रपती संभाजी राजांची शेवटची लढाई
सर्व मराठा सरदार त्यांच्यापेख्या जवळजवळ २५ पट संख्येने अधिक असलेल्या मोगल सैन्याशी लढले. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या राजाला वाचवण्यासाठी अक्षरशः रक्त सांडले केला.
सैन्याच्या संख्येतील फरकामुळे, शंभूराजे आणि त्यांचे जवळचे मित्र कवी कलश यांना १ फेब्रुवारी १६८९ रोजी कैद करण्यात आले.
त्या वेळी संगमेश्वर मराठा राज्याचाच भाग होता, त्यामुळे मुघल सैनिकांना मराठा पोस्ट (व्यापारांकडून कर आकारण्यासाठी असणाऱ्या चौक्या) पार कराव्या लागणार होत्या.
गणोजी शिर्के यांनी त्या चौकी पार करण्यासाठी मदत केली. त्याने सांगितले कि अटक केलेले दोघेही हिरे तस्कर आहेत. सर्व चेकपोस्ट ओलांडल्यानंतर झुल्फिकार खान २०,००० मुघल सैन्यासह सज्ज झाला.
एका ऐतिहासिक मान्यतेनुसार झुल्फिकार खान त्याला थेट तुळापूरला येथे नेण्यात आले. तेथे मुघलांनी त्यांचा छळ करून शेवटी मृत्युदंड दिला.
तर इतर सिद्धांत असे दर्शवतात की त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेवून शारीरिक अत्याचार केले. याचे समर्थन करण्यासाठी कारण सांगितले जाते कि, मुघलांना नेहमी भीती होती की मराठा सेना राजाला कैदेतून काढण्यासाठी आक्रमण करू शकते त्यामुळे ते वेळोवेळी जागा बदलत असत.
याचे मूळ कारण म्हणजे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांकडे पुरेशी साधनसंपत्ती आणि सैन्य होते.
त्यामुळे, पहिल्यांदा झुल्फिकार खानने सैन्यासह छत्रपती संभाजी भोसले आणि कवी कलश यांना कराड-बारामती मार्गे बहादूरगडावर नेले. त्यानंतर शेवटच्या अंतिम दिवसांत त्यांना भीमा, भामा, आणि इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या तुळापूर या गावात नेण्यात आले.
संभाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे कारण ते आपल्याला शिकवतात की व्यक्तीच्या जीवनात धर्मासाठी काय स्थान असले पाहिजे आणि तो कपड्यांसारखा बदलता येत नाही.
संभाजी राजेंच्या मते धर्म म्हणजे व्यक्तीची आत्मा असते आणि धर्मांतर करणारा व्यक्ती स्वतःच्या आत्म्यावर अविश्वास दाखवत असतो.
संभाजी महाराजांचा अपमान
औरंगजेबाने त्या दोघांशी अत्यंत अमानुष वर्तन केले. औरंगजेबाने संभाजी राजे आणि कवी कलश यांना डोके खाली ठेवून उंटांना बांधून त्यांचा अपमान केला.
मग, मुघल सैन्याने शंभुराजांना अपमानित करण्याचे खूप प्रयत्न केले. काहींनी दगड, चिखल वगैरे फेकले, शंभूराजे आणि कवी कलश दोघेही “जगदंब, जगदंब” असे आपल्या आराध्य देवीची नाव जपत त्यांनी सर्व सहन केले.
औरंगजेबाच्या अटी
अपमानित करण्याच्या कृत्यानंतर, संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात नेण्यात आले. तेथे औरंगजेबाने संभाजी महाराजांसमोर जिवंत राहण्यासाठी तीन अटी ठेवल्या.
१. सर्व मराठा किल्ले ताब्यात द्या आणि मराठा साम्राज्याचा गुप्त खजिना उघड करा
२. मुघल दरबारातील अधिकारी असलेल्या मुघल गद्दारांची नावे उघड करा
३. इस्लाम धर्म स्वीकारा
त्या सर्व अटी संभाजी राजांनी नाकारल्या. मग, औरंगजेबाने संभाजी राजांचा अभिमान भंग करण्यासाठी जर त्यांनी अटी मान्य केल्यास नोकरीबरोबर इतर आकर्षक गोष्टी देण्यास तयार झाला. पण संभाजी महाराजांनी त्या सर्व गोष्टींसाठीही नकार दिला.
संभाजी महाराजांनी सर्व अटी नाकारल्या. त्यामुळे, औरंगजेबाने त्याचा संयम भंग करण्यासाठी त्यांचा शारीरिक छळ सुरू केला. औरंगजेबाला वाटे, संभाजी राजे शाही घराण्यातून असल्याने जाचक वेदनेमुळे कदाचित एका क्षणी तुटून इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होतील.
शारीरिक यातना
इतिहासात वर्णन केल्याप्रमाणे शंभुराजांवर केलेला शारीरिक छळ खूप भयंकर आणि असहनीय होता.
मुघल सैनिक थोड्या-थोड्या कालांतराने त्यांची नखे चिमट्याने उपसायचे, हातापायाची सर्व नखे संपल्यानंतर एकानंतर एक बोटे कापायचे सुरु केले, त्यानंतर त्यांची जीभ कापण्यात आली, कातडे सोलायचे, डोळे गरम लाल सळया घालून फोडण्यात आले, एकानंतर एक दोन्ही हात कापण्यात आले.
शेवटी, त्यांचा शिरच्छेद करून एका खास शस्त्राने त्यांचे दोन तुकड्यात विभाजन करण्यात आले आणि ते तुकडे मुघलांनी तुळापूरच्या भीमा नदीच्या संगमावर टाकले.
प्रत्येक अत्याचारानंतर औरंगजेबाने त्यांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितले, परंतु त्यांनी प्रत्येक वेळी त्या प्रस्थावासाठी नकार दिला. अशाप्रकारे, अनेक दिवस अत्याचार सहन करून त्यांनी वीर मरण स्वीकारले परंतु धार्मिक तडजोड अथवा इतर अटींसाठी तयार झाले नाहीत.
काही लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास संपविण्याचा प्रयत्न केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यामधील काही लोक महाराष्ट्रातील नामवंत लेखक म्हणून ओळखले जातात.
धर्माविषयी त्यांच्या अतूट विश्वास आणि प्रेरणेमुळे त्यांना अनेक भारतीय इतिहासातील वीर स्वातंत्र्य सैनिक त्यांचे अनुसरण करतात.
मला अशा आहे की, हा लेख वाचून आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समजण्यासाठी मदत झाली असेल. तरी, आपण हा लेख शेअर करून सोशिअल माध्यमांद्वारे सर्व मराठी बांधवांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करा. धन्यवाद!
उद्धरण
१. पावसाळ्यात पुरंदर किल्ल्याने हिरवी शाल पांघरलेले दृश्य, श्रेय: अभिजीत सफाई
२. देशी कुस्ती खेळताना मल्ल
३. पुरंदर किल्ल्यावरील दृश्य, श्रेय: अभिजीत सफाई
४. पन्हाळा किल्ल्यावरील निसर्गरम्य दृश्य, श्रेय: BOMBMAN
५. जंजिरा किल्ल्यावरील उर्वरित रचना आणि इतर अवशेष, श्रेय: विकास राणा
६. छत्रपती संभाजी महाराजांचा तुळापूर येथील पुतळा, श्रेय: उपाध्ये गुरुजी
लेखकाबद्दल
आशिष सालुंके
आशिष एक कुशल चरित्रकार आणि आशय लेखक आहेत. ते मनमोहक ऐतिहासिक कथन तयार करण्यात विशेषज्ञ असून HistoricNation द्वारे, त्यांनी आपले IT कौशल्य कथाकथनाच्या कलेमध्ये विलीन केले.