परिचय
या लेखात मी आपल्याबरोबर अजबदे पुनवर यांचा संपूर्ण इतिहास सांगणार आहे. यामध्ये त्यांच्या ओळखीबरोबरच त्यांची आणि महाराणा प्रताप यांची प्रेमकथा आणि त्यांच्या लग्न आणि मृत्यू कशी झाली याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि नवीन अपडेट्ससाठी आमच्या फ्री न्यूजलेटरला सबस्क्राईब करायला विसरू नका.
भारताच्या अमूल्य रत्नांमध्ये महाराणा प्रताप सिंह यांचे नाव येते. परंतु, या महान व्यक्तिमत्वामागे त्यांच्या पत्नी महाराणी अजबदे पुनवार यांचा मोठा वाटा होता. महाराणा प्रताप आणि अजबदे यांची कहाणी खरोखर चित्तवेधक आहे.
भारतीय इतिहासामधील अनेक घटना जशा रोमांचकारी आहेत, तशा अनेक प्रेमकथाही लोकप्रिय आहेत. मग ती कथा भगवान राम-सीतेची असो किंवा राधा-कृष्णाची, आपल्याला त्या आजही स्मरणात आहेत. आज मी अशीच एक प्रेमकथा सांगणार आहे, जी बहुतेक जणांना माहित नसेल.
आपल्या सर्वांना मेवाचे महाराणा प्रताप माहित आहेत, ज्यांनी अकबरसारख्या महत्वाकांक्षी सम्राटाविरुद्ध संघर्ष करून मेवाडचे अस्तित्व टिकवले. परंतु, खूप कमी लोकांना त्यांच्या आणि महाराणी अजबदे पुनवार यांच्या प्रेमकथेबद्दल माहित आहे. त्यामुळे चला तर मग सुरु करूया ही अद्भुत प्रेमकथा ज्याचा आदर्श वेळोवेळी राजस्तानामधील लोक उदाहरण म्हणून देतात.
महाराणा प्रताप यांना राजनैतिक बाबींमुळे आठ विवाह करावे लागले. असे असले तरी, महाराणी अजबदे यांच्याबरोबर झालेला त्यांचा पहिला विवाह त्यांच्यासाठी खास होता.
मेवाडचे रक्षक महाराणा प्रताप
कुंवर प्रताप सिंह यांचा जन्म १५४० मध्ये महाराणा उदय सिंह और महाराणी जयवंताबाई यांच्या मोठ्या मुलाच्या रूपात झाला. ते सूर्यवंशी उच्चकुलीन सिसोदिया राजपूत राजघराण्यातील होते. प्रताप यांना लहान असताना “कीका” या नावाने संबोधले जात. भारतीय इतिहासात त्यांना खासकरून हल्दीघाटीच्या लढाईमधील अद्वितीय पराक्रमासाठी ओळखले जाते. इ. स. २८ फेब्रुवारी १५७१ साली त्यांचा मेवारचे महाराणा म्हणून राज्याभिषेक झाला.
अजाबदे या नेमक्या कुठल्या
बिजोलिया हे सध्याच्या भिलवारा जिल्ह्यातील एक स्थान होते. असे मानले जाते ते फक्त उच्य वर्गीयांसाठीचे स्थान होते. म्हणजे प्रथम श्रेणीतील राजपूत वर्गालाच या ठिकाणी स्थान होते.
अजबदे पुनवार या मेवाड प्रांतातीलच छोटा भाग असलेल्या बिजोलीया प्रांतामधील राजघराण्यातून होत्या. अजबदे आणि प्रताप दोघेही सिसोदिया राजवंशातील असल्याने दोघेही एकमेकांशी चांगले परिचित होते. तसेच ते लहानपणापासूनचे चांगले मित्रदेखील होते.
अजाबदे यांचे आई आणि वडील
त्या राव मामरख सिंह आणि राणी हंसाबाई यांच्या यांच्या कन्या होत्या.त्या अतिशय नम्र, मनाने कोमल परंतु साहसी आणि धैर्यवान होत्या.
अजबदे आणि प्रताप यांच्या विवाहाची कहाणी
कुंवर प्रताप यांना लग्नाची मागणी
प्रताप महाराणा बनण्याआधी, महाराणा उदय सिंग आणि कुंवर प्रताप हे मारवारच्या युद्धात सहभागी झाले होते. युद्धातील विजयानंतर त्यांचे सरदार राव मामरक सिंह सिसोदिया यांच्या आग्रहामुळे ते बिजोलिया येथे गेले. यावेळी मामरक राव यांनी महाराणा उदय सिंह यांच्यासमोर कुंवर प्रताप आणि अजबदे यांच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला. दोघे लहानपणीपासूनचे मित्र असल्याने तेही विवाहास राजी झाले.
लग्नाच्या वेळी त्यांचे वय
मध्ययुगीन भारतात कमी वयात विवाह करण्याची प्रथा होती. त्यामुळे कुंवर प्रताप आणि अजबदे यांचा विवाहही कमी वयातच झाला. त्यामुळे विवाहाच्या वेळी कुंवर प्रताप १७ वर्षांचे तर अजबदे यांचे वय फक्त १५ वर्षांच्या होत्या.
लग्नाची पद्धत आणि उपस्तित मान्यवर
त्यांचा विवाह भारतीय राजपुती पद्धतीने हिंदू रितीरिवाजानुसार १५५७ मध्ये झाला. काही स्रोतांप्रमाणे त्यांचा विवाह बिजोलियामधील एका नदीकिनारी झाला होता. त्यामध्ये सर्व बिजोलियावासींबरोबर मेवाडचे सर्व सरदार आणि जहागीरदार उपस्थित होते. दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत असल्याने त्यांच्यात एक विश्वासाची भावना आणि एकमेकांसाठी आदर होता.
हा प्रेमविवाह कसा?
बहुतेकांना हा प्रश्न पडला असेल, जर विवाह नियोजित असेल तर ही प्रेमकहाणी कशी? माझ्या मते व्यक्ती प्रेमात पडल्यानंतर विवाहही त्याच व्यक्तीशी होईल याची शक्यता कमी असते. आजच्या जगात ही शक्यता लोप पावते ती जातीवाद, प्रतिष्ठा, उच्य-नीच, वर्ग, आणि अहंकार यांसारख्या कारणांमुळे आणि ज्यामुळे दोन कुटंबांचा मेळ बसत नाही. परंतु महाराणा प्रताप आणि अजबदे यांच्या प्रेमकहाणीत त्यांच्या नशिबाने या गोष्टी मध्ये आल्या नाहीत.
एकनिष्ठ पत्नी आणि कर्तव्यपरायण महाराणी
कुंवर प्रताप यांनी जरी अजबदे यांच्याशी प्रेम केले, तरी त्यांचा विवाह मात्र दोन्ही घरातील व्यक्तींच्या संमतीनेच झाला. याचे कारण सांगायचे झाले तर माझ्या मते, राजपूत परिवारामध्ये स्त्रियांच्या सन्मानाला सर्वोपरी स्थान दिले जाते. मग राणी असो किंवा दासी त्यांना सन्मानाने वागवणे हे राजपुती रक्तात पहिल्यापासूनच आहे. स्त्रियाही जर विषय सन्मानाचा आला तर मृत्यूलाही हसत सामोरे जात.
याचे उदाहरण द्यायचे झाले तर, लढाईनंतर शत्रुपक्षाचा विजय झाल्यानंतर होणारे जौहर. हे राजपुती स्त्रियांच्या मर्यादा आणि सन्मानाची आजही साक्ष देतात.
मेवाडमधील महाराणी अजबदे यांचे स्थान
साहजिकच मेवाडच्या त्या महाराणी असल्याने त्यांचे स्थान विशेष होते. कुंवर प्रताप महाराणा झाल्यानंतर प्रताप यांच्या सांगण्यावरून त्या प्रत्येक राजकीय गोष्टींबद्दल माहिती ठेवत.
त्यामुळे त्यांनी सामान्य स्त्रियांप्रमाणे राजकारणापासून दूर न राहता वेळोवेळी महाराणा प्रतापांची साथ दिली. महाराणा प्रतापही वेळोवेळी राज्यासंबंधी बाबींवर त्यांच्याशी चर्चा करत. महाराणा महत्वाची गोपनीय माहितीही महाराणी असल्याकारणाने अजबदे यांना देत.
नेहमी स्वार्थ बाजूला ठेवून कर्तव्याला त्या प्राधान्य देत. त्यामुळे लवकरच प्रताप यांच्या आई जयवंताबाईंच्या त्या लाडक्या आणि विश्वासपात्र बनल्या.
महाराणी अजबदे आणि महाराणा प्रताप यांच्या संतती
महाराणी अजबदे यांनी लग्नाच्या दोन वर्षानंतर पहिल्या मुलाला १६ मार्च, १५५९ रोजी जन्म दिला. महाराणा प्रताप आणि महाराणी अजबदे यांनी त्याचे नाव अमर सिंग I ठेवले. तर दुसऱ्या मुलाचे नाव भगवान दास होते.
अजबदे यांचे महाराणा प्रतापबरोबर महालांबाहेरील वास्तव्य
चित्तौडगड लढाईनंतरचे वास्तव्य
२३ ऑक्टोबर, इ. स. १५६८ मध्ये मुघल सम्राट अकबरने चित्तौडगड किल्लाला वेढा घातला. गडातील खाद्यसामग्री हळूहळू संपुष्टात आली, ज्यामुळे गडातील बाहेर येऊन लढण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत मुघलांविरुद्धचा संघर्ष सुरु राहावा याकरिता राजपरिवाराला सुरक्षित ठिकाणी पोचवणे जरुरी होते. त्यामुळे सल्लागार आणि मंत्र्यांच्या सल्ल्यावरून महाराणा उदय सिंह यांनी परिवाराला गोगुंडा या ठिकाणी हलवले.
सर्व परिवाराला एकाच ठिकाणी ठेवणे धोक्याचे होते. त्यामुळे विकिपेडियानुसार, कुंवर प्रताप आणि अजबदे यांना छप्पन या ठिकाणी पोचवले. छप्पन हे सध्याच्या बांसवाडा जिल्ह्यात आहे. काही स्रोतांच्या मते प्रताप आणि त्यांच्या पत्नी अजबदे हे राजपिपला या ठिकाणी राहिले होते. याच ठिकाणे त्यांनी जवळपास ३ ते ४ महिने राहिले.
हल्दीघाटी लढाईनंतरचे वास्तव्य
इ. स. १५७६ मधील झालेल्या हल्दीघाटीच्या लढाईत अनेक साहसी वीरांनी बलिदान दिले. जरी या युद्धाचा परिणाम त्यांच्या विपरीत गेला असला तरी त्या राजपुती योध्यांच्या पराक्रमाने पुढे संघर्ष करण्याचे उमेद कायम राहिली.
मुघलांविरुद्धच्या संघर्षात हल्दीघाटी लढाईनंतर त्यांच्याकडे संसाधनाच्या कमतरतेबरोबरच खाद्यसामग्रीचीही कमतरता होती. एक आई असताना एवढ्या विपरीत परिस्थितीतही त्यांनी महाराणी असल्याने त्यांच्या क्षत्राणी धर्माला प्राधान्य दिले.
इ. स. १५७२ मध्ये महाराणा उदय सिंह यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कुंवर प्रताप यांची आई महाराणी जयवंताबाई यांनी संन्यास घेतला. एकाचवेळी आई आणि वडील दोघांच्या दूर जाण्याने पती एकटे पडू नये याची काळजी त्यांच्या पत्नी अजबदे यांनी घेतली.
एक पत्नी, आईबरोबरच त्यांनी महाराणी असल्याचे कर्तव्यही पार पाडले. यावरून महाराणी अजबदे मनाने किती धैर्यवान होत्या याची प्रचिती मिळते. त्यांनी अतिशय विपरीत परिस्थितीही महाराणा प्रतापांचा एकनिष्ठ होऊन साथ दिली.
मुघलांविरुद्धच्या या स्वातंत्र्यलढाईत महाराणा प्रताप आणि राजपूत वीरांना संघर्ष करता आला, तो महाराणी अजबदे आणि त्यांच्यासारख्या हजारो राजपूत महिलांमुळे, ज्याचा उल्लेख कधीही कोणत्या इतिहासाच्या पुस्तकांत नसतो. त्यामुळे अशा धैर्यवान आणि साहसी महिलांना माझा मानाचा मुजरा.
आजच्या दिखाऊ जगात बहुतेकजण अशाच लोकांची नक्कल करतात आणि लोक त्याला प्रेम समजतात. त्यामुळे आजच्या पिढीला सोशिअल मीडियाच्या बाहेर येऊन इतिहासात डोकावण्याची गरज आहे.
आशा आहे की, महाराणी अजबदे पुनवार यांच्याशी संबंधित ही माहिती आपल्याला आवडली असेल. आपल्याला हा लेख कसा वाटला? भविष्यातील इतिहासासंबंधी माहिती इमेल द्वारे प्राप्त करण्यासाठी आमच्या न्यूजलेटरला फ्रीमध्ये सब्सक्राइब करायला विसरू नका.