नमस्कार मित्रहो, आज मी आपल्यापुढे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एका वीरांगनेचे जीवनचरित्र मांडणार आहे. भारतीय इतिहासात असे अनेक स्वातंत्र्यवीर झाले, ज्यांना आपण काळाच्या ओघात विसरत चाललो आहोत. अशाच स्वातंत्र्यप्रेमी विरांगनेमध्ये एक नाव येते वेलू नाथियार यांचे.
वेलू नाथियार याही भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील काहीशा अज्ञात स्वातंत्र्यसेनानींपैकी एक. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जरी प्रसिद्धी मिळाली नसली तरी त्यांचा पराक्रम कोणत्याही तथाकथित स्वातंत्र्यसेनानींपेक्षा कमी नव्हता.
इंग्रजांनी भारतात जम बसवण्यासाठी प्रयत्न केल्यावर स्थानिक राज्यकर्त्यांनी त्यांचा प्रखर विरोध केला. परंतु, इंग्रजांच्या अत्याधुनिक शस्त्रे, कपट, धूर्त राजनीती यांच्या जोरावर भारतीय राज्यकर्त्यांचा निभाव लागत नव्हता. अशा विपरीत परिस्थितीत पहिल्यांदा इंग्रजांविरुद्ध लढा देऊन विजय मिळवण्याचा मान वेलू नाथियार यांना जातो. १८५७ च्या उठावापूर्वी अवघ्या ७७ वर्षांपूर्वी त्यांनी ही कामगिरी पार पाडली.
त्याकाळी, अशा पराक्रमी व्यक्तिमत्वामुळे त्या दक्षिण भारतात “वीरमंगाई” म्हणून प्रसिद्धीस आल्या. वीरमंगाईचा मराठीत अर्थ वीर महिला असा होतो.
पहिला आत्मघाती बॉम्बहल्ला
इतिहासामधील पहिला ज्ञात आत्मघाती बॉम्बहल्ल्याचा आराखडा वेलू नाथियार यांनीच त्यांच्या चीफ कमांडर कुईली बरोबर बनवला होता. मद्रास (सध्याचे चेन्नई) मधील रामनाद राज्याचे राजा चेल्ल्लामुथू विजयरघुनाथा सेथूपती आणि राणी सकंदीमुथल यांची ती एकमात्र संतान होती.
राजपरिवाराने त्यांच्या पालन-पोषणात कोणतीही कसर सोडली नाही. त्याकाळी एक मुलगी अथवा महिला म्हणून होणार दुजाभाव त्यांना पाहायला मिळाला नाही. याउलट त्यांच्या माता-पितांनी त्यांना एक जबाबदार वारस म्हणून वाढवले.
युद्धकलेच्या शिक्षणाबरोबर घोडेस्वारी आणि धनुर्विद्या यांचेदेखील शिक्षण त्यांनी घेतले. त्याचबरोबर वलारी (विळाफेक), सिलमबॅम (लाठीयुद्ध) यामध्येही त्या निपुण होत्या.
परकीयांबरोबर राजनैतिक संबंध येत असल्याने त्यांनी इंग्रजीबरोबर फ्रेंच, उर्दू आणि काही इतर भाषा शिकल्या.
शिवगंगाईचे राजा मुथुवदुगानाथापेरिया उदैय्याथेवर यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले, परंतु त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण, इंग्रजांविरोधात झालेल्या युद्धात त्यांचे पती धारातीर्थी पडले. या युद्धात मुथुवदुगानाथापेरिया यांच्याविरोधात इंग्रजांबरोबर अरकोट नवाबचा मुलगादेखील होता.
यानंतर वेलू नाचियार यांनी स्वतः युद्धासाठी कंबर कसली. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, अशी राजनीती वापरून दिंडीगुल येथील पलयकारार कोपाला नायकार जे अरकोट नवाबचे कट्टर विरोधी होते, त्यांच्या राज्याशी मैत्री केली. शिवगंगाईमधून त्यांनी मुलीसह निसटून दिंडीगुल येथे आठ वर्षे काढली.
आठ वर्षांत अरकोट नवाबविरोधात वेलू नाचियार यांनी दिंडीगुलनरेशबरोबर मिळून अनेक छोटे-मोठे लढे दिले. अखेरीस, निराश होऊन नवाबाने वेलू नाचियार आणि मारुथु ब्रदर्संना शिवगंगाईला परतून राज्यकारभार करण्याची मुभा काही अटींवर देण्यात आली. त्यांची एक अट अशी होती की, त्यांना काही किस्त (महसूल) नवाबला द्यावा. या शर्थी मान्य करून राणी वेलू नाचियार आणि मारुथु बंधू शिवगंगाईत परतात.
शिवगंगाईची महाराणी वेलू नाचियार
यादरम्यान झालेल्या कराराअंतर्गत वेलू नाचियार यांना शिवगंगाईची राणी घोषित करून राज्यकारभारासाठी अनुमती दिली. त्यावेळी राणी वेलू नाचियार यांनी, मारुथू बंधुंपैकी धाकटा बंधू मंत्री आणि थोरले बंधू सेनापती अशी नियुक्ती केली.
अशारितीने, वेलू नाचियार यांनी त्यांच्या पतीनंतर शिवगंगाईचा राज्यकारभार सुव्यवस्थित पद्धतीने चालवला. सन १७८० मध्ये राणी वेलू नाचियार यांनी मारुथू बंधूंकडे शासन सुव्यवस्थितरित्या चालवण्यासाठी लागणारे अधिकार दिले. यानंतर २५ डिसेंबर, १७९६ रोजी वेलू नाचियार यांचे देहावसन झाले.
मारुथू बंधू
पोन्नाथल (आनंदयेर) आणि मुखिया पलनीअप्पन सर्व्हई (उदयार सर्व्हई) यांची मुले ज्यांना मारुथू बंधू म्हणून ओळखले जात. मारुथू बंधू याचे मूळ गाव रामनाद (रामनाथपुरम) मधील कोंगुलू हे होते.
त्यांचा प्राचीन काळापासून तामिळनाडूमध्ये चालत आलेल्या पॉलिगार कुळ किंवा त्यांच्या जातीशी संबंध जोडला जात. परंतु, ऐतिहासिक दस्तऐवजांनुसार त्यांचा त्यांच्या कुळाचा कोणताही संबंध नव्हता. पुराव्यांनुसार त्यांची जात सेरवाईकरन आणि आडनाव मारुथू असल्याचे समजते.
मुथु वंडूगनाथा थेवार यांच्या अंतर्गत मारुथू ब्रदर्स यांनी कामगिरी बजावली. त्यानंतर त्यांना शिवगंगाईच्या सेनापतीपदी नियुक्त केले. बुमरॅंग्स हे नवीन शत्रांपैकी एक भारतासाठी खरोखर असाधारण होते. या चमत्कारिक लाकडांच्या शस्त्रांमुळे भारतात नवीन शस्त्रे तयार करण्याकरिता प्रोत्साहन मिळाले.
बुमरॅंग्स हे बाह्य भागाकडून धारदार तर शेवटच्या भागापेक्षा जड बनविली जातात. ज्याला तामिळ भाषेत वलारी (स्टिक) देखील म्हणतात. मारुथू ब्रदर्सबद्दल अशी मान्यता होती की, ते वलारी चालविण्याच्या कळते प्रवीण होते. त्याचबरोबर, असे मानले जाते की, मारुथू ब्रदर्स यांनी ब्रिटिश-पॉलिगार युद्धात देखील वलारीचा वापर केला होता.
मारुथू बांधवांनी केलेल्या पराक्रमांपैकी, शिवगंगाईला दिलेला वेढा आणि अरकोट नवाबच्या प्रदेशाची केलेली लूट लक्षणीय होती. त्यांनी हा वेढा १२००० सैनिकांसह दिला होता, ज्यामुळे नवाबची झोप उडाली. त्यामुळे नवाबने तातडीने मद्रास कौन्सिलकडे मदतीची याचना केली. ब्रिटिश सैन्याने कोल्लंगुडीवर सन २९ एप्रिल, १७८९ मध्ये हल्ला केला. त्यावेळीही, मारुथू बंधूंनी या युद्धात ब्रिटिशांचा दारुण पराभव केला होता.
इतिहासकारांच्या मते, मारुथू बंधू यांचा वीरा पांडिया कट्टाबोमन यांच्याशी संबंध होता. कट्टाबोमन हे पंचलांकुरीची येथील पॉलिगार (शासक) होते. मारुथू बंधूची अनेकदा पंचलांकुरीची येथील किल्ल्यामध्ये कट्टाबोमन यांच्याबरोबर अनेकदा राजनैतिक चर्चासत्रे होत असत.
कयात्तर येथे सन १७ ऑक्टोबर १७९९ या दिवशी इंग्रजांकडून वीरा कट्टाबोमन यांना फाशी देण्यात आली. त्यानंतर कट्टाबोमन यांचे भाऊ (मुके) ओमादुराय यांना चिन्ना मारुथू यांनी आश्रय दिला. त्यांनी जंबू द्वीपातील लोकांपुढे उद्घोषणा जारी करून जात-धर्म-पंथ याची पर्वा न करता सर्वांना बरोबर घेऊन ब्रिटिशांविरोधात रणशिंग फुंकले. शेवटी, इंग्रजांविरोधातील या स्वातंत्र्यसंग्रामाच्या यज्ञात मारुधू पंडियार यांना प्राणाची आहुती द्यावी लागली.
सन २४ ऑक्टोबर १८०१ या दिवशी तिरुप्पाथूर या शिवगंगा येथील किल्ल्यावर मारुथू पांडियार आणि वेल्लाई पांडियार यांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली.
वैशिष्ट्यीकृत छायाचित्राचे श्रेय: Shakthi Thevar, स्त्रोत: Wikimedia