लघु परिचय
घटक | माहिती |
---|---|
जन्म | १८१४ पुणे येथे |
कारकीर्द | क्रांतिकारक म्हणून १८५१ ते १८ एप्रिल १८५९ |
उल्लेखनीय कामगिरी | १८५७ चा उठावात झालेल्या अनेक युद्धांमध्ये नेतृत्व |
लहानपणीचे मित्र | नाना धोंडू पंत, राव साहेब, राणी लक्ष्मीबाई हे तात्या टोपे यांच्या लहानपणीपासूनचे मित्र होते. |
मृत्यू | १८ एप्रिल १८५९ |

तात्या टोपे म्हणजे रणझुंजार व्यक्तिमत्व. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढा दिला. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात घालवले.
पुण्यातील मराठी ब्राम्हण कुटुंबामध्ये जन्मलेल्या रामचंद्र पांडुरंग टोपे उर्फ तात्या टोपे हे लहानपणापासून खूप धाडसी होते. त्यांचे वडील बाजीराव द्वितीय यांच्या दरबारातील महत्वाचे सदस्य होते. ब्रिटिशांनी पुणे काबीज केल्यानंतर पेशव्यांना बिठूरला जावे लागले. त्यांच्याबरोबर तात्या टोपेंचा परिवारही बिठूरला गेला.
तात्या टोपे यांची पार्श्वभूमी
तात्या टोपे यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अनेक संकटे कोसळली. त्यामध्ये, लॉर्ड डलहौसी यांनी सन १८५१ मध्ये त्यांना मिळणारे निवृत्तीवेतन बंद केले होते. त्यानंतर ब्रिटिश शासनाच्या या जुलमी राजवटीविरोधात त्यांनी रणशिंग फुंकले.
ब्रिटिशविरोधी चळवळ
याच काळात नाना साहेब ब्रिटिशविरोधी मोहीम सुरु करत होते. तात्या टोपेंनी नाना साहेब यांना त्यांच्या मोहिमेत साथ देण्याचा निर्णय घेतला. तात्या टोपे आणि नाना साहेब मिळून सेनेची तयारी करत होते. १८५७ साली भारतामध्ये राजकीय अशांती निर्माण झाली.
तात्या टोपे यांचे सैन्य दर्शविणारे लाकडी शिल्प

या अस्तिरतेचा फायदा तात्या टोपेंनी घेतला. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीसाठी कानपुर येथे कार्यरत असलेल्या भारतीय सैनिकांवर विजय मिळवला. त्यांनी ७ जुन, १८५७ साली नाना साहेब यांना गादीवर बसवले. स्वतः त्या क्रांतिकारी सेनेचे सेनापती होऊन पुढील वाटचाल सुरु केली.
तात्या टोपे यांचा गनिमी काव्याचा उपयोग
ब्रिटिशांच्या अफाट सैन्यबळ आणि नवीन आधुनिक शस्रास्त्रांपुढे क्रांतिकारकांचे सैन्यबळ कमी होते. शिवरायांच्या गनिमी काव्याचा आधार घेत तात्या टोपेंनी ब्रिटिशविरोधी लष्करी मोहीम चालू केली. यानंतर त्यांनी अनेक लहान-मोठ्या मोहिमेत योगदान दिले. एक कुशल सेनापती, अद्वितीय रणनीतीकर अशी त्यांची ओळख होती. ते गनिमी काव्याच्या युद्धतंत्रामध्ये कुशल होते.
तात्या टोपे यांचा मातृभूमीसाठीचा संघर्ष
ब्रिटिशांनी कानपूरचे बंड मोडल्यानंतर तात्या टोपे आणि नाना साहेब यांनी झांशी येथे राणी लक्ष्मीबाईंकडे आश्रय घेतला. तेथे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध बंद पुकारला, त्यानंतर झांशीच्या संरक्षणार्थ प्रयत्न केले. झाशीला वाचवण्यात आलेल्या अपयशानंतर राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि नाना साहेब ग्वालिअरला गेले.
तेथील ग्वालीअरचा किल्ला ताब्यात घेऊन तेथील सैन्याच्या एकमताने नाना साहेब यांना तेथील पेशवा घोषित केले. ग्वालिअरच्या किल्ल्यातील उठाव हा निर्णायक उठाव होता.
ब्रिटिशांचे जनरल रोज यांनी या उठावाचाही पराभव केला. या उठावामध्ये भयानक कत्तल झाली होती. राणी लक्ष्मीबाईंना मात्र या लढाईमध्ये वीरमरण आले होते.
या युद्धामध्ये झालेल्या पराभवाने तात्या टोपे यांनी देशपातळीवर युद्ध केले. संपूर्ण देशभरातील ब्रिटिशांच्या महत्वाच्या ठिकाणी छापेमार युद्धपद्धती सुरु केली. त्यांनी मालवा, राजपुताना, खानदेश, बुंदेलखंड, आणि मध्य भारत या विस्तृत प्रदेशावर हल्ले करून ब्रिटिश सरकारला हैराण केले.
जून १८५८ ते एप्रिल १८५९ यादरम्यान यांनी अनेक लढे दिले. त्यांनी ब्रिटिशांच्या जवळपास अर्ध्या सैन्याने संपूर्ण गुप्तहेरांच्या मदतीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.
भारतीय भूविविधतेचा फायदा घेत, तात्या टोपेंनी नद्या, जंगले, डोंगर- दऱ्यांच्या आश्रयातून त्यांनी ब्रिटिश सरकारची अक्षरशः झोप उडवली. तात्या टोपेंना पकडण्यासाठी शेवटी ब्रिटिशांनी टोपेंच्या विश्वासू साथीदार “मानसिंग” याची मदत घेतली. लालची मानसिंगने तात्या टोपेंना पकडण्यात मदत केली.

७ एप्रिल १८५९ रोजी त्यांना पकडण्यात आले. क्षणाचाही विलंब न करता ते म्हणाले, “मी जे केले ते माझ्या मातृभूमीसाठी होते, आणि त्याची मला जराशीही खंत नाही!”
तात्या टोपेंचा मृत्यू
शेवटी १८ एप्रिल १८५९ रोजी त्यांना फाशी देण्यात आली. अशाप्रकारे, १८५७ च्या उठावाचाही याठिकाणी अंत झाला.
भारतभूमीचे अमूल्य रत्न असलेले तात्या टोपे हे १८५७ च्या उठवतील महत्वाचे क्रांतिकारक होते. त्यांच्या या जीवनचरित्रातून त्यांच्या संघर्षाचे पैलू आपल्याला समजतात. ग्वालियरच्या निर्णायक युद्धानंतरही तात्या टोपेंनी हार न मानता संघर्ष चालू ठेवला.
ब्रिटिश सैन्याच्या बराचवेळ समोर येऊनही बऱ्याचदा त्यांना पकडणे ब्रिटिश सेनेला जमले नव्हते. दरवेळेस ते नवीन ठिकाणी जाऊन मातृभूमीच्या स्वतंत्रतेसाठी संघर्ष करू इच्छिणाऱ्या लोकांना जमा करत. याच्या विरोधात भारतात अनेक भारतीय ईस्ट इंडिया कंपनीच्या जुलमाला कंटाळले होते. त्यामुळे तात्या टोपेंच्या या संघर्षात अनेक लोक सहभागी होत.
तात्या टोपेंच्या एका इशाऱ्यावर मरण्यासाठी तयार हजारो लोक त्याच्या उठावात सहभागी व्हायचे. लोकांचा तात्या टोपेंच्या युद्ध कौशल्यावर संपूर्ण विश्वास होता. या विश्वासाला तडा न जाऊ देता, त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरोधात लढा चालू ठेवला.