संपूर्ण भारतामध्ये शिर्डीच्या साई बाबांची एक अध्यात्मिक गुरु व तसेच महान संत म्हणून ओळख आहे. त्यांना भक्त प्रेमाने “साईनाथ” असेही म्हणतात. अत्यंत साधे राहणीमान असणारे साई बाबा हे फकीर होते.
साई बाबांचे जन्मस्थळ व जन्मतारीख
निश्चित पुराव्याअभावी त्यांचे जन्मस्थळ आणि जन्माची तारीखही पूर्णतः अज्ञात आहे. त्यामुळे त्याच्या जन्माविषयीच्या बऱ्याच अफवा प्रचलित आहेत. परंतु, वस्तुस्थिती पाहता त्यांच्या जन्माविषयीचे कोणतेही दस्तऐवज सध्या उपलब्ध नाही.

“साई” म्हणजे काय?
म्हाळसापतींनी त्यांना पहिल्यांदा पहिले तेव्हा त्यांनी “साई” अशी हाक मारली. त्यावेळी वापरात असणारी मराठी-उर्दू-फारशी भाषेत साई म्हणजे “यवनी संत” किंवा “फकीर” असे म्हणतात. सरतेशेवटी, सन १५ ऑक्टोबर १९१८ रोजी साई बाबांनी शिर्डीतच समाधी घेतली.
शिर्डीचे साई बाबा
साई बाबांनी जीवनातील बहुतेक काळ हा “शिर्डी” या गावात वास्तव्य केले. जे अहमदनगर जिल्यामधील राहता तालुक्यातील एक छोटेसे गाव होते. त्यामुळे त्यांची ओळख “शिर्डीचे साई बाबा” अशी पडली. शिर्डीत मिळणारा दैवी अनुभव, मनःशांती आणि आत्मविश्वास खरोखर अतुलनीय असतो. हेच कारण असावे, लाखो भाविकांचे शिर्डी हे श्रद्धास्थान बनले आहे.
साई बाबांची सुभाषिते
“अल्लाह मालिक” म्हणजेच परमेश्वर सर्वशक्तिमान आहे. या धार्मिक विचारांद्वारे त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्य साधले. शिवाय, परमेश्वर जात-धर्म-पंथ असा भेदभाव न बाळगता सर्व भक्तांवर आपली कृपा ठेवतो. त्याचप्रमाणे, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी “सबका मालिक एक” म्हणजेच सर्वांसाठी ईश्वर एक आहे, या विचाराने त्यांनी समाजामधील जातीभेद दूर करण्यात योगदान दिले.
हे दोन्ही धर्माचे काव्यमय सुभाषिते खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या अनुयायांना म्हटले की, आपण माझ्याकडे (गुरु म्हणून) पहा आणि मी आपल्याकडे पाहीन. त्यांच्याकडे येणाऱ्या सर्व अनुयायांना त्यांनी “अल्लाह तेरा भाला करेगा!” असे म्हटल्याचे आढळते.

साई बाबांची शिकवण
त्यांनी भौतिक नाशवंत गोष्टींवरील प्रेम हे आत्मज्ञानाच्या प्राप्तीचे प्राप्तीमध्ये कसे अडथळा बनते हे सांगितले. तसेच मानव जीवनाचा उद्देश हा आत्मज्ञनाची प्राप्ती करणे हाच आहे, हेही सांगितले. आत्मज्ञानाच्या शिकवणीबरोबर त्यांनी प्रेम, दयाभाव, क्षमा, दान, समाधान, आंतरिक शांतता, इतरांना मदत करणे, परमेश्वर आणि गुरूची करण्याचीही शिकवण दिली. खऱ्या धर्मोपदेशक सद्गुरुंना शरण जाण्याचे महत्वही सांगितले. त्यांनी सर्व अनुयायांना श्रद्धा आणि सबुरी म्हणजेच विश्वास आणि संयमतेची शिकवण दिली.
ऐतिहासिक दस्तऐवज
साई बाबांच्या जीवनाविषयीची प्रमाणित माहिती त्यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ “श्री साई सच्चरित्र” यामधून मिळते. जो हेमाडपंत (गोविंद रघुनाथ / अण्णासाहेब दाभोलकर) या त्यांच्या शिष्याने इसवी सन १९२२ साली लिहिला होता. हा ग्रंथ १९१० पासूनच्या, हेमाडपंत आणि इतर शिष्यांनी केलेल्या वैयक्तिक निरीक्षणावर आधारित आहे.
साई बाबा हे मूळचे शिर्डीतील नसले तरी त्यांचे जन्मस्थळ शिर्डीपासून फार दूर नसावे. साई बाबांना त्यांच्या जन्मस्थळ आणि पालकांविषयी विचारताच ते विरोधाभासी आणि दिशाभूल करणारी उत्तरे देत. “म्हाळसापती” या त्यांच्या अतिघनिष्ट अनुयायाला त्यांनी त्यांच्या जन्माविषयी सांगितल्याचे मानले जाते.
त्यानुसार, ते परभणी जिल्ह्यातील पाथरी गावातील एका देशस्त ब्राम्हण आईवडिलांच्या घरी जन्माला आल्याचे सांगितले जाते. तसेच, त्यांची जन्मदिनांक २७ सप्टेंबर, १८३७ ही असावी. एके दिवशी, त्यांच्यावर एक फकीराची देखभाल करण्याची जबाबदारी सोपवली. त्यानंतर, त्या फकिराने त्यांना “वेकुंशा” नावाच्या एका हिंदू गुरूंकडे पाठवल्याचे मानतात. काही लोक त्यांना मोमीन वंशाचे मुसलमान मानतात.
“साईधाम चॅरिटबल ट्रस्ट”ने केलेल्या शिर्डीमधील वंशावळींच्या संशोधनानुसार त्यांचे नाव “बाबा हरिभाऊ भुसारी” असून, त्याविषयी ठोस पुरावेदेखील त्यांच्याकडे आहेत. बरेच लोक या सिद्धांताचे समर्थनदेखील करतात.

साई बाबा आणि त्यांचे कार्य
जात आणि धर्माच्या आधारावर भेदभावाला त्यांनी प्रखर विरोध केला. त्यांच्या मते, माणूस मग तो हिंदू असो वा मुसलमान त्याला माणुसकीने वागवले पाहिजे. कारण, एकतेमध्ये जी ताकद आहे ती वेगळे राहण्यात नाही.
सर्वधर्मसहिष्णूतेची शिकवण देण्यासाठी ते स्वतः मशिदीत राहिले आणि त्या मशिदीचे नाव “द्वारकामाई मशीद” असे ठेवले. त्यांनी दोन्ही धर्मातील धार्मिक विधी, परंपरा, शब्द, आकृत्या यांचा सखोल अभ्यास करून त्यांचा अर्थ आणि त्यातील समानता लोकांना पटवून सांगितली. साई बाबांनी सर्व धर्मियांना एकत्र आणण्याचे काम केले. हेच कारण आहे की, प्रत्येक धर्मीय लोकांसाठी साई बाबा हे जवळचे वाटत.

साई बाबांची ख्याती
साई बाबांचे भक्त संपूर्ण जगभर मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांची अनेक मंदिरे जगभर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे भक्त त्यांना ईश्वरी अवतार मानतात. काही हिंदू भक्त त्यांना शिव अवतार मानत, काही दत्तावतार मानत, तर काही भाविक त्यांना विष्णूचा अवतार मानतात. तर, मुस्लिम धर्मातील सुफी संतांमध्ये साई बाबांचे स्थान अग्रणी आहे. त्यामुळे, शिर्डीतील साई मंदिरात जातिभेद, धर्म आणि पंथ दूर ठेवून सर्वच लोक साई बाबांच्या दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात.