Pushyamitra Shunga History

पुष्यमित्रांनी त्यांच्या जीवन काळात पुढील दोन मोठ्या लष्करी कारवायांना तोंड दिले:

१) विदर्भातील स्वतंत्र झालेल्या राज्यांचा पाडाव

२) परकीय आक्रमण कार्यं विरुद्ध विजय

पुष्यमित्र शुंग यांचे कहानीस्वरूप जीवनचरित्र:

“शांतीमय जीवन सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे, असे मानले जाते. परंतु, मानवाला शांतीमय जीवन जगण्यासाठी संघर्ष मात्र करावा लागतो.”

मगध सम्राट अशोक यांच्या मृत्यूनंतरचे उत्तराधिकारी मात्र हा संघर्ष विसरून गेले. त्यामुळे परकीय आक्रमणकाऱ्यांना परतवून लावण्यात ते असमर्थ ठरले. सिकंदरनंतर परत एकदा इंडो-ग्रीकांनी भारतामध्ये घुसखोरी केली. या स्वारीमुळे सिकंदरच्या काळात काबीज केलेल्या प्रदेशापेक्षा जास्त क्षेत्रावर ग्रीकांचे अधिपत्य झाले.

संघर्ष करण्याची धमक पूर्णपणे शिथिल झालेला राजा बृहद्रथ मगधच्या गादीवर विराजमान होता. असा कमजोर राजा जो परकीयांपासून मातृभूमीचे संरक्षण करण्यास असमर्थ आहे. अशा राजाला मगधसारख्या शक्तिशाली राज्याचे नेतृत्व करण्यातचा अधिकार नाही. असे मगधनरेश बृहद्रथचे सेनापती पुष्यमित्र शुंग यांना वाटले.

मगधाच्या दरबारातूनही त्यांना अनेक सरदारांचा पाठिंबा होता. परकीयांपासून मगध साम्राज्याला वाचायचे असेल तर, पुष्यमित्रांसारखाच सामर्थ्यवान राजा गादीवर यायला हवा, असेच सर्व दरबाऱ्यांना वाटे. पुष्यमित्रांनीही अनेकदा मगधनरेश नरेश बृहद्रथ यांना बदलण्याचा प्रयत्न केला. मगधच्या संरक्षणासाठी युद्धाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अनेकदा सांगितले. परंतु, काही केल्या मगच सम्राट बृहद्रथ युद्धासाठी तयार नव्हता.

बॅक्ट्रियन ग्रीक राजा मिलिंद (मिनँडर) याने भारतात पाय रोवायला सुरुवात केली होती आणि तो मगधच्याच दिशेने सरकत होता. त्यामुळे अखेरीस पुष्यमित्र शुंग यांनी मगधनरेश बृहद्रथचा वध करण्याचा निर्णय घेतला. पुष्यमित्र शुंग यांनी बृहद्रथचा सार्वजनिक स्थळी जाहीररित्या सर्व नागरिकांसमोर वध केला. अशा रीतीने मगधवर शुंग घराण्याची स्थापना झाली.

काही इतिहासकारांच्या मते, मौर्य घराण्यातील सम्राटांनी बौद्ध धर्माला आश्रय दिला. त्यामुळे मौर्य सम्राटांनी हिंदू यज्ञांमध्ये बळी देण्यास पूर्णपणे बंदी केली. त्यामुळे ब्राह्मण समाज मौर्य घराण्यावर नाराज होता.

त्याविरुद्ध, पुष्यमित्र शुंग जे स्वतः ब्राह्मण होते, ते मगधच्या गादीवर आल्यानंतर त्यांनी पुन्हा हिंदू रीतिरिवाजांना मान्यता दिली. एवढेच नव्हे तर, त्यांनी स्वतः त्यांच्या युद्धातील विजयानंतर अश्वमेध यज्ञ केला, ज्यामध्ये अश्वाची बळी दिली जाते.

असे केल्याने बौद्ध धर्मीय समाज दुखावला गेला आणि वैमनस्यातून बौद्ध धर्मियांनी पुष्यमित्रांविरोधी साहित्याची निर्मिती केली, असे एकंदर लक्षात येते.

काहींच्या मते, पुष्यमित्र शुंग यांनी शेकडो बौद्ध भिक्षुकांची हत्या केली होती. याचा पुरावा मात्र अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे ही विधाने असत्य असून केवळ पुष्यमित्रांविरोधीचे साहित्य असल्याचे लक्षात येते.

मगधचे महत्व:

सम्राट अशोक यांच्या मृत्यूनंतर मगधचे महत्व काही अंशी कमी झाले. त्याचे कारण असे की, त्यांच्यानंतर मगधला प्रतिभाशाली नेतृत्व मिळाले नाही.

यांचे दुसरे कारण असे की, सम्राट अशोकाच्या काळापर्यंत मगध हे संसाधनांनी संपन्न असे राज्य होते. सम्राट अशोकानंतर मध्यवर्ती प्रभावी शासकाअभावी मगधमधील संसाधनांचा वापर मगधाच्या शेजारील राज्यकर्त्यांनीदेखील केला. ज्याचा परिणाम म्हणून शुंग, कण्व, सातवाहन, कुशाण यांसारखी शक्तिशाली राज्ये उदयास आली.

पुष्यमित्र शुंगांनी मगध म्हणजेच मध्य भारतात राज्य केले आणि त्यांच्या राज्याची राजधानीही पाटलिपुत्रच होती. त्यांचे साम्राज्य शेवटचे मौर्य सम्राट अशोक यांच्या तुलनेत अगदी लहान होते. असे असले तरी, त्यांनी केलेला विद्रोह भारतभूमीला परकीयांच्या हाती जाण्यापासून रोखण्यासाठी महत्त्वाचा होता.

शुंग राजवंशापूर्वीचे मौर्य साम्राज्य:

मौर्य साम्राज्य हे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील शक्तिशाली ऐतिहासिक साम्राज्यांपैकी एक होते. या महान साम्राज्याचा उदय आचार्य चाणक्य यांच्या कूटनीती, राजकारण आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या शौर्याचा परिणाम होता.

सम्राट चंद्रगुप्तनंतर सम्राट बिंबिसार आणि सम्राट अशोक यांनी मौर्य महत्तता कायम राखली. परंतु, सम्राट अशोक नंतर मात्र सक्षम नेतृत्वाअभावी मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली. मौर्य साम्राज्याचा ऱ्हास होण्यामागे अनेक कारणे होती.

सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्याचे अनेक तुकडे झाले. मौर्य साम्राज्याचा क्षय रोखण्यासाठी पुष्यमित्र शुंग यांनी बंड पुकारत साम्राज्याची धुरा सांभाळली आणि त्यासाठी मगधसम्राट बृहद्रथची हत्या केली.

सम्राट झाल्यानंतर त्यांनी अगदी विषम परिस्थितीत असतानादेखील त्यांनी मगधचे अस्तित्व कायम राखले. कुशल नेतृत्व आणि त्यांच्या पराक्रमामुळेच गंगेच्या खोऱ्यातील एक मोठ्या प्रदेशाचे ऐक्य ते कायम ठेवू शकले.

पुष्यमित्र शुंग यांचे इतर धर्मांविषयीचे धोरण:

बौद्ध साहित्यनुसार, पुष्यमित्र शुंग यांच्या मनात बौद्ध धर्माविषयी चीड होती. त्यामुळे कुक्कुटरामा येथील बौद्ध मठावर त्यांनी हल्ला केला आणि नष्ट करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यावेळी मठाच्या संरक्षणासाठी अज्ञात अलौकीक शक्तींनी त्या मठाचे संरक्षण केले.

त्यांच्या मते, पुष्यमित्रांनी पूर्व पंजाब मधीलही अनेक बौद्ध भिक्षूंची हत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नातही ते अपयशी ठरले. जे प्रत्यक्षात पूर्णपणे अमान्य आणि असत्य आहे. याबद्दल आपणही विचार करून तर्क लावू शकता की, एक सम्राट जो विर्दर्भातील आणि परकियांविरुद्धच्या लढाईतही अपयशी नाही झाला. तो सम्राट बौद्ध भिक्षु आणि मठांचा विनाश करण्यात अपयशी ठरला? याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर द्या.

प्रत्यक्षात सांगायचे झाले तर पुष्यमित्र शुंग यांनी हिंदू धर्माला राजाश्रय दिला. ज्यामुळे बौद्ध धर्म प्रसारक आणि अनुयायी त्यांच्यावर नाराज होते.

दुसरे म्हणजे बौद्ध धर्म ग्रंथात येणारा अलौकिक शक्तींचा उल्लेख ज्यांनी महत्व बौद्ध भिक्षूंचे संरक्षण केले.

या उल्लेखामुळे, हे साहित्य पुष्यमित्र शुंग यांच्याविरोधात नाराजी आणि वैमनस्यातून तयार केल्याचे लक्षात येते. इतिहासकारही या विचारांशी सहमती दर्शवतात.
आणखी सांगायचे झाले तर, पुष्यमित्रांनी सर्व धर्मांबद्दल सहिष्णुतेचा भाव ठेवला, याचे पुरावे देखील मिळाले आहेत. पुष्यमित्रांच्या काळात त्यांनी अश्वमेध यज्ञ केला होता. त्याचप्रमाणे त्यांच्या काळात इतर हिंदू बळीपरंपरेलाही मान्यता होती. त्यांच्या कारकिर्दीत, हिंदूंप्रमाणेच बौद्ध लोकांनादेखील स्वतंत्रपणे धार्मिक विधी करण्यास परवानगी होती.

बौद्ध धर्मियांना देखील त्यांच्या धार्मिक क्रिया करण्यास संपूर्ण मान्यता होती. शुंग वंशाच्या काळात भारहूत आणि सांची या ठिकाणी मोठमोठ्या स्तुपांची निर्मिती झाली. या स्तूप निर्मितीसाठी लोकांनी देणगी दिल्याचे शिलालेख सापडले आहेत. पुराव्याने हे स्पष्ट होते की, पुष्यमित्र शुंग जेव्हा गादीवर आले, तेव्हा उत्तर-पश्चिम भारतातील बऱ्याच भागातील सामंतांनी उठाव केला आणि मगध पासून विभक्त झाले.

मौर्य सम्राट बृहद्रथचा वध केल्यानंतर विदर्भ प्रांतातील राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली. परंतु विदर्भाचे हे स्वातंत्र्य फार काळ टिकू शकले नाही. कारण, पुष्यमित्र यांचा पुत्र अग्निमित्र यांनी विदर्भावर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला.

पुष्यमित्र शुंगांनंतर अग्निमित्र हे मगधच्या गादीवर झालेले पराक्रमी राजा. अग्निमित्र हे पुष्यमित्र शुंग यांचे पुत्र होते. त्यांच्या पराक्रमाच्या अनेक कथा आपल्याला “मालविका अग्निमित्रा” या नाटकामध्ये वाचायला मिळतात. हा ग्रंथ उज्जैननरेश महान सम्राट विक्रमादित्य यांच्या दरबारातील प्रसिद्ध कवी कालिदास यांनी लिहिला.

सम्राट पुष्यमित्र शुंग आणि कलिंगनरेश खारवेल यांच्यामधील ऐतिहासिक वाद:

ऐतिहासिक व्यक्ती आणि त्यांच्याविषयीची माहिती ही पूर्णपणे पुराव्याच्या आधारावर पडताळून पाहिली जाते. त्यामुळे वेळोवेळी नवीन-नवीन तथ्य समोर येतात. या पुराव्यांमुळे बऱ्याच वेळा आधीच्या कल्पित इतिहासावर प्रश्नचिन्ह उभे राहते. असाच प्रश्न इतिहासकारांसमोर उभा राहिला जेव्हा हातपिंगा येथील कलिंग सम्राट खारवेलचा शिलालेख सापडला.

या शिलालेखात असा उल्लेख होता की, कलिंग नरेश खारवेलने पाटलीपुत्रवर स्वारी केली आणि युद्धात मगध सम्राट बृहस्पती मित्र याचा पराभव झाला. इतिहासकारांनी सुरुवातीला बृहस्पती मित्र म्हणजेच पुष्यमित्र शुंग असल्याचे समजले. काही काळानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, पुष्यमित्र शुंग हे खारवेल चे समकालीन नसून बृहस्पती मित्र हे वेगळे व्यक्ती आहेत. याबाबतचे शिलालेख “बहसतीमितम” या नावाने लिहिले गेले.

बॅक्ट्रियन ग्रीक यांची स्वारी:

पुष्यमित्र गादीवर येताच भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. भारतीय साहित्यात या आक्रमणकर्त्यांना “यवन” असे म्हटले आहे. ऐतिहासिक पुराव्यांवरून हे यवन बॅक्ट्रियन ग्रीक होते, हे स्पष्ट होते.

पतंजली यांनीदेखील त्यांच्या साहित्यात या परकीय आक्रमणकर्त्यांचा उल्लेख केलेला आढळतो. महान कवी कालिदास यांच्या साहित्यात शुंग आणि यवन यांच्यातील युद्धाचे वर्णन आढळते.

परकीय आक्रमणकारी राजा नेमका कोण होता, हे जरी स्पष्ट नसले, तरी इतिहासकारांच्या मते, तो राजा डेमिट्रियस किंवा मिलिंद (मिनांडर) होता. ज्यावेळी पुष्यमित्रांच्या नातवाने म्हणजेच वसुमित्राने मगधचे नेतृत्व करून इंडो-ग्रीक आक्रमणकाऱ्यांना परतवून लावले.

मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर मात्र असे लक्षात येते की, या इंडो-ग्रीक आक्रमणकाऱ्यांना मगधचा प्रदेश जिंकता आला नाही.

पुष्यमित्रांच्या जीवन काळातील महत्वाची घटना:

वरील दोन महत्त्वाच्या आणि मोठ्या लष्करी कारवायांनंतर पुष्यमित्र शुंग यांनी अश्वमेध यज्ञ करून त्यांच्या सार्वभौम सत्तेचे संपूर्ण जगाला दर्शन घडवले.

प्राचीन हिंदु ब्राह्मणवादी परंपरेनुसार पुष्यमित्र एक शक्तिशाली राजे होते. तसेच ते उच्चकुलीन राजे होते, ज्यामुळे त्यांना अश्वमेध यज्ञ करण्याचा विशेष अधिकार मिळाला.

ब्राम्हण समाज त्यांचा पुरस्कर्ता असल्याने ही अतिशयोक्ती असू शकते. तरी त्यांच्याविषयी ऐतिहासिक पुराव्यांवरून थोडक्यात सांगायचे झाले तर, पुष्यमित्र हे महत्वकांशी आक्रमक राजे नसले, तरी एक राज्यकर्ते म्हणून ते सक्षम होते.

पुष्यमित्र शुंग यांचा मृत्यू:

पुष्यमित्र शुंग यांची राजवट असताना त्यांच्यावर ब्राह्मणवादी व बौद्ध विरोधी सम्राट म्हणून टीकेचा वर्षाव झाला. याउलट त्यांचा मुलगा अग्निमित्र गादीवर आल्यानंतर मात्र त्यांचा परोपकारी आणि न्यायप्रिय राजा म्हणून गौरव केला.

अग्निमित्र एक आदर्श प्रशासक:

राजकुमार अग्निमित्र यांनी सुरुवातीला विदिशा प्रांताचा राज्यपाल म्हणून प्रशासकीय निपुणता दाखवली. त्यानंतर विदर्भातील लढाईत देखील अग्निमित्र यांनी सैन्याचे सरसेनापती म्हणून कार्यभार सांभाळला. प्रत्येक कसोटीमध्ये धैर्य आणि शौर्याच्या जोरावर ते खरे उतरले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच विदर्भ प्रांत पुन्हा एकदा शुंग साम्राज्यात विलीन झाला. याचा परिणाम म्हणून त्यांना साम्राज्याचा युवराज घोषित केले गेले.

सम्राट अग्निमित्र एक सक्षम प्रशासकाबरोबर पराक्रमी योद्धा देखील होते. त्यामुळे ते त्या काळचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व बनले. ऐतिहासिक पुराव्यानुसार त्यांनी केवळ आठ वर्षे राज्य केले. त्यांच्या कारकीर्दीतील नाणीही पुरातत्व विभागाला मिळाल्या आहेत. परंतु, गुप्तकाळातील सम्राट समुद्रगुप्त यांच्या कारकिर्दीतील नाण्यांप्रमाणे ही नाणी अग्निमित्रांच्या व्यक्तिमत्व आणि प्रशासकीय नियम यांच्याबद्दल कोणतेही संकेत देत नाहीत.

शुंग राजवंशाचा अंत:

वसुमित्र हे शुंग राजघराण्यातील शेवटचे पराक्रमी सम्राट होते. वसुमित्र यांच्याबद्दल फारसे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु, त्यांनी परकीय आक्रमणकाऱ्यांविरोधात झालेल्या युद्धात विजय मिळवून दिला. हा पुरावा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देण्यासाठी पुरेसा आहे. इतिहासकार असे मानतात की, पिता अग्निमित्रांच्या देहावसानानंतर वसुमित्र मगधच्या गादीवर आले.

सम्राट वसुमित्रानंतरच्या उत्तराधिकाऱ्यांविषयी इतिहासकारांना फारसे माहित नाही. पण, शुंग घराण्यातील एक राजा बृहस्पती मित्र होता. त्याच्या कारकीर्दीत कलिंगनरेश खारवेलने पाटलीपुत्रवर आक्रमण करून बृहस्पती मित्र याचा पराभव केला. याचा शिलालेख हातपिंगा येथे सापडला आहे. ऐतिहासिक पौराणिक साहित्यानुसार, शुंग घराण्याचे शासन अवघ्या ११२ वर्षे चालले. शुंग घराण्याचा शेवटचा राजा देवभूतीला दरबारातील बासुदेव या मंत्र्याने सिंहासनावरून हटवले. त्यानंतर बासुदेवने मगध साम्राज्याचे सिंहासन कण्व राज्यकर्त्यांकडे सोपवले. अशा रितीने शुंग राजघराण्याचे अस्तित्व संपुष्टात आले.

Featured image credits: Author: Wikimedia, Sources: Leiden University Library, Royal Netherlands Institute of Southeast Asian and Caribbean Studies.

Similar Posts