प्रस्तावना
माहिती
|
तथ्ये
|
---|---|
आरतीची वेळ
|
सकाळी: ६:३० वा, संध्याकाळी: ७:३० वा
|
मंदिरातील विशेष परंपरा
|
|
हे मंदिर पुण्यातील नवी नाना पेठेत येथे स्थित आहे. या मंदिराची स्थापना गुजराती सेठ कन्हैया जी यांनी इ. स. १८३० मध्ये स्थापित केली होती. हिंदू पुराणानुसार विठ्ठल हे भगवान विष्णूचा अवतार आहे. या मंदिराला निवडुंगा मंदिर नाव पडण्यामागे साहजिकच एक कथा आहे.
स्थानिक लोकांची अशी मान्यता आहे की, एका विठ्ठल भक्ताला याच ठिकाणी निवडुंगाच्या झाडाखाली एक काळ्या पाषाणात कोरलेली विठोबाची मूर्ती सापडली. त्यानंतर येथे छोटे देऊळ स्थापण्यात आले, त्यानंतर इ. स. १९२९ साली, पुरुषोत्तम शेठ या एका गुजराती व्यापाऱ्याने येथे जीर्णोद्धार करून मंदिर स्थापिले. आज हे मंदिर महत्वाचे सार्वजनिक स्थान असून सर्वांसाठी खुले आहे.
प्राचीन काळी निहाल पेठ असे नाव असलेल्या पेठेला इ. स. १७६१ मध्ये नाना फडणवीस यांच्या सन्मानार्थ नाना पेठ असे नाव ठेवण्यात आले. पेशवेकालीन पुण्यात माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीनंतर नाना फडवणीस हे सर्वात वरिष्ठ मंत्री होते. नाना फडणवीस यांनी त्यांच्या हयातीत मराठा साम्राज्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आवाक्याबाहेर ठेवले.
मंदिराचे वैशिष्ट्य
हे मंदिर पुणे महानगरपालिकेनुसार पुण्यातील वास्तूंमध्ये ग्रेड III दर्जाची वास्तू आहे. हे मंदिर एक दगड-विटांची उंच आणि भव्य रचना आहे ज्यामध्ये गर्भगृहात विठोबाची स्वयंभू मूर्ती आहे. गर्भगृहासमोर असलेला सभामंडपाचे छत आणि खांबांवर सुंदर लाकडी कोरीवकाम केलेले आहे.
हे बांधकामाची रचना ध्वनिकदृष्ट्या श्रेष्ठ मानली जाते. कारण सभागृह गर्भगृहाभोवताली असलेल्या प्रदक्षिणा मार्गाने वेढलेले आहे. ज्यामुळे आवाजाची तीव्रता बाहेर प्रसारित न होता सभागृहात वक्त्याच्या कमी आवाजातही शेवटपर्यंत आवाज पोहचतो.
येथील संगमरवरी गरुडाच्या मूर्ती ज्या योगी चांगदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दंतकथांवर आधारित आहेत. तर स्वर्गीय श्री सोनोपंत दांडेकर यांची चांदीची मूर्तीदेखील येथे आपणाला पाहायला मिळते. या मूर्तीनी मंदिराची शोभा वाढवली आहे. येथील सुंदर बांधकामाची रचना आणि दुर्मिळ मूर्ती या मंदिराला खास प्रेक्षणीय बनवते.
वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांची दिंडी परंपरा
सोनोपंत दांडेकर यांचे नाव शंकर वामन दांडेकर असे होते. ते महाराष्ट्रातील तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ होत. त्यांनी वारकरी संप्रदायाचे अनुसरण करत भक्ती चळवळीचे व्याख्याते बनत संप्रदायाचा प्रसार केला.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी भक्ती चळवळीवर जोर दिला. ज्यामुळे हळूहळू वारकरी संप्रदाय वाढत गेला. आजही दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून हे वारकरी पायी दिंड्यांमधून पंढरपूरला येत असतात. परंतु त्यामधील आळंदी, नाशिक, लोहगड येथून येणाऱ्या दिंड्या प्रमुख आणि मोठ्या असतात.
यांमधील आषाढ महिन्यातील (जून-जुलै) अकराव्या दिवशी येणाऱ्या शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी प्रवास करणाऱ्या दिंड्यांची संख्या जास्त असते. या असंख्य छोट्या दिंड्यांमध्ये आळंदीहून निघणाऱ्या दिंडीमध्ये वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.
या दिंडींमध्ये तरुण, वृद्ध, तर काही प्रमाणात लहान मुलेदेखील सामील होतात. लोक जात, सामाजिक-आर्थिक स्थिती यांना महत्व न देता एकोप्याने प्रवास करतात. आदराने सर्व लोक प्रवासादरम्यान स्त्रियांना माउली (आई) म्हणून संबोधतात. “राम कृष्ण हरी”चा गजर करत सर्व वारकरी मुक्काम घेत पंढरपूरला पोचतात.
दरवर्षी पंढरपूरला जाताना आणि परतीच्या अशा दोन्ही वेळेस संत तुकारामांची पालखी या मंदिरात थांबते. या मुक्कामात सर्व भक्त मिळून वर्तुळाकार रिंगणात फिरत भक्ती गीते गातात आणि प्रभूचे नामस्मरण करतात. याला चक्री भजन असेदेखील म्हणतात.
पुणे शहरातील या मंदिरातच नव्हे तर प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक विविध प्रकारे सेवा देतात. कोणी अन्नदान करते, कोणी मंडप व राहण्याची व्यवस्था पाहतात तर कोणी चहा-नाश्त्याची सोय करण्यासाठी तत्पर असतात.
जागोजागी स्थानिक आणि इतर स्वयंसेवक वारीच्या वाटेतील समस्यांबद्दल सांगतात. तर काही कलाकार त्यांच्या कलेची सांगड वारीच्या परंपरेबरोबर घालत वातावरण भक्तिमय करतात.