गुरु गोविंद सिंग – खालसाचे संस्थापक – शिखांचे दहावे गुरु

by एप्रिल 4, 2021

गुरु गोविंद सिंग यांचा थोडक्यात परिचय

गुरुगोविंद सिंग यांचा जन्म भारतामध्ये बिहार राज्यातील पटना जिल्ह्यामध्ये झाला. असे मानले जाते की, “गोविंद राय” हे शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे मानवी स्वरूपात जन्म घेतलेले गुरु होते. गुरु तेग बहादुरजी हे शीखधर्मियांचे नववे गुरु आणि गुरु गोविंद सिंग यांचे वडील होते. वडील गुरु तेग बहादुरजींच्या शहीदीनंतर वयाच्या नवव्या वर्षी २४ नोव्हेंबर १६७५ रोजी गुरु गोविंद सिंग गुरु झाले.

एक ईश्वराचा संदेशवाहक, योद्धा, कवी, आणि तत्त्वज्ञ असे सर्व गुण गोविंद सिंग यांच्या मध्ये होते. ज्यामुळे त्यांनी खालसा बंधू वर्गाची संस्था आणि गुरु ग्रंथ साहिबजी या पवित्र ग्रंथाच्या पूर्णतेसह शिख धर्माला सध्याचा आकार दिला. इसवी सन १६७५ मध्ये काश्मीरच्या ब्राह्मणांच्या विनंतीला मान देऊन श्री गुरु तेग बहादुरजींनी दिल्ली येथील चांदणी चौकात देहत्याग केला होता. ते करण्यापूर्वी गुरुगोविंद सिंग यांनी गुरुग्रंथसाहेब जी यांना शिखांचा पुढील, शाश्वत आणि चिरस्थायी गुरु म्हणून हुकूम दिला.

असे म्हटले तर वावगे ठरणार नाही की, आतापर्यंतच्या मानवी इतिहासवृत्तात, गुरु गोविंद सिंगजींपेक्षा प्रेरणादायी जीवन जगणारे कोणीही नव्हते.

गुरूंबद्दल प्रशंसेचे शब्द

सर्वांच्या तुलनेत त्यांना सर्बन्स दानी (दयाळू दाता, ज्याने आपल्या सर्वत्वाचा त्याग केला), मर्द अगामरा (समांतर नसलेला माणूस), शाह-ए-शहेनशहा (सम्राटांचा सम्राट), बार डो अलम शहा (दोन्ही जगाचा अधिपती) या विधानांनी त्यांना प्रतिष्ठित केले जाते.

“गुरु गोविंद सिंग यांच्या कार्याचा विचार केला तर, आपल्या धर्मातील सुधारणांसाठी अनुयायांसाठी नवीन कायदा लागू करण्यासंबंधी सर्व परिस्थितीत त्यांनी वैयक्तिक शौर्य दाखवले. विपरीत परिस्थितीतही त्यांनी धीर धरून वैयक्तिक शौर्य दाखवले. विपदेमधील त्यांच्या दीर्घ सहनशक्तीमुळे इतर लोक उद्विग्न आणि निराशावादी बनले. परंतु, शेवटी त्यांनीच शक्तिशाली शत्रूंवर विजय मिळवून दिला ज्यांना काही काळापूर्वी सोडून दिले होते. त्यामुळे शिखांनी त्यांच्या स्मृतीला आदर दिल्यास यात आश्चर्य नाही. ते निश्चितपणे एक महान मनुष्य होते.”

– डब्ल्यू. एल. मॅकग्रेगोर

गुरु तेग बहादुर यांच्याद्वारे घोषणा

असे म्हणतात की, गुरु तेग बहादुर यांनी त्यांच्या पुत्राला आज्ञा करत घोषणा केली की, “आपण असे पंथ-समुदाय तथा समाज निर्माण कराल की, अत्याचारी राज्यकर्त्यांना जीवनाच्या प्रत्येक मार्गावर न्याय, समानता, आणि शांतता पुनर्संचित करण्यासाठी आव्हान द्याल.” या घोषणेनंतर गुरु तेग बहादुर यांनी शहादत स्वीकारली.

खालसाच्या निर्मितीमागील उद्देश

गुरु तेग बहादुर यांच्या शाहिदीनंतर गुरु गोविंदसिंग शीख धर्माचे दहावे गुरु बनले. वडील आणि नववे गुरु तेग बहादुर यांच्या आज्ञेला सर्वतोपरी मानत गुरु गोविंदसिंग यांनी सर्व मानवजातीच्या कल्याणाकरिता तसेच दडपशाही शासन आणि त्यांच्या अत्याचारा विरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी सन १६९९ मध्ये खालसा दलाची स्थापना केली.

या खालसा दलामध्ये गुरु गोविंदसिंग यांनी संत आणि सशस्त्र सैनिकांद्वारे शासकांच्या जुलमी वृत्तींना आळा घालण्याबरोबरच धार्मिकतेची पुनर्स्थापना केली. त्याचबरोबर उत्पिडीत लोकांना प्रगतीच्या मार्गावर आणणे हादेखील या दलाचा उद्देश होता.

लोक त्यांना ईश्वरदूत मानतात आणि त्याकारणाने ते एक अद्वितीय गुरु आहेत. त्याचप्रमाणे, त्यांच्या शिकवणी शास्त्रीय आणि सर्वांकरिता अनादी काळा करितालागू आहेत. इतर ईश्वरदूतांप्रमाणे त्यांनी कधीही स्वतःला देव किंवा देवाचा पुत्र म्हटले नाही. त्याऐवजी, त्यांनी सर्व लोकांना देवाचे संतान मानले, जे देवाचे साम्राज्य बरोबरीने वाटून घेतात. तर स्वतःकरिता त्यांनी ईश्वराचा सेवक असा शब्द वापरला.

यापुढे जात गुरु गोविंद सिंग म्हणतात, “मला जे लोक ईश्वर म्हणतील ते नरकाच्या खोल पडतील. मला ईश्वराचा गुलाम म्हणून माना आणि तुम्हाला त्याबद्दल कोणतीही शंका मनात राहणार नाही. मी परम-परमात्म्याचा सेवक आहे आणि इथे जीवनाचे विस्मयकारक नाटक पाहायला आलो आहे.”

गुरु गोबिंदसिंग यांच्या लेखनाचे थोडक्यात अर्थ

“ईश्वराला कोणतेही गुण, रंग, जात, आकार, वर्ण, रूपरेषा, वेशभूषा, अथवा पूर्वज नसून तो अवर्णनीय आहे.”

“देव तेजस्वी, निर्भयी आणि अपरिमित आहे. तसेच तो राजांचा राजा आणि ईश्वरदूत अथवा संदेष्ट्यांचा प्रभू आहे.”

“परम-परमात्मा ही देवता, पुरुष, विश्व, आणि राक्षसांचा सार्वभौम सत्ताधीश आहे. वने आणि दऱ्या अवर्णनीय गातात.”

“परमेश्वरा, तुझे नाव कोणीही सांगू शकत नाही. शहाणे लोक आपल्या नावे मिळवण्यासाठी आपले आशीर्वाद मोजतात.”

गुरु गोविंद सिंग यांचा जन्म

असे मानले जाते, रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात एक दिव्य प्रकाशझोत चमकली. रहस्यवादी मुस्लिम पीर भिकान शाह यांनी पूर्वेच्या दिशेने (नित्यनियमाप्रमाणे पश्चिम दिशेऐवजी) आणि त्या दिव्य प्रकाशझोताच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांच्या अनुयायांबरोबर बिहारमधील पटना साहिब पर्यंत प्रवास केला.

याच ठिकाणी सन १६६६ मध्ये माता गुजरी यांच्या पोटी गोविंद राय यांचा जन्म झाला. असे म्हणतात की, पीर भिकान शाह यांनी बालक गोविंद राय यांच्याजवळ जाऊन त्यांच्यासमोर दूध आणि पाणी ठेवले. जे जगातील दोन महान धर्माचे म्हणजेच हिंदू आणि मुस्लिम धर्माचे प्रतीक आहे. त्यावेळी त्या बालकाने म्हणजेच गोविंद राय यांनी हसत दोन्ही पात्रांवर हात ठेवले. हे पाहून पीर भिकान शाह आनंदाने विनम्रतापूर्वक आणि आदरपूर्वक मानवतेच्या नव्या ईश्वरदूतासमोर झुकले.

गुरु गोविंद सिंग यांच्या जन्माबद्दल काही मान्यता

अशी मान्यता आहे की, गोविंद राय यांचा जन्म पवित्र धार्मिक कार्याकरिता झाला. आपल्याला त्यांच्या आत्मचरित्रात म्हणजेच “बाचितार नाटक” (मराठीमध्ये, अतिशय विस्मयकारक नाटक) मध्ये याची पुष्टी मिळते.

यामध्ये गुरु गोविंद रायांनी सांगितले आहे की, परमेश्वराने कसे आणि कोणत्या कारणास्तव त्यांना या जगात पाठवले. यात त्यांनी नमूद केले की, या जगात पदार्पण करण्यापूर्वी ते मुक्त आत्मा होते आणि सात शिखरे असलेल्या हेमकंट पर्वतावर ध्यान करण्यात गुंतले होते. ईश्वराबरोबर एकरूप झाल्यामुळे आणि अनंत आणि अनंत समवेत ते एक झाले, भगवंताने त्यांना आदेश दिला.

“मी तुला माझा पुत्र म्हणून सांभाळ करतो आणि तुला धर्माची स्थापना करून जगाला मूर्खपणाच्या कृत्यापासून रोखण्यासाठी तुला निर्माण केले आहे.”

मी उभा राहून हात बांधून नमन करत उत्तरतो, “‘जेव्हा तुमचा पाठिंबा असेल तेव्हा आपला धर्म सर्व सर्व जगात गाजवेल.”

गुरु गोविंद सिंग जी या जगात येण्याचा त्यांचा उद्देश स्पष्ट करतात. त्याचप्रमाणे, ते परम-परमात्यामधून वेगळे होऊन मानवी स्वरूपात येण्यामागे ईश्वराचा आदेश आणि इच्छा असल्याचे ते सांगतात.

गुरूंच्या जन्ममागील उद्दिष्ट्ये

गुरु म्हणतात, “मी पुढील उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या उद्देशाने या जगात आलो, हे येथील सात्विक लोकांना कळू द्या. माझा जन्म हा जगातील सदाचरणाला वाढवण्यासाठी, गुलामगिरीतून मुक्त करून समाजात समानता आणून पापींना मुळापासून उखडण्याकरिता झाला.”

गुरु गोविंद सिंग यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे वडील आणि नववे गुरु गुरु तेग बहादूर यांनी आसामबरोबर बेंगालमध्येदेखील प्रवास केला. त्यानंतर सन १६७० मध्ये गुरु तेग बहादूर पटनामध्ये परतले. पटनात परतल्यावर त्यांनी सर्वप्रथम परिवाराला पंजाबला परतण्यासाठी सांगितले.

गुरु गोविंद सिंग यांचे बालपण

पटनामध्ये गुरु गोविंद सिंग यांचे घर आणि जन्मस्थान होते, जिथे सध्या श्री पटना साहिब गुरुद्वारा आहे. गोविंद रायांनी त्यांचे संपूर्ण बालपण याच ठिकाणी व्यतीत केले होते.

इसवी सन १६७२ मध्ये गोविंद रायांनी शिक्षणाकरिता शिवालिकच्या पायथ्याशी वसलेले आनंदपूर (चक्क नानकी) येथे प्रस्थान केले. येथे त्यांनी वाचनाबरोबर पंजाबी, संस्कृत, ब्रज, तथा पर्शियन लेख लिहिले.

नऊ वर्षांच्या छोट्या वयात त्यांच्या जीवनाला आणि शीख समुदायाच्या भविष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि ईश्वराने त्यांना या समुदायाचे नेतृत्व करण्याची जवाबदारी त्यांच्यावर सोपवली.

काश्मिरी ब्राह्मणांचे आनंदपुरात पदार्पण

इसवी सन १६७५ च्या सुरुवातीला पंडित किर्पा राम यांच्या नेतृत्वामध्ये काश्मिरी ब्राम्हणांचा एक गट आनंदपूरमध्ये आला.

हिंदू लोकांवरील धर्मांतराची सक्ती

मुघल सेनापती इफ्तीकर खानने काश्मीरमधील सर्व पंडितांना धर्मांतर करण्यासाठी धमकी दिली. त्यामुळे पंडित किर्पा राम हे धार्मिक कट्टरतेने वेडसर झालेल्या इफ्तीकर खानच्या त्रासाने निराश होऊन आनंदपूरला आले. येथे त्यांनी गुरु तेग बहादूर यांना त्यांच्याकडून अशा विपरीत परिस्थितीत काय करावे यासाठी यासाठी सल्ला घेण्याच्या उद्देशाने काश्मिरमधील परिस्थिती सांगितली.

सर्वात कट्टर धार्मिक धोरण अवलंबण्यात मुघल बादशाह औरंगजेब भारतीय इतिहासात प्रथम स्थानावर येतो. संपूर्ण हिंदुस्तानातील हिंदू लोकांचे धर्मांतर करण्याचा त्याचा हेतू होता. त्यासाठी त्याने काश्मिरी ब्राम्हण पंडितांना
लक्ष्य केले. एकदा काश्मिरी ब्राह्मणांचे धर्मांतर झाल्यास भारतातील इतर भागांतील लोकांचे सहजरित्या धर्मांतर करता येईल, हा यामागील मुख्य उद्देश होता.

मुघल शासनाने त्यांना धर्मांतराचा करण्यासाठी किंवा न केल्यास त्याचे परिणाम भोगण्याकरिता सहा महिन्यांचा वेळ दिला होता.

गुरु तेग बहादूर यांचे विचार आणि सल्ला

गुरु तेग बहादूर चिंताग्रस्त असताना लहान गोविंद राय त्यांच्या सवंगड्यांबरोबर तेथे आले. गोविंद रायांनी वडिलांना विचारले त्यांच्या मुखावर कशाची चिंता दिसत आहे. कुईर सिंग यांच्या गुरबिलास पटशाही १० प्रमाणे, वडिल उत्तरले की, “थडगे हे धरतीने (पृथ्वीने) धारण केलेले ओझे आहे. त्या ओझ्याने झालेली या धरतीची झीज तेव्हाच भरून निघू शकते, जेव्हा कोणीतरी खरोखर योग्य व्यक्ती समोर येऊन आपला माथा टेकवेल. त्यानंतर, विपत्ति जाऊन परम-आनंदाची प्राप्ती होईल.”

गोविंद राय त्यांच्या निरागस भावातून उद्गारले, “हा त्याग करण्याकरिता तुमच्यापेक्षा योग्य आणि श्रेष्ठ कोणीही नाही.”

यानंतर गुरु तेग बहादूर यांनी त्या ब्राम्हण गटाला आपापल्या गावी जाण्यास सांगितले. त्यांच्या समस्येवर उपाय म्हणून, गुरु तेग बहादूर यांनी गटाला मुघल प्रशासनाला सांगण्यास सांगितले, “जर गुरु तेग बहादूर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्यास राजी झाल्यास आम्ही सर्व मुस्लिम धर्म स्वीकारण्यास तयार आहोत.”

गुरु तेग बहादूर यांची शहादत

काश्मिरी ब्राम्हणांनी प्रस्थान केल्यानंतर थोड्याच कालावधीत गुरु तेग बहादूर यांच्या त्यांच्या निवडक अनुयायांसह दिल्लीला प्रस्थान केले. दिल्लीला गेल्यावर त्यांच्यासह त्यांच्या अनुयायांना बंदी बनवले गेले. गुरु तेग बहादूर यांना भयभीत करून राजी करण्याकरिता त्यांच्या अनुयायांना अतिशय निर्दयी आणि कठोर दंड देण्यात आले. त्यांच्या अनुयायांनी त्या सर्व यातना सहन केल्या, परंतु धर्मांतर करण्यास राजी झाले नाही.

मरणोत्पर यातना दिल्यानंतर त्यांचा गुरु तेग बहादूर यांच्यासमोरच शिरच्छेद करण्यात आला. त्यानंतर गुरु तेग बहादूर यांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले. परंतु, त्यांनीही धर्मांतर करण्यास साफ नकार दिला. ज्यामुळे त्यांनादेखील ११ नोव्हेंबर, १६७५ रोजी देहदंडाची शिक्षा देण्यात आली.

गोविंद राय यांची गुरु म्हणून नेमणूक

गुरु तेग बहादूर यांनी आनंदपूर सोडून दिल्लीला प्रस्थान करण्यापूर्वीच त्यांच्यानंतरच्या होणाऱ्या शीख गुरुची नेमणूक केली होती. त्यानंतर, मार्च महिन्यात येणाऱ्या बैसाखीच्या दिवशी, इसवी सन १६७६ मध्ये गोविंद राय यांची औपचारिकपणे शिखांचे दहावे गुरु म्हणून स्थापना झाली. समाजाची चिंता असताना आणि त्यांच्यासंबंधी सर्व व्याप सांभाळताना, त्यांनी त्यांची शारीरिक कौशल्ये आणि साहित्यिक महारतही जगाला दाखवली.

ते तारुण्यात अतिशय सुंदर, अंगाने लवचिक, परंतु मजबूत बांध्याचे, आणि शरीराने उत्साहपूर्ण होते.

गुरु गोविंद सिंग यांची पहिली काव्यरचना

गोविंद राय यांना नैसर्गिकरित्या काव्यरचनेची आवड होती, त्यामुळे त्यांनी सुरुवातीची वर्षे त्याचाच अभ्यास केला. सन १६८४ मध्ये त्यांनी रचलेले “वार श्री भगवती जी की”, ज्याला “चंडी दि वार” असेही म्हटले जाते.

अन्यायाविरुद्ध प्रेरित करण्यासाठी केलेल्या रचना

मार्कंडेय पुराणातील पौराणिक दंतकथा ज्यामध्ये देवता आणि राक्षसांमधील प्रतियोगिता गोविंद रायांना या कवितेत चित्रित केली आहे. हे त्यांचे एकमेव मोठे काव्य पंजाबी भाषेतील आहे. याला आणि यानंतरच्या त्यांच्या काव्यसंचनेला दर्शविण्यासाठी युद्धाप्रिय कथावस्तूची निवड खासकरून त्यांच्या अनुयायांमध्ये युद्धाविषयी मन बनवण्यासाठी केली. ज्यामुळे त्यांचे अनुयायी अन्याय आणि जुलूमशाहीविरुद्ध उभे राहण्यास प्रेरित झाले.

गुरु गोविंद सिंग यांनी त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीच्या २० वर्षांपर्यंत, योद्धा म्हणून लागणारे युद्ध प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान कसरत करण्याबरोबर त्यांनी संस्कृत, पर्शियन भाषा अभ्यासल्या. हिंदू साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याकरिता त्यांनी अवघ्या ५२ कवींना हिंदू महाकाव्ये भाषांतरित करण्यासाठी गुंतवले.
संपूर्ण शीख समुदायात लढाऊपणाचा भाव आणण्याकरिता प्राचीन काळातील नायकांच्या कथा त्यांनी पंजाबी भाषेत भाषांतरित केल्या. गुरुनी वरीलप्रमाणेच अकाल उस्तात, जाप साहिब, सावयास यासारख्या अनेक रचना साकार केल्या. याचबरोबर सर्वात लक्षणीय म्हणजे, त्यांनी जमुना नदीच्या काठावर “पौंटा साहिब” या गुरुद्वाराची स्थापना केली.

गुरु गोविंद सिंग यांच्याद्वारे स्थापित पौंटा साहिब गुरुद्वारा

यमुना नदीच्या तीरावर गुरु गोविंद सिंग यांच्याद्वारा एप्रिल १६८५ मध्ये वसवलेल्या ही गुरुद्वारा महत्वाची मानतात. कारण, त्यांचे बरेचशे कल्पक साहित्याचे कार्य त्यांनी पौंटा साहिब येथेच पार पाडले. या गुरुद्वारात एप्रिल १६८५ मध्ये ते तात्पुरते स्थलांतरित झाले होते.

गुरूंच्या जीवनातील काव्याचे महत्व

उत्कृष्ट काव्यकला अंगी बाळगून स्वतःला त्या क्षेत्रात साध्य करणे, हे जरी त्यांचे मुख्य उद्देष्ट नसले, तरी त्यांची त्या क्षेत्रातील कामगिरी लक्षणीय होती. त्यांच्यासाठी काव्य म्हणजे दैवी निती-तत्वे प्रकट करून त्यांच्याकडील परमेश्वराबद्दलचा वैयक्तिक दृष्टिकोन प्रकट करण्याचे दिव्य साधन होते. त्यांच्या सावयास, अकाल उस्तात, जाप साहिब ह्या अशाच तत्वज्ञानात्मक रचना होत्या.

गुरु गोविंद सिंग यांचे विचार

त्यांच्या कवितेतून त्यांनी जगाला नैतिक मूल्यांसह प्रेम आणि समानतेचा उपदेश दिला. त्याकाळच्या अंधश्रद्धा आणि प्रथा-पालनाचा निषेध करत त्यांनी मूर्तीपूजेला विरोध दर्शवत एकाच ईश्वराची उपासना करण्याचा उपदेश केला.
तलवारीचा गौरव करत प्रशंसेमध्ये तिला भगवती म्हटले, ज्यामुळे त्यांनी ईश्वराच्या न्यायाची पूर्तता केली.

त्यांच्यामते, तलवार ही आक्रमकतेचे प्रतीक नसून, आणि कधीही तिचा वापर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. तर, तलवार हे स्वाभिमान आणि मानवतेचे प्रतीक होते. त्यामुळे, तिचा वापर फक्त स्वसंरक्षणाकरिता शेवटचा उपाय म्हणून करायचा. याबद्दल, गुरु गोविंद सिंग यांनी जफरनामामधील पर्शियन दोहऱ्यात म्हटले आहेत की, “जेव्हा सर्व साधने अपयशी ठरली, तेव्हाच तलवार हाती घेणे कायदेशीर आहे.” (पद्य २२)

गुरु गोविंद सिंग यांचा प्रभाव

पौंटा येथे आल्यानंतर गुरु गोविंद सिंग हे मोकळ्या वेळात वेगवेगळ्या प्रकारची कसरत करत. यामध्ये पोहणे, धनुर्विद्या, घुडसवारी कसरती समाविष्ट होत्या. गुरु गोविंद सिंग यांच्या वाढत्या प्रभावाने आसपासच्या डोंगराळ भागातील राजपूत राजांना ईर्षा वाटली. त्यामुळे गुरूंवर हल्ला करण्याच्या उद्देशाने त्यांनी राजा फतेह चंद याच्या नेतृत्वाखाली सैन्यशक्ती एकवटली.

हुसेन लढाई

बचित्रा नाटकातील श्लोकानुसार, या लढाईदरम्यान अलिफ खान याने छावणीकडे लक्ष न देता गोंधळलेल्या अवस्थेत तेथून पलायन केले. नादावूर या ठिकाणच्या लढाईशिवाय हुसेन लढाई हीदेखील काहीशी लोकप्रिय आहे. हुसेन लढाई ही शाही सेनापती हुसेन खान यांच्याविरुद्ध २० फेब्रुवारी १६९६ मध्ये लढली. या लढाईत शिखांचा निर्णायक विजय झाला.

उदारमतवादी प्रिन्स मुआज्जम याची पंजाब बरोबर उत्तर-पश्चिम भागाचा व्हाईसरॉय म्हणून सन १६९४ मध्ये नियुक्ती झाल्यानंतर, सत्तेतील अधिकाऱ्यांच्या दबावामुळे त्याला काही काळ आराम मिळाला. हाच प्रिन्स नंतर सम्राट बहादुरशहा म्हणून इतिहासात ओळखला जातो.

१७५६ साली झालेल्या संबतमध्ये गुरु गोविंद सिंग यांनी शीख सांगत आणि समुदायाविषयी दिशा निर्धारित केल्या. याप्रमाणे, त्यांनी सर्व भागातील स्थानिक मंत्रीगण आणि मसंद यांना मान्यता न देण्याचे संकेत दिले. दुसरे म्हणजे सर्व शीख बांधवांना सर्व समर्पित गोष्टी आनंदपूरला पाठविण्यास सांगितले.

भांगानीचे युद्ध

डोंगराळ भागातील राजा भीम चंद यांच्यासारखे राजे जे हुद्यांवर कायम राहण्याकरिता आपल्या मुलींना खंडणी म्हणून द्यायला तयार झाले. यावर गुरु गोविंद सिंग यांनी स्पष्ट समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना औरंजेबाविरोधात राजपूत राजांचा पाठिंबा मिळाला नाही.

तर, याउलट या राजांनी गुरु गोविंद सिंग यांची सत्ता आणि प्रभाव नष्ट करण्याच्या हेतूने मुघलांशी हातमिळवणी करत अनेकदा कट रचला.

भांगम येथील लढाई

फतेह चंद याची सप्टेंबर, १६८८ मध्ये पौंटाच्या उत्तर-पूर्व दिशेने सुमारे १० किमी अंतरावर भांगम येथे एक चकमक झाली. ज्यामुळे त्यांची सैन्यशक्ती, शस्त्रसाठा यांबरोबर एकूण हालत दयनीय झाली. यादरम्यान गुरु गोविंद सिंग यांना पौंटा सोडून आनंदपूरला जाण्याची संधी मिळाली.

गुरूंबरोबर काही शीख लोक मुघल सेनापती अलिफ खानबरोबर युद्धात भाग घेतला. हे युद्ध मार्च १६९१ मध्ये बियास नदीच्या काठी वसलेल्या नादावूर याठिकाणी झाले. हे ठिकाण कांगराच्या दक्षिण-पूर्व भागामध्ये ३० किमी अंतरावर आहे.

एवढे करूनही डोंगराळ प्रांतातील राजांच्या हाती निराशाच आली. कारण, मूठभर शीख सैन्याच्या जोरावर गुरूंनी अनेकदा सळो की पळो करून सोडले.

नादौनची लढाई

विकीपीडिया अनुसार, हे युद्ध राजा भीम चंद आणि वझीर खान (मिर्झा अस्कारी) यांच्यात झाला. या युद्धात राजा भीम चंद यांना गुरु गोविंद सिंग, दाढवळचे राजा प्रिथी चंद आणि शीख अनुयायांचा पाठिंबा होता. तर, वझीर खानला अलिफ खान, किरपाल चंद, बिजारवालचे राजा दयाल, कांग्राचा राजा किरणपाल चंद यांचा पाठिंबा होता.

भांगानीच्या लढाईनंतरचे गुरु गोविंद सिंग यांनी लढलेले हे दुसरे युद्ध होते. या लढाईचे वर्णन हे गुरु गोविंद सिंग यांच्या आत्मचरित्रात म्हणजेच बचित्तार नाटकातही आढळते.

सिखीविकी अनुसार, मुघल बादशाहला खंडणी देण्यास विरोध दर्शवल्याने या युद्धाची सुरुवात झाली. या लढाईत गुरूंचा पाठिंबा असलेल्या राजा भीम चंद आणि साथीदारांचा विजय झाला.

पुरोहित आणि मसंद यांना शिक्षा

मसंद आणि पुरोहित हे भरणा गोळा करतेवेळी गरीब शिखांना लुटत. काही शिखांनी त्याविषयी गुरूंकडे जाऊन तक्रार केली. गुरूंनी अशा मागण्या रद्द करत लूट करणाऱ्यांना कठोर दंड दिला.

त्यानंतर बैसाखीच्या पर्वावर सर्व शिखांना आपले दान आनंदपूरला करण्यास सांगितले. गुरूंनी नेहमी स्व-स्वाभिमानी समुदाय निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी नेहमी साधे जीवन आणि मेहनतीला प्राधान्य दिले. त्यांच्यामते, शक्तीशाली सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणायचे असेल तर, शौर्याइतकेच धैर्य ठेवणे देखील महत्वाचे आहे.

गुरु गोविंद सिंग यांनी काही काळानंतर आनंदपूरलाच शस्त्रागार बनवले जिथे चांगल्या प्रतीचे भाले आणि तलवारी बनत. आनंदपुरवरूनच सर्व शीख सैनिकांसाठी लागणाऱ्या शस्त्रांची निर्मिती होत.

ब्राह्मणांच्या मते, गुरूंनी विजयाची कामना करण्याकरिता माता दुर्गेची पूजा करावी. त्यावेळी, गुरूंनी कोणताही विरोध न करता ते मान्य केले, जोपर्यंत त्यातुन काहीही निष्पन्न झाले नाही.

त्यानंतरच्या एका निर्णायक क्षणी गुरू आपली तलवार म्यानातून बाहेर काढत उद्गारले, “ही तलवारच माता दुर्गा आहे, जी आपल्याला शत्रूंवर विजय मिळवून देईल.”

गुरूंच्या स्पष्ट सर्व शिखांना सुचवले, आपण कोणताही मध्यस्ती न ठेवता थेट आनंदपुरात यावे. यामुळे गुरु गोविंद सिंग यांना सहजरित्या सर्व शिखांशी संबंध प्रस्थापित करता आले.

त्यानंतर ३० मार्च १६९९ या दिवशी सर्व शीख समुदाय आनंदपूर येथे बैसाखीच्या पर्वावर एकत्र आला आणि याच दिवशी खालसा दलाची स्थापना झाली.

खालसा दलाची स्थापना

आनंदपूर येथील अमृत संस्कार सोहळा

केसगड साहिब येथील मोकळ्या मैदानात हा सोहळा आयोजित करण्यात आला. गुरु गोविंद सिंगांनी आपली तलवार बाहेर काढत आपल्या कणखर आवाजात म्हणाले,”मला एक मस्तक पाहिजे आहे, आपल्यापैकी कोणी असे आहे का, जे मला अर्पण करेल?”

गुरूंच्या अशा विचित्र मागणीमुळे संपूर्ण समुदायात दहशत निर्माण झाली. सर्व लोक विस्मित होऊन पाहत होते. शेकडो लोकांच्या त्या समुदायात आता शांतता पसरली. कोणीही गुरूंच्या आवाहनाला सामोरे जायला तयार नव्हते.

काही क्षण थांबल्यानंतर गुरूंनी परत एकदा विचारणा केली, “एवढ्या समुदायात असे एकही नाही जो माझी इच्छा पूर्ण करू शकेन?”

गुरुंच्या दुसऱ्या विचारणे नंतरही कोणी प्रतिसाद द्यायला पुढे आले नाही.

त्यामुळे गुरूंनी आणखी एकदा आवाहन केले, एवढ्यात तिथे एक तरुण पुढे आला, ज्याचे नाव होते “दया राम.”

हा लाहोर येथे खत्री होता, तो पुढे येऊन म्हणाला, “हे सत्यवादी राजन, माझे मस्तक आपल्या सेवेत हजर आहे.”

गुरूंनी त्या दया रामला हाताने धरून जवळच उभारलेल्या तंबूत नेले. सर्व शीख समुदाय हे पाहत होते, “एवढ्यात आतून जोरदार प्रहार केल्याचा आवाज आला.” हा आवाज ऐकून सर्व जनसमुदायाच्या अंगावर काटे उभे राहिले.

त्यानंतर काहीच क्षणात गुरु बाहेर आले, त्यांच्या हातातील तलवारीच्या पात्यावरून रक्त टपकत होते.

गुरूंनी सलग पाच वेळा असे आवाहन केले आणि दया रामनंतर दिल्लीचे जाट धर्म सिंग, द्वारकेतील शिंपी मोकाम चंद, जगन्नाथ पुरी येथील स्वयंपाकी हिम्मत चंद, आणि मध्य भारतातील बिदर या ठिकाणचे न्हावी साहिब चंद पुढे आले.

प्रेत्येक वेळी गुरूंनी सर्वांना तंबूमध्ये नेत आणि त्यानंतर जोरदार आघात करण्याचा आवाज येई आणि त्यानंतर रक्ताने माखलेल्या तालवारीनिशी ते बाहेर येत. शेवटच्या वेळी मात्र ते काही काळ तंबूत राहिले. जमलेल्या संपूर्ण जमावाने सुटकेचा श्वास घेतला. सर्वजण विचार करू लागले की, गुरुंना बहुधा त्यांच्या चुकीचा आभास झाला असेल.

पाच अनुयायी

गुरूंनी त्या आपल्या पाच स्वयंसेवकांना सुंदर वस्त्रे परिधान करायला दिली. त्या पाच स्वयंसेवकांनी गुरूंना आपले मस्तक अर्पित केले होते. त्यामुळे गुरु गोविंद सिंगांनी स्वतःला आणि त्यांच्याबरोबर त्यांचा गौरव त्यांना दिला.
थोड्या वेळात ते तंबूतून बाहेर आले तेव्हा ते सर्वात तेजस्वी स्वरूपात होते.

सर्व शीख समुदाय अचंबित झाला आणि प्रत्येक व्यक्तीने हळहळ व्यक्त केली की, आपण आपले मस्तक गुरूंना अर्पित करायला का तयार झालो नाही. या पाच स्वयंसेवकांना पंजाबी भाषेत पंज प्यारे असेही म्हटले आहे.

चरण पौहाल ही गुरु नानकांच्या काळापासून चालत आलेली परंपरा होती. या परंपरेनुसार, सर्व लोक गुरूंच्या पायाला स्पर्श केलेले पवित्र जल लोक पीत. गुरु गोविंद सिंगांनी त्यांना उभे करून आपल्या आदेशावरून (खांडे दी पोहल) रिवाजाला सुरुवात केली.

या रीतीप्रमाणे पहिल्यांदा त्यांनी लोखंडी पात्रात शुद्ध जल घेतले. या पात्राला सर्बलोहचा बट्टा असेही म्हणतात. या पात्रात दोन खंडा (तलवारी) घेऊन ढवळण्यास सुरु केले. त्यानंतर गुरबानीचे (पाच बाणीस-जपजी, जाप साहिब, आनंद साहिब, स्वयास, आणि चौपाई) पठण केले. त्यानंतर गुरूंच्या पत्नी, माता साहिब कौर यांनी आणलेले पाटासास म्हणजेच साखरेचे खडे पाण्यात टाकून विरघळावले.

पाच विश्वासूंमध्ये अमृत संचार

अमृत जल तयार झाल्यावर गुरु ते लोखंडी पात्रात घेऊन उभे राहिले. पाची अनुयायी आता डावा गुडघा जमिनीला टेकवून गुरूंकडून अमृतजल ग्रहण करणार होते. गुरूंनी पाचदा ते दैवी अमृत पाची अनुयायींना पाचदा तळहातावर दिले. त्याचप्रमाणे केश आणि डोळयांतदेखील प्रत्येकी पाचदा शिंपडले. प्रत्येकवेळी शिंपडताना त्यांना “वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह” असे मोठ्याने म्हणायला सांगितले. याचा मराठीत अर्थ असा होतो की, “खालसा दल हे ईश्वराचे असून आणि त्याच्याच नावावर सर्व विजय आहे.”

अशाप्रकारे पाची अनुयायांना ते अमृतजल वितरित करण्यात आले. जातीविरहित बंधुत्वाची दीक्षा देण्याकरिता एकाच पात्रातून जल पिण्यास सांगितले. त्यानंतर त्या पाची विश्वासूंनी बाप्तिस्मा गुरूंकडून घेतला आणि त्यांना “पंज प्यारे” किंवा पाच प्रिय असे म्हटले.

त्यानंतर, गुरूंनी आपल्या अनुयायांना नावे दिली. गुरूंनी प्रेत्येकाच्या आडनावाऐवजी सिंग (सिंह) लावत दया रामचे दया सिंग, धरम दासीचे धरम सिंग, मोहकम चंदचे मोहकम सिंग, हिम्मत चंदचे हिम्मत सिंग, आणि साहिब चंदचे साहिब सिंग अशी नावे दिली. या पाची अनुयायांना गुरूंनी शुद्ध, स्वतंत्र, सर्वोच्च आणि खालसा असेही संबोधले.

अनुयायांना त्यानंतर खालील गोष्टींचे आदेश दिले

⦿ “के” सह सुरू होणारे खालील बाबी त्यांनी परिधान केले पाहिजे:

केश: न कापलेले केश हे संतत्वाचे नैसर्गिक स्वरूप दर्शविते. ही खऱ्या शीख धर्माची निशाणी आहे.
कंगी: वाढलेले केश स्वच्छ ठेवण्याकरिता एक कंगी
कच्छा: सद्गुणी चारित्र्य दर्शविण्याकरिता कच्छा
कारा: दैवी वधूला समर्पण आहोत यांची निशाणी म्हणून लग्न झालेल्या मुलाच्या मनगटावर लोखंडी हातकडी
किर्पान: सामर्थ्य, प्रतिष्ठा आणि अविजीत आत्मा यांचे प्रतीक म्हणून तलवार

सर्व अनुयायांनी खालील बाबी अवश्य पाळल्या पाहिजे:
१) केशवपन किंवा शरीरावरील केस काढू नयेत.
२) कोणत्याही अमली किंवा मादक पदार्थांचे (मदिरा) तसेच तंबाखू, गुटखा यांचा वापर किंवा सेवन न करणे.
३) कुठ मांसचे (हलाल किंवा कोशर) स्पर्श किंवा सेवन न करणे. (काबूलमधील शिखांना गुरु गोविंद सिंगांनी एका हुकूमनाम्यात स्पष्ट केले आहे)
४) जारकर्म किंवा व्यभिचार करू नये: “पर नारी की सेज, भूल सुप्पे हुन ना ना जाय” म्हणजेच तुमच्या पत्नीशिवाय इतर स्त्रीचा पलंगचा स्वप्नातही आनंद घेऊ नका.

गुरूंनी संपूरक अध्यादेश जरी केला की, ज्याने या चार मार्गदर्शक तत्वांचे पालन जो करणार नाही, त्याचा पुन्हा बाप्तिस्मा झाला करून अशा व्यक्तीला दंड भरावा लागेल. तसेच त्याने आणखी कोणालाही कष्ट न देण्याचे वचन द्यावे, अन्यथा अशा व्यक्तीस खालसा दलातून वगळण्यात यावे.

⦿ सर्व शीख अनुयायांनी रोज प्रातः काळी उठून स्नान करावे. त्यानंतर गुरुमंत्र वाहेगुरुंचा जाप आणि पाच बाणीस म्हणजेच जपजी आणि स्वयास सकाळच्या वेळी, संध्याकाळी रेहरास, आणि झोपण्याच्या आधी किर्तन सोहेला यांचे पठण करावेत.
⦿ गुरूंनी अनुयायांना स्मशानभूमी, आणि मूर्ती पूजन करण्यास ताकीद दिली. त्याऐवजी, गुरूंनी उपदेश असा उपदेश दिला की, ईश्वर एकच असून एकाच ईश्वरावर विश्वास ठेवावा. प्रेत्येक शीख अनुयायाने नित्यनियमाने शस्त्रांचा अभ्यास करावा. पुढे गुरु युद्धामध्ये प्रेरित करत सांगतात की, एक सच्चा शीख कधीही युद्धामध्ये पाठ फिरवत नाही. जर, कोणी असे करत असेल तर तो व्यक्ती कधी शीख नव्हताच.

प्रत्येक शीख अनुयायीने नेहमी गरिबांची मदत करण्यास तयार असले पाहिजे. जो कोणी स्वतःच्या रक्षणाखातीर आपल्याकडे येईल त्याची मदत आणि रक्षण करावे. तसेच, कोणत्याही प्रकारचा जातीभेद न पाळता आपण सर्व एकाच कुटुंबातील भाऊ-बहीण आहोत, असा विचार मनात रुजवावा. सर्व शीख लोकांनी शीख समुदायामध्ये परस्परांत विवाह रचावेत.

गुरु गोविंद सिंग यांच्या द्वारे अनुयायांकडून अमृत विनवणी

गुरुनीं पाची अनुयायांना अमृत वाटप केल्यानंतर पुढे जात हात बांधून उभे राहिले. अनुयायांना जसा बाप्तिस्मा दिला त्याचप्रमाणे देण्याची विनवणी गुरूंनी केली. म्हणजेच गुरु स्वतः त्यांचे शिष्य झाले. गुरु गोविंद सिंग यांना यामुळे अद्भुत मानले जाते कारण, ते स्वतः गुरु आणि शिष्य बनले.

खालसा दलाची स्थापना

सर्व अनुयायांची पुनः नामकरण झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे नावदेखील गोविंद राय ऐवजी गोविंद सिंग ठेवले. खालसाच्या पांच प्रिय लोकांकडून अमृत घेणारे गुरु गोविंद सिंग पहिले व्यक्ती झाले. त्यानंतर अल्प-काळात जवळपास एक लाख लोकांना बाप्तिस्मा देण्यात आला. अशारितीने खालसाची स्थापना झाली, जी गुरु गोविंदसिंगद्वारे केलेली सर्वात मोठी उपलब्धी मानली जाते.

गुरूंनी एक प्रकारच्या सेनेची स्थापना केली, त्यामधील प्रत्येकजण जाती विरहित, ईश्वराचा सार्वभौम, आणि देश-विहीन व्यक्ती होता. गुरु गोविंद सिंगांनी नेहमी स्वतःला खालसाचा सेवक समजले. ते म्हणत, “त्यांची सेवाच मला सर्वात अधिक प्रसन्नता देते. या सेवेव्यतिरिक्त कोणतीही अन्य सेवा माझ्या आत्म्याला एवढी प्रिय नाही. खालसा दल हे शासनाच्या अत्याचाराविरुद्ध उभारलेले एक मोठे संगठन होते.

खालसाच्या स्थापनेमुळे सर्व शीख अनुयायांच्यात एकतेची भावना प्रस्थापित झाली. शिखांची ही एकता स्थानिक शासकांमध्ये तणाव निर्माण करण्यास पुरेशी होती. आनंदपूर साहिब येथे होणाऱ्या सभेत हजारो शीख लोकांची उपस्थिती आणि त्यातील बहुसंख्य लोक सशस्त्र यामुळे नजीकच्या पहाडी भागातील शासकांमध्ये खळबळ उडणे स्वाभाविक होते. त्यामुळे शिवालिक पहाडीतील राजपूत राजे चिंतेमधे पडले.

खालसा दलाच्या स्थापनेपूर्वी शिवालिक पहाडीतील राजपूत राजे शिखांना खालच्या जातीतील मानत, ज्यांनी आपले अधिकार मिळवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नव्हते. परंतु, खालसच्या उदयाने पहिल्यांदा भेदभाव आणि विभाजनाच्या त्यांच्या या प्रणालीला आव्हान दिले. आणखी सांगायचे झाले तर, गुरूंचे दिवसेंदिवस वाढत चाललेले अनुयायी, सैन्यसंख्या, आणि शस्त्रसाठा यामुळे नजीकच्या राजपूत राजांची तारांबळ उडाली. अशारितीने, स्थानिक शासकांची भेदनीती आणि विचारसरणी पूर्णपणे बदलली.

आनंदपूरचा वेढा

आनंदपूर हे बिलासपूर या राज्याअंतर्गत येत होते. त्यामुळे बिलासपूरच्या राजाला नेता बनवून गुरूंना त्यांच्या किल्ल्यातून जबरदस्तीने काढण्यासाठी अनेक मोर्चे काढण्यात आले. परंतु, प्रत्येकवेळी पहाडी राजांच्या हाती अपयशच आले. कारण, आतापर्यंत खालसा दलाच्या फौजा यांना तोंड देण्याकरिता सक्षम बनल्या होत्या. त्यामुळे मुघल सम्राटाकडे त्यांना मदत मागावी लागली. सम्राटाच्या आदेशावरून सरहिंदचा फौजदार आणि लाहोरच्या गव्हर्नरने सैन्यतुकडत्या मदतीसाठी पाठवल्या. सन १७०५ च्या मे महिन्यात त्यांच्या संघटित सैन्याने आनंदपूरच्या किल्ल्याला वेढले.

कित्येक महिन्यानंतर, गुरु आणि त्यांचे अनुयायी प्रदीर्घ घेराबंदीच्या परिस्थितीत रसद कमी असतांना निकराने लढा देत होते. घेराव घालण्यात आलेले (शीख) अत्यंत हताश झाले होते, घेराव टाकणाऱ्यांनी (लाहोरचे गव्हर्नर) सुद्धा शिखांच्या शौर्यापुढे हात टेकले होते. या पाडावावर घेराव टाकणाऱ्यांनी कुराणावर शपथ घेऊन व कुराणाच्या वचनावर जर, शिखांनी आनंदपूर सोडले तर त्यांना सुरक्षितपणे जाऊ देण्याची हमी दिली होती. शेवटी, डिसेंबर १७०५ साली एका रात्री संपूर्ण शहर खाली करण्यात आले. पण जसे गुरु आणि त्यांचे शीख अनुयायी बाहेर पडले, डोंगरी हल्लेखोर आणि त्यांचे मुघल सहकारी त्यांच्यावर तुटून पडले.

मुघलांद्वारे शिखांचा विश्वासघात

त्यानंतर माजलेल्या गोंधळात अनेक शीख मारले गेले आणि गुरूंचे साहित्य अनेक मौल्यवान हस्तलिखीतांसह नष्ट झाले. स्वतः गुरूंना आनंदपूरच्या नैऋत्य दिशेला चाळीस किलोमीटरवर असलेल्या चामकोर गावाला जाण्यात यश मिळाले, त्यांचेसोबत ४० शीख आणि त्यांचे दोघे मोठे मुलं होती. तेथील इंम्पेरीयल सैन्याने त्यांच्या मागावर राहून शिताफीने त्यांना पकडले. त्यांची दोघे मुले, अजित सिंग (जन्म १६८७) आणि जुझार सिंग (जन्म १६९१) आणि ५ शीख सरदार ७ डिसेंबर १७०५ च्या कारवाईत अडकले. ५ जिवंत असणाऱ्या शिखांनी गुरूंना खालसा पंथाचे पुनर्जीवन करण्यासाठी गुरूंनी स्वतःचे रक्षण करायचा सल्ला दिला.

गुरु गोविंद सिंग आपल्या तीन शीख अनुयायांसोबत माळव्याच्या जंगलात निसटून जाण्यास यशस्वी झाले. त्यांचे दोन मुस्लीम अनुयायी, गनी खान आणि नबी खान यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन गुरूंना मदत केली. गुरु गोविंद सिंग यांची दोन छोटे मुलं झोरावर सिंग (जन्म १६९६), फतेह सिंग (जन्म १६९९), आणि त्यांच्या मातोश्री माता गुजारीजी यांनासुद्धा बाहेर काढण्यात आले. पण त्यांच्या जुन्या नोकराने, गंगुने सरहिंदच्या फौजदारापर्यंत संगनमताने पोहोचविले आणि त्यांना १३ डिसेंबर १७०५ ला फाशी देण्यात आली. त्यांची आजी त्याच दिवशी मरण पावली.

गुरू गोविंद सिंग वेढ्यातून बाहेर

गुरूंचा दुसरा मुस्लीम प्रशंसक, राजकोटच्या राय कल्हा, याच्या मदतीच्या कृतज्ञतेसाठी, येथे गुरु गोविंद सिंग यांनी त्यांची तलवार रायला भेट दिली (या तलवारीच्या दोन्ही बाजूस म्हणजे उजव्या बाजूस “अकाल पुरख की रचचिया हम ने, सरब लोह की रचचिया हम ने इक ओंकार सतगुर प्रसाद औतर खास पातशाह १०,” हे शब्द कोरलेले होते. तर, डाव्या बाजूस “सरब कल की रचचिया हम ने, सरब जिया की रचचिया हम ने” लिहिलेले होते.

(ही तलवार इतर शस्त्रांसोबत म्हणजे शमशेर वा सिपार (तलवार आणि ढाल), दाय-ए-अहिनी (लोखंडी शस्त्र), निझा (लान्स), चुक्कुर-ए-अहिनी (फेकण्याचे एक लोखंडी अस्त्र), शमशेर तेघा (लोखंडी तरवार), कुलघी-ए-कच्छ ( चांदीच्या प्रावरणातील काचेचे अस्त्र), बर्ची (छोटा भाला), बर्चा (मोठा भाला) या शस्त्रांसहित, १ में १८४९ ला महाराजा रणजितसिंग याच्या तोफखान्यातून ईस्ट इंडिया कंपनीने लॉर्ड डलहौसी यांच्या आदेशावर इंग्लंड ला पाठविली होती.

गुरु गोविंद सिंग माळव्याच्या मध्यस्थानी असलेल्या दिना या ठिकाणी पोहोचले. येथे त्यांनी ब्रार क्लानच्या काही शेकडोंच्या संख्येत असलेल्या योद्ध्यांना जमविले. त्याचबरोबर त्यांची प्रसिद्ध रचना, पर्शियन भाषेतील पत्र ‘जफरनामा’ (विजयपत्र जे बादशहा औरंगजेबाला उद्देशून लिहिले गेले होते ते लिहिले. हे पत्र औरंगजेब आणि त्यांच्या सरदारांनी केलेल्या वचनभंगाचा संदर्भ घेऊन अगदी कठोर भाषेत लिहिले होते. त्यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या किल्ल्याच्या बाहेर जेथे सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था नव्हती, अश्या वेळी हल्ला केला होता. गुरूंचे दोन शीख अनुयायी, दया सिंग आणि धरम सिंग यांना दक्षिणेत असलेल्या अहमदनगरला ‘जफरनामा’ पत्र औरंगजेबला नगरच्या त्याच्या छावणीत देण्यासाठी पाठविण्यात आले होते. दिना या ठिकाणापासून, गुरु गोविंद सिंग यांनी आपला मोर्चा पश्चिम दिशेला तोपर्यंत चालू ठेवला, जोपर्यंत त्यांना त्यांचा मुक्काम योग्य वाटत नव्हता, त्यांनी आपला अंतिम मुक्काम खिद्रानाच्या तलावाशेजारी केला.

शूर शीख महिलेने संघर्षात सहभाग नोंदविला

इसवी सन २९ डिसेंबर १७०५ ची संघर्ष लढाई अत्यंत निकराची आणि निराशाजनक ठरली. तथापि, बहुसंख्य सैनिक असतांना सुद्धा, मुघलांच्या टोळ्यांना गुरूंना पकडणे शक्य झाले नाही आणि त्यांचा पराभव झाला होता. यामध्ये त्या ४० शिखांचा समावेश होता ज्यांनी गुरूंना अनंतपूरच्या मोठ्या वेढ्यात सोडले होते. त्यानंतर, यापैकी दोन शिखांच्या पत्नींनी त्यांना यावरून सुनावले होते. हे दोघे एका महान शूर महिलेच्या मार्गदर्शनाने म्हणजे माई भागो च्या प्रेरणेने परत आले होते. गुरूंच्या अधल स्थानासाठी त्यांनी अत्यंत निकराच्या लढाईत उडी घेतली होती. गुरूंनी त्यांना चाळीस जणांनी एकाला वाचविण्याचा आशीर्वाद दिला. म्हणजे ४० कमी आलेले ४० मुक्ते (मुक्तता करणारे) आहेत असा आशीर्वाद दिला आणि हे स्थान प्रसिद्ध होईल असे संकेत दिले. आता हे वारसास्थळ पवित्र धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते आणि याला मुक्तसार (मुक्सर) असे म्हणतात, म्हणजे मुक्ती तलाव.

लख्खी जंगल प्रदेशात काही काळ वास्तव्य केल्यानंतर, गुरु गोविंद सिंग तलवंडी साबो आले, आता याला दमदमा साहिब असे म्हणतात. २० जानेवारी १७०६ पासून, नऊ महिन्यांच्या वास्तव्यानंतर गुरुंनी अनेक शिष्य पुन्हा जमविले. त्यांनी शिखांसाठी अत्यंत विव्दान असे भाई मणी सिंग ज्यांनी गुरु बाणी लिहिले, यांचेसमवेत पुन्हा नवीन धर्मवाणी लिखित बनविले, ते म्हणजे गुरु ग्रंथ साहिब. गुरू गोविंद सिंग आणि इतर धर्मगुरूंनी सुरू केलेल्या साहित्यिक परंपरेवरून आणि विद्वानांच्या संख्येवरून हे स्थान गुरूंची काशी म्हणून ओळखले जाते. जे अर्थातच काशी अथवा वाराणसी (ईशान्य भारतातील एक शहर) सारखे ज्ञानार्जन करण्याचे केंद्र बनले.

जफरनामामुळे परिणाम झाला

दिना ठिकाणावरून गुरुंनी पाठविलेल्या जफरनामाचा बादशहा औरंगजेबाच्या मनावर गंभीर परिणाम झाला. त्याने गुरूंना चर्चेसाठी निमंत्रित केले. इतिहासाच्या नोंदीनुसार, बादशहा औरंगजेबाने लाहोर च्या उप-गव्हर्नर मुनीम खानला पत्र लिहिले ज्यामध्ये गुरूंशी संपर्क साधून त्यांच्या दक्षिणेच्या प्रवासाची व्यवस्था करण्याचे आदेश होते.
पण गुरु गोविंद सिंग, यांनी दक्षिणेकडे जाण्यासाठी ३० ऑक्टोबर १७०६ ला म्हणजे आधीच कूच केले होते. ते शेजारील प्रदेश राजस्थानातील बाघोर जवळ होते, त्यावेळीच नगरला बादशहाचा मृत्यू झाल्याची खबर २० फेब्रुवारी १७०७ ला येऊन धडकली, त्यावेळी गुरुंनी सहाजाहनाबाद (दिल्ली) मार्गे पंजाबला माघारी येण्याचा निर्णय घेतला. हा तो काळ होता, ज्यावेळी मृत बादशहाची मुले एकमेकांशी संघर्ष करून बादशहाचे वारस होण्याचा प्रयत्न करत होते.

गुरुंनी बहादूर शाहला केली मदत

गुरु गोविंद सिंग यांनी बादशहाचा सर्वात मोठा मुलगा जो उदारमतवादी होता. त्या मुज्जअमच्या मदतीसाठीपाठविले, आणि याचे प्रतिक म्हणून जजाऊ च्या युद्धात (८ जून १७०७) शिखांनी सहभाग घेतला, निर्णायकवेळी हा लढा राजपुत्राने जिंकला आणि त्याला बहादूरशहा असे नामकरण झाले. या नवीन बादशहाने गुरु गोविंद सिंग यांना आग्रा या ठिकाणी २३ जुलै १७०७ ला चर्चेसाठी बोलविले.

यावेळी बादशहा बहादूर शहा काही शत्रूंच्या विरोधात जाण्याची तयारी करत होता. त्यामध्ये अंबर (जयपूर) च्या कच्छवा राजपूत होते. त्याचबरोबर, आपला छोटा भाऊ, कामबक्ष हादेखील बंडखोरीच्या पवित्र्यात होता.

गुरुंनी त्याला साथ दिली, आणि इतिहास सांगतो की, गुरुनानक यांनी दिलेल्या शिकवणीनुसार लोकांच्या सभेस संबोधित केले. दोन्ही सैन्यांनी जून १७०८ ला तापी नदी ओलांडली आणि ऑगस्ट मध्ये बाणगंगा नदी ओलांडली आणि ते ऑगस्ट अखेरीस गोदावरीकाठी असलेल्या नांदेड येथे आले.

यादरम्यान बहादूरशहा दक्षिणेकडे मार्गस्थ झाला, गुरु गोविंद सिंग यांनी नांदेड येथे काही काळ वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. येथे ते एक बैरागी (जगापासून आलिप्त असेलेला व्यक्ती) माधो दास, ज्यांना गुरुंनी खालसा पंथाची दीक्षा दिली आणि त्यांचे नामकरण गुरुबक्ष सिंग (लोकप्रिय नाव बांदा सिंग) असे केले. गुरु गोविंद सिंग यांनी आपल्या भात्यातील ५ बाण बांदा सिंग यांना दिले, एक मार्गदर्शक वाटाड्या देऊन त्यांनी बांदा सिंग यांना त्यांचे ५ निवडक शीख शिष्य दिले. गुरुंनी त्यांना पंजाब येथे जाण्याचे आदेश दिले आणि स्थानिक राज्यकर्त्यांचा अन्यायाविरोधात संघर्ष करण्यास सांगितला.

गुरूंच्या हत्येची योजना

बादशहाने गुरु गोविंद सिंग यांना विशेष सन्मानाची वागणूक दिल्यामुळे सरहिंदच्या नवाज वजीर खानला धोका वाटत होता. गुरुंनी दक्षिणेत कूच केल्यामुळे त्याला गुरूंचा द्वेष वाटत होता, आणि त्यामुळे स्वतःचे स्थान सुरक्षित करण्यासाठी त्याने आपल्या दोन विश्वासू व्यक्तींना सांगून गुरूंची बादशहाशी गाढ मैत्री होण्याच्या आत त्यांना मारण्याची योजना आखली.

गुरु कियान साखीया नुसार हे दोन पठाण जमशेद खान आणि वासिल बेग यांनी गुरूंचा गुप्तपणे पाठलाग केला. त्यांच्यावर नांदेड येथे हल्ला केला. समकालीन लेखक सेनापती यांनी लिहिलेल्या श्री गुर सोभानुसार गुरू आपल्या कक्षामध्ये सायंप्रार्थना रहरासनंतर असतांना एकाने त्यांच्या कक्षात दबा धरून गुरूंना डाव्या बाजूला हृदयाखाली भोसकले. दुसऱ्या प्रहाराआधी गुरु गोविंद सिंग यांनी त्याला आपल्या तलवारीने खाली पाडले, आणि त्याचा दुसरा साथीदार पळून जात असतांना आवाज झाल्याने शीख अनुयायांनी मारला. ही खबर बहादूर शहापर्यंत पोहोचताच त्याने निष्णात शल्यचिकित्सा वैद्य गुरूंच्या सेवेसाठी पाठवला.

गुरूंच्या आरोग्यात सुधारणा पण गुरूंच्या कार्याची समाप्ती

बादशहाच्या युरोपियन शल्यविशारद वैद्याकडून जखमेला त्वरित शिवण्यात आले आणि काही दिवसातच गुरूंची जखम ठीक झाली. दुखापत पूर्णपणे ठीक झाली होती आणि गुरूंची तब्येत चांगली झाली होती. पण काही दिवसानंतर, गुरुंनी कठीण अवस्थेत स्नायू ताणले गेल्यानंतर चांगली झालेली जखम पुन्हा पूर्वस्थितीत आली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. नंतर पुन्हा या जखमेवर उपचार केले गेले पण रक्तस्त्राव थांबला नव्हता; आता गुरूंना समजले होते की आपल्याला निर्मिकाकडे जाण्याचा प्रसंग जवळ आहे. त्यांनी आपल्या निर्वाणासाठी संगत म्हणजेच बैठक तयार केली ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या सेवाभावी शिष्यांना सहभागी केले होते आणि त्यांनी खालसा पंथाला आपला निर्वाणीचा शब्द दिला.

त्यांनी नंतर ग्रंथ साहिब उघडला, आणि त्यांनी ग्रंथावर ५ पैसे ठेवले आणि ग्रंथाला लवून नमस्कार केला आणि गुरु ग्रंथ साहिबला आपला वारसदार म्हणून दर्शविले. “वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरू की फतेह” असे म्हणून, त्यांनी गुरु ग्रंथ साहिबला फेरी मारून म्हटले की, “प्रिय खालसा, ज्यांना मला भेटायचे आहे, त्यांनी गुरु ग्रंथ साहिब पहावा. गुरु ग्रंथ साहिबचे पालन करावे, ग्रंथ साहिब साक्षात गुरूंचे शरीर आहे, ज्यांना कोणाला मला भेटायचे आहे, त्यांनी मला या ग्रंथात शोधा.”

नंतर त्यांनी त्यांची स्वतःची रचनेचे गायन केले: “आज्ञा भाई अकल की, तभी चलायो पंथ सभ सिख को। हुकम है गुरु मान्यो, ग्रंथ गुरु ग्रंथ जी मान्यो। परगत गुर की देह जो, प्रभू को मिलबो चाहे। खोज शबद में ले राज करेगा, खालसा अकी रहिये न कोये खबर। होये सब मिलेंगे, बचे शरण जो होये।”

वरील ओळींचे भाषांतर

“दिव्य प्रभूच्या आदेशानुसार, हा पंथ निर्माण झाला आहे. सर्व शिखांना गुरु ग्रंथ साहिबला आपले गुरु मानण्याचा आदेश आहे. गुरु ग्रंथाला गुरुची मूर्ती माना. ज्यांना भगवंताला भेटायचे आहे, त्यांना भगवंत भजनातून भेटेल. खालसा पंथ सर्वत्र राज्य करेल आणि या पंथाला कोणीही विरोधक नसेल, जे वेगळे झाले ते एकत्र येतील आणि सर्व अनुयायांचे कल्याण होईल.”

गुरु ग्रंथ साहिब बनले कायमचे गुरु

त्यांनी, आपल्या धर्माच्या संस्थापकाला त्यांनी स्थापन केलेल्या पवित्र अध्यात्मिक शिकवणीच्या फायद्यांसाठी पर्शियन भाषेत कृतज्ञता व्यक्त केली त्याचे भाषांतर असे:

“गोविंद सिंग यांना गुरु नानक यांचेकडून आदरातिथ्य, तलवार, विजय आणि तत्काळ मदत ह्या गोष्टी मिळाल्या आहेत.”

(शिखांनी गुरूंच्या निर्वाणानंतर ह्या ओळी एका खास मुद्रेवर अंकित केल्या आहेत, आणि राजा रणजितसिंग यांना पंजाबचे महाराजा म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी ह्या ओळींचा स्वीकार आपल्या राज्यातील नाण्यांवर केला.)

त्यानंतर गुरुंनी आपला देह ठेवला. शीख अनुयायांणी त्यांचे अंतिम देहसंस्कार गुरुंनी सांगितलेल्या निर्देशानुसार केले, धर्मप्रार्थना ‘सोहिला’ चे पठण करत आणि प्रसाद (पवित्र अन्न) वाटण्यात आले.

सर्वजण शोकसागरात बुडाले होते, एक शीख आला आणि म्हणाला, “तुम्हाला वाटते गुरूंचा मृत्यू झाला आहे, मी त्यांना त्यांच्या घोड्यावर स्वार झालेले आजच सकाळी पाहिले आहे. त्यांना नमस्कार करून, मी त्यांना विचारले की आपण कुठे जात आहात? ते हसले आणि म्हणाले की ते जंगलात वास्तव्याला जात आहेत.”

ज्या शिखांनी हे ऐकले त्यांना समजले की ही सर्व गुरूंची लीला आहे, आणि गुरूंचे अविरत आशीर्वाद सदैव पाठीशी आहेत, ज्यावेळी त्यांचे स्मरण केले जाते त्यावेळी ते हजर असतात. त्यांच्या हृदयात दैवी ममता आणि माया ओतप्रोत आहे, आणि रहस्यमयरित्या गुरु आपल्या शिष्यांना शुभाशीष देतात.

जरी गुरु शरीराने दूर गेले असले, तरी त्यांच्यासाठी विलाप करु नका. गुरु ग्रंथ साहिबमध्ये आतासाठी आणि सदैव येणाऱ्या नवीन काळातसुद्धा शिखांसाठी हीच शिकवण आहे.

Subscribe To Our Newsletter

Subscribe To Our Newsletter

Join our HN list to receive the latest blog updates from our team.

You have Successfully Subscribed to HN list!

Subscribe Now For Future Updates!

Join and recieve all future updates for FREE!

Congrats!! Now you are part of HN family!

Pin It on Pinterest